esakal | राष्ट्रीय ग्राहक दिन : ग्राहक मंचाचे आदेश मराठीत देणे बंधनकारक !

बोलून बातमी शोधा

consumer-day

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचात तक्रारदाराला तक्रार दाखल करता येते. ही तक्रार मराठी भाषेत दाखल करता येते. तक्रारदार स्वत: ग्राहक मंचात केस चालवू शकतात. तसेच या तक्रारीवर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने चार महिन्यांच्या आत निकाल देणे कायद्याने बंधनकारक आहे. या तक्रारीवर जिल्हा ग्राहक तक्रार मंचाने पारित करावयाचे आदेश हे मराठी भाषेतच असणे कायद्याने बंधनकारक आहे. 

राष्ट्रीय ग्राहक दिन : ग्राहक मंचाचे आदेश मराठीत देणे बंधनकारक !
sakal_logo
By
अमोल व्यवहारे

सोलापूर : जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचात तक्रारदाराला तक्रार दाखल करता येते. ही तक्रार मराठी भाषेत दाखल करता येते. तक्रारदार स्वत: ग्राहक मंचात केस चालवू शकतात. तसेच या तक्रारीवर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने चार महिन्यांच्या आत निकाल देणे कायद्याने बंधनकारक आहे. या तक्रारीवर जिल्हा ग्राहक तक्रार मंचाने पारित करावयाचे आदेश हे मराठी भाषेतच असणे कायद्याने बंधनकारक आहे. त्यामुळे ग्राहकांनी आपली तक्रार ग्राहक तक्रार निवारण मंचात स्वत: दाखल करण्यापासून ते संपूर्ण केस चालविण्याकरिता पुढे येण्याची गरज आहे, असे मत अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे सोलापूर महानगर अध्यक्ष बसवराज येरनाळे यांनी व्यक्त केले. 

श्री. येरनाळे म्हणाले, जागतिक ग्राहक दिनाच्या निमित्ताने ग्राहक राजा आहे, असे नुसतेच म्हणून चालणार नाही, तर त्यासाठी ग्राहकाने आग्रही असले पाहिजे. ग्राहक म्हणून कायद्याने जे अधिकार, हक्‍क आणि कर्तव्ये सांगितली आहेत, त्याबाबत माहिती करून घेणे अत्यंत आवश्‍यक व गरजेचे आहे. कायद्यामुळे ग्राहक कोणाला म्हणावे, याबाबतची व्याख्या दिलेली आहे. त्यानुसार वस्तू व सेवा ही पैसे देऊन खरेदी केली जाते किंवा दिली जाते. तेथे ग्राहक ही संकल्पना उदयास येते. त्यानुसार एखादा व्यापारी, बॅंका, रेल्वे, विमा, वीज कंपनी, दुकानदार, हॉस्पिटल इत्यादी अनेक बाबी ग्राहक संरक्षण कायद्यात येतात. 

जर एखाद्या व्यक्तीस योग्य ती सेवा मिळाली नाही तर जिल्हा स्तरावर ग्राहक तक्रार निवारण मंच येथे तक्रार दाखल करून न्याय मागता येतो. एकीकडे ग्राहकाला कायद्याने संरक्षण मिळावे म्हणून ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला. एखाद्याने ग्राहकाला सदोष वस्तू अगर सेवा दिली तर त्याबाबत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचात तक्रारदारास तक्रार दाखल करता येते. त्याप्रमाणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या आदेशाविरुद्ध दाद मागावयाची असेल तर राज्य ग्राहक आयोगाकडे 30 दिवसाच्या आत अपिल करता येते असेही श्री. येरनाळे यांनी सांगितले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल