वातावरणातील बदलांमुळे वाढले श्वसनाचे विकार |Sickness | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sickness
वातावरणातील बदलांमुळे वाढले श्वसनाचे विकार

वातावरणातील बदलांमुळे वाढले श्वसनाचे विकार

सोलापूर - दिवसभर उष्णता, ढगाळ हवामान, रात्री थंडी आणि अधूनमधून पावसाची हजेरी अशा संमिश्र वातावरणामुळे श्वसनाच्या विकाराचे रुग्ण वाढत असल्याची माहिती डॉक्‍टरांनी दिली. कोरोना परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर प्रत्येकाने काळजी घेण्याचे आवाहन प्रशासन व आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.

एकीकडे कोरोना रुग्णांच्या संख्येत कमी-जास्त वाढ होत असताना, वातावरणातील बदलही चिंता वाढविणारे ठरत आहेत. मागील काही दिवसांपासून घसादुखी, सर्दी-पडसे, ताप असणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. याचवेळी वातावरणही बदलत असल्यामुळे श्वसनाच्या विकारांचे रुग्णही वाढत आहेत. श्‍वसनाच्या विकाराची रुग्णवाढ ही चिंताजनक बाब असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. दिवसभरात थंडी, उकाडा, ढगाळ हवामान, पाऊस असे बदल शरीरासाठी हानीकारक आहेत. ताप, सर्दी, खोकला यांमध्ये वाढ होण्यास असे वातावरण कारणीभूत ठरते. त्याकडे दुर्लक्ष झाल्यास आजाराची तीव्रता वाढण्याची भीती आहे. त्याचबरोबर मधल्या काळात कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे मास्क न वापरणे, हात धुणे, शारीरिक अंतर राखणे या प्रतिबंधात्मक उपायांकडेही नागरिकांनी दुर्लक्ष केले आहे.

हेही वाचा: माळीनगरमध्ये अनर्थ टळला, ऊस वाहतुकीचा ट्रेलर पोलिस चौकीत घुसला!

त्यामुळे ताप, सर्दी, खोकला, श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे आढळल्यास कोरोना चाचणी किंवा इतरही काही तपासण्या त्वरित करून घेणे आवश्‍यक आहे. जेणेकरुन पुढील होणारा धोका टाळता येऊ शकतो. सध्या शहरात मागील तीन-चार दिवसांपासून हवेत गारठा आहे. दिवसभर उकाडा आहे. ढगाळ हवामान आणि पाऊसही आहे. त्यामुळे विषाणूजन्य आजारांच्या वाढीला पोषक वातावरण आहे. कोणत्याही विषाणूजन्य आजाराची लक्षणे दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा. घरीच स्वतःहून उपचार अजिबात घेऊ नयेत किंवा कोणाच्या तरी सांगण्यावरून, फोनवरून गोळ्या घेऊन स्वतःची ट्रीटमेंट अजिबात घेऊ नये. काहीही शंका असल्यास डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा असे आवाहन करण्यात आले.

मागील चार दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे चार दिवसांत सर्दी, ताप, खोकला आणि श्‍वास घेण्यास त्रास होत असलेले रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे कोणताही आजार अंगावर न काढता त्वरित डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा.

- सचिन कुलकर्णी, आर्थोपेडिक सेंटर, सोलापूर

loading image
go to top