esakal | युवा पत्रकाराची आत्महत्या! आई कोरोना पॉझिटिव्ह तर वडिलाचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Prakash Jadhav

युवा पत्रकाराची आत्महत्या! आई कोरोना पॉझिटिव्ह तर वडिलाचा मृत्यू

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

सोलापूर : वडिलांचा दोन दिवसांपूर्वीच झालेला मृत्यू... पोलिस खात्यात असलेला भाऊ व आईसाठी लागणाऱ्या रेमेडेसिव्हीर इंजेक्‍शनसाठी होत असलेली ससेहोलपट... अशा सर्व मानसिक ताणातूून, नैराश्‍येतून पत्रकार प्रकाश जाधव याने आपल्या हाताची नस कापून जीवनयात्रा संपविली. प्रकाशच्या जाण्याने ताण-तणावातील जगण्याने पुन्हा डोके वर काढले आहे. सध्याची स्थितीच त्याला कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

अवघ्या दोनच दिवसांपूर्वी प्रकाश धर्मा जाधव (वय 35, रा. सुशीलनगर, जुळे सोलापूर) यांच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. आई आणि पोलिस खात्यात असणारा भाऊ अशा दोघांनाही कोरोनाची लागण झालेली होती. त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आईला उपचारासाठी रेमेडेसिव्हीर इंजेक्‍शन लागणार होते. त्यासाठी तो दिवस-रात्र फेऱ्या मारत होता. वडिलांचा प्रकाशवर आणि प्रकाशचा वडिलांवर फार जीव होता. घरातील सदस्यांना कोरोना झाल्यामुळे प्रकाश होम क्वारंटाइनमध्ये होता. त्याने आपल्या हाताची नस कापून जीवनयात्रा संपवली.

संगमेश्वर महाविद्यालयातील पत्रकारिता व जनसंवाद विभागात तो प्रथम आलेला होता. शहरातील अनेक वृत्तपत्रांत पत्रकार म्हणून त्याने काम केले होते. नैराश्‍येच्या भावनेतून त्याने आत्महत्या केली असावी, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

कोरोना महामारीने संपूर्ण जगाला वेढा घातला असताना मानसिक ताणतणावातून प्रत्येकजण जात आहे. त्यामुळे आपणही मानसिकदृष्ट्या सक्षम असणे फार गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

निरोगी मानसिक संतुलनासाठी...

  • वारंवार आपल्या जवळच्या व्यक्तीशी किंवा कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधावा

  • आपण बोलताना किंवा संवाद साधताना एकमेकांना धीर द्यावा

  • अशा महामारीवेळी आपला आशावाद आपण जिवंत ठेवावा

  • हे ही दिवस जातील अशी मानसिकता असावी

  • आपले वाचन वाढवावे, जेणेकरून प्रत्येक समस्येला आपण सामोरे जाऊ शकू

  • नियमित योगासने आणि प्राणायाम करावा

  • संवाद साधताना नातेवाईक किंवा मित्रांमध्ये अविश्वास नसावा

  • घडणाऱ्या घटनेला आपणच जबाबदार आहोत ही भावना निर्माण होऊ देऊ नये

  • वास्तव स्वीकारणे, आपल्या मर्यादेची जाण ठेवणे आणि आपण प्रयत्नशील असावे ही भावना असावी

मुळात अशावेळी आपण मानसिक खच्चीकरण न करून घेता आपल्या समस्या जवळच्या व्यक्तींना सांगितल्या पाहिजेत. शिवाय स्वतः समुपदेशन घेतले पाहिजे. एकमेकांशी सकारात्मक चर्चा करणे हाच याच्यावरील एकमेव उपाय आहे.

- किरण कुलकर्णी, समुपदेशक

- अनुराग सुतकर