esakal | "जमियत उलमा-ए-हिंद'ने तोडल्या जातिधर्माच्या भिंती! धार्मिक सलोख्याचे प्रयत्न
sakal

बोलून बातमी शोधा

जमियत उलमा-ए-हिंद

'जमियत उलमा-ए-हिंद'ने तोडल्या जातिधर्माच्या भिंती!

sakal_logo
By
वेणुगोपाळ गाडी

मुस्लिम धर्मातील बकरी ईद हा सण म्हणजे त्यागाचे प्रतीक मानले जाते.

सोलापूर : मुस्लिम धर्मातील बकरी ईद (Bakari Eid) हा सण म्हणजे त्यागाचे प्रतीक मानले जाते. याच त्यागी भावनेतून जाती-धर्माच्या भिंती तोडून विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबविण्याचे काम सोलापुरात "जमियत उलमा- ए- हिंद' (Jamiat Ulama-e-Hind) ही 101 वर्षांची परंपरा असलेली राष्ट्रीय स्तरावरील संघटना करीत आहे. या ऐतिहासिक संघटनेची स्थापना 19 नोव्हेंबर 1919 मध्ये करण्यात आली. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत या संस्थेने मोठे योगदान दिले आहे. देशभरात या संघटनेच्या शाखा आहेत. सोलापूर जिल्ह्यातील शाखेचे काम अजोड असेच आहे. (Jamiat Ulama-e-Hind made efforts for religious harmony-ssd73)

हेही वाचा: "ठाकरे कुटुंबीयांची आपुलकी भावली..!'

मौलाना इब्राहिम कासमी जिल्हाध्यक्ष तर हसीब नदाफ हे सरचिटणीस आहेत. शहर सरचिटणीस मैनोद्दीन शेख असून, अय्युब मंगलगिरी, अ. रशीद आळंदकर, हाफिज युसूफ चकोले, मुश्‍ताक इनामदार, युनूस डोणगावकर, मौलाना हारीस, अ. सत्तार दर्जी, हाफीज अ.हमीद चांदा, अ. कय्युम जमादार, हाफीज सनाऊल्लाह, अ. मजीद गढवाल, शुकूर खलिफा, हाफीज महमूद, मौलाना सादिक, मौलाना मोहम्मद तबीब, युसूफ प्यारे, रफिक इनामदार, बाबा मिस्त्री हे अन्य पदाधिकारी आहेत.

या संघटनेतर्फे सोशल हायस्कूल (Social Highschool) येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, उपेक्षितांसाठी दहावी परीक्षेचा 13 नंबर फॉर्म भरण्याचा उपक्रम राबविला जातो. पूरग्रस्त, जळीतग्रस्तांना आर्थिक मदत केली. मूळ मंगळवेढा तालुक्‍याच्या नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या पाच जणांची धुळ्यात हत्या झाली होती. त्यांच्या मुलांना शैक्षणिक दत्तक घेतले तर एका मुलीचा विवाह केला. दोन वर्षांपूर्वीच्या दुष्काळाप्रसंगी राज्यात सर्वत्र टॅंकरने पाणीपुरवठा केला. सध्या या संघटनेतर्फे होम मैदानाजनीक 50 खाटांचे हॉस्पिटल उभारणीचे काम सुरू आहे. "ना नफा ना तोटा' तत्त्वावर हे हॉस्पिटल चालविण्यात येणार आहे. नई जिंदगी येथील चार एक जागेवर युवकांसाठी शारीरिक शिक्षणाची सोय करण्यात येणार आहे. जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन ही संघटना काम करते. सायली गुर्रम या गरीब मुलीला वैद्यकीय शिक्षणासाठी 55 हजारांची मदत हे याचेच द्योतक आहे.

हेही वाचा: समाधान, तू नावाप्रमाणेच समाधानी दिसत आहेस - उद्धव ठाकरे

600 कोविड मृतांवर अंत्यसंस्कार

जात-धर्म न पाहता सोलापूर शहरात या संघटनेने आजवर 600 कोविड (Covid-19) मृतांवर अंत्यसंस्कार केले. यातून माणुसकीचे दर्शन घडविले. रमजान काळात कोविड रुग्णांच्या नातेवाइकांच्या जेवणाची गैरसोय होऊ नये म्हणून सकाळी व सायंकाळी दररोज 600 डब्यांची सोय केली. याकरिता टोल फ्री क्रमांक उपलब्ध केला. अंत्यसंस्कारासाठी युनूस डोणगावकर, नगरसेवक बाबा मिस्त्री व रफीक इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली जावीद कोलमपल्ली, अनिस रंगरेज, मुज्जमिल पटेल, सुहेल मुजावर, अब्दुल शेख, बेबी आपा, नूरजहॉं नदाफ आदींनी परिश्रम घेतले.

समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या उद्देशाने या संघटनेतर्फे जात-धर्म न पाहता विविध उपक्रम राबविले जातात. धार्मिक सलोखा राखण्यावर भर दिला जातो. सध्या 50 खाटांच्या धर्मादाय हॉस्पिटलची उभारणी करण्यात येत आहे.

- हसीब नदाफ, जिल्हा सरचिटणीस, जमियत उलमा- ए- हिंद

loading image