शेतकऱ्याचे मोडले कंबरडे ! टोमॅटोला प्रतिकिलो फक्त 25 पैसे दर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेतकऱ्याचे मोडले कंबरडे ! टोमॅटोला प्रतिकिलो फक्त 25 पैसे दर

शेतकऱ्यांनी काबाडकष्टाने पिकवलेल्या शेतीमालास कवडीमोलाचा दर मिळतो तेव्हा त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळतात.

शेतकऱ्याचे मोडले कंबरडे ! टोमॅटोला प्रतिकिलो फक्त 25 पैसे दर

पंढरपूर (सोलापूर) : कोरोनाने (Covid-19) शेतकऱ्यांचे (Farmers) कंबरडे मोडले. लॉकडाउनमुळे (Lockdown) पिकलेल्या शेतमालाला बाजारपेठ (Market) मिळाला नाही. अशा आर्थिक चक्रव्यूहात फसलेला शेतकरी अजूनही या दुष्टचक्रातून बाहेर पडला नसल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी काबाडकष्टाने पिकवलेल्या शेतीमालास कवडीमोलाचा दर मिळतो तेव्हा त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळतात. पंढरपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत (Pandharpur Market Committee) त्याचा प्रत्यय आला. बोहाळी (ता. पंढरपूर) येथील शेतकरी नाना गायकवाड या शेतकऱ्याच्या टोमॅटोला (Tomato) प्रतिकिलो फक्त 25 पैशांचा दर मिळाला. टोमॅटोचा गडगडलेला दर पाहून सारेच अवाक्‌ झाले.

हेही वाचा: अफगाणिस्तानवरील तालिबानी वर्चस्वामुळे केळी निर्यातीवर परिणाम

गुरुवारी (ता. 19) सकाळी येथील बाजार समितीत नेहमीप्रमाणे भाजीपाल्यांचा लिलाल सुरू झाला. या लिलावाप्रसंगी गायकवाड या शेतकऱ्याने 800 किलो टोमॅटो विक्रीसाठी आणली होती. नेहमी चांगला दर मिळणाऱ्या टोमॅटोचे दर गडगडल्याचे पाहून शेतकरी हबकून गेले. लिलावानंतर येथील आडते व कर्मचारी देखील व्यथित झाल्याचे पाहायला मिळाले. येथील आडते मनसूब यांनीच या शेतकऱ्याची व्यथा मांडली. टोमॅटोसह भाजीपाल्याचे दर गडगडल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. अचानक दर गडगडल्याने बोहाळी (ता. पंढरपूर) येथील टोमॅटो उत्पादक शेतकरी नाना गायकवाड यांचे टोमॅटो शेतीत दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा: बाजार समितीसाठी एकेकाळी हवेसे वाटणारे विजयकुमार देशमुख आता डोईजड !

नाना गायकवाड यांची बोहाळी येथे चार एकर शेती आहे. शेतीत जेमतेम पाणी असल्याने ते भाजीपाल्याची शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. यावर्षी टोमॅटोला चांगला दर मिळेल या आशेवर त्यांनी 25 मे रोजी सव्वा एकर क्षेत्रावर टोमॅटोची लागवड केली आहे. टोमॅटो लागवडीपासून ते विक्रीपर्यंत त्यांना दीड लाख रुपयांचा खर्च आला आहे. मागील आठ दिवसांपासून टोमॅटो काढणी सुरू झाली आहे. परंतु, बाजारात दर मिळत नसल्याने उभे पीक काढून टाकण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. गुरुवारी त्यांनी 800 किलो टोमॅटो पंढरपूर येथील बाजार समितीमध्ये विक्रीसाठी नेले होते. सुरवातीला व्यापारी माल उतरून घेण्यासही तयार नव्हते. अनेक विनंत्या केल्यानंतर आडत्यांनी कसाबसा माल उतरवून लिलावात लावला असता, प्रतिकिलो फक्त 25 पैसे दर मिळाला. वाहतूक भाडे आणि हमाली पदरची देऊन या शेतकऱ्याला रिकाम्या हाताने घरी परतावे लागले. सरकारने लहान शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, वीज वितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा सुरू करावा, याबरोबरच सरकारने भाजीपाला निर्यातीचे धोरण निश्‍चित करावे, अशी मागणीही नाना गायकवाड यांनी केली आहे.

Web Title: In Pandharpur Bajar Samiti A Farmers Tomato Fetched Only 25 Paise Per Kg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :maharashtraviralupdate