नळाला मीटर बसवा, अन्यथा पिण्याचे पाणी बंद! ‘यामुळे’ सोलापूरला २४ तास मिळणार पाणी

महापालिकेला दरवर्षी पाणीपुरवठ्यातून २० कोटींचा भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे आता शहरातील प्रत्येक कुटुंबातील नळ कनेक्शनला मीटरची जोड दिली जाणार आहे.
नळाला मीटर
नळाला मीटरsakal

सोलापूर : महापालिकेला दरवर्षी पाणीपुरवठ्यातून २० कोटींचा भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे आता शहरातील प्रत्येक कुटुंबातील नळ कनेक्शनला मीटरची जोड दिली जाणार आहे. मार्च २०२३ पर्यंत शहरातील पावणेदोन लाख नळांना मीटर बसविले जाणार असून, मीटर न बसविलेल्यांवर दंडात्मक कारवाई होईल. त्यानंतरही मीटर न बसविल्यास संबंधितांचा पाणीपुरवठा बंद केला जाणार आहे.

सद्यःस्थितीत शहरात एक लाख १८ हजार नळ कनेक्शन आहेत. उजनी ते सोलापूर या ३४ वर्षे जुन्या पाइपलाइनमधून शहराला पाणीपुरवठा होतो. जुनाट पाइपलाइनला सातत्याने गळती होते आणि त्याच्या दुरुस्तीसाठी मोठा खर्च करावा लागतो. दुसरीकडे, पाण्याचा अपव्ययदेखील मोठा असून काहीजण पूर्वीचे पाणी गटारीत ओतून देतात तर काहीजण गाड्या धुतात. काहीजण पाणी विकत असल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता पाणीपुरवठ्याला शिस्त लागावी, या हेतूने शहरातील तब्बल ९१० सार्वजनिक नळ बंद केले जाणार आहेत. शहरातील प्रत्येक नागरिकाला मीटरद्वारेच पाणी घ्यावे लागणार आहे. त्याची निविदा काढली असून, सुरवातीला त्यासाठी अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. संबंधित कंत्राटदाराला पहिल्या टप्प्यात एक लाख ३० हजार नळांना मीटर बसवावे लागणार आहेत. त्याची रक्कम त्या कंत्राटदाराला तो नळ कनेक्शनधारकच देईल, अशी अट त्या निविदेत घालण्यात आली आहे. आता त्या निविदेला पुन्हा एकदा २० दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

नळ कनेक्शनची सद्यःस्थिती

  • सार्वजनिक नळ

  • ९१०

  • वैयक्तिक नळ कनेक्शन

  • १.१८ लाख

  • पहिल्या टप्प्यातील मीटर

  • १.३० लाख

  • शहरासाठी दररोज पाणी

  • १८० एमएलडी

शहराला २४ तास मिळणार पाणी

सोलापूर शहराला २४ तास पाणीपुरवठा व्हावा, या हेतूने अमृत योजनेअंतर्गत स्मार्ट सिटीने ५३५ कोटींचा कृती आराखडा (डीपीआर) तयार केला आहे. त्यातून १२ जुन्या पाण्याच्या टाक्या पाडून शहरातील विविध भागांत २१ नवीन टाक्या बांधल्या जाणार आहेत. तसेच जुन्या किंवा कमी दाबाच्या पाइपलाइन काढून त्या ठिकाणी नवीन पाइपलाइन टाकली जाणार आहे. महापालिकेचा तो ‘डीपीआर’ शुक्रवारी (ता. २६) राज्य सरकारने स्वीकारला असून, आता तो केंद्र सरकारकडे पाठविला जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने दिली.

नेहरू नगरात तीन दिवसांआड पाण्याचा प्रयोग यशस्वी

संपूर्ण शहराला तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने नियोजन पूर्ण झाले आहे. पहिल्या टप्प्यात नेहरूनगर (विजयपूर रोड) या परिसरात तीन दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. तो प्रयोग यशस्वी झाला असून त्याअंतर्गत पूर्ण दाबाने अडीच तास पाणी सोडले जात आहे. नीलमनगर, विडी घरकुल या परिसरातदेखील तसेच नियोजन करण्यात आले असून, त्याची अंमलबजावणी काही दिवसांत होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com