Maghi Yatra : माघी यात्रेसाठी पंढरीत लाखो भाविक दाखल ; दर्शनरांग सहा नंबरच्या पत्राशेडपर्यंत

माघी यात्रेचा सोहळा अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपल्याने राज्यभरातून लाखो भाविक पंढरीत दाखल होत आहेत.
Maghi Yatra
Maghi Yatrasakal

पंढरपूर : माघी यात्रेचा सोहळा अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपल्याने राज्यभरातून लाखो भाविक पंढरीत दाखल होत आहेत. यात्रेला आलेल्या भाविकांच्या गर्दीने श्री विठ्ठल मंदिर परिसर, प्रदक्षिणामार्ग, चंद्रभागा नदीचे वाळवंट, ६५ एकर परिसर गजबजून गेला आहे. दरम्यान, श्री विठ्ठलाच्या दर्शनाची रांग रविवारी (ता.१८) दुपारी सहा नंबरच्या पत्रा शेडपर्यंत गेली होती तर श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी सुमारे सात तास लागत होते.

माघी एकादशीला जया एकादशी, असेही संबोधले जाते. यावर्षी मंगळवारी (ता. २०) माघी एकादशीचा सोहळा साजरा होत आहे. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्याच्या विविध भागातून लाखो भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. सलग आलेल्या सुट्ट्या व माघी यात्रा यामुळे यावर्षी नवमी दिवशीच श्री विठ्ठलाच्या दर्शनाची रांग गोपाळपूर रस्त्या लगतच्या सहा नंबरच्या पत्रा शेडपर्यंत गेली होती.

गोपाळपूर रस्त्या लगतच्या पत्रा शेड दर्शन रांगेतील भाविकांसाठी श्री विठ्ठल मंदिर समितीच्या वतीने विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दर्शन रांगेतील भाविकांच्या पायाखाली रबरी मॅटिंग, कुलर फॅन, विश्रांती कक्ष, कचरा बॅग, प्रथमोपचार केंद्र, आपत्कालीन मदत केंद्र, पिण्याचे पाणी, मोफत खिचडी वाटप करण्यात येते आहे. या शिवाय यंदा प्रथमच दर्शन रांगेत घुसखोरी होऊ नये याकरिता लोखंडी बॅरिकेटिंगच्या दोन पाईपमधील अंतर कमी करण्यात आले आहे. याबाबत ’सकाळ’ शी बोलताना दगडू ठकू कोळापटे (रा. धोपेश्वर, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) म्हणाले, आमच्या भजनी मंडळातील सर्व सदस्य माघी यात्रेला आले आहेत. आज पहाटे साडेचार वाजता आम्ही दोन नंबरच्या पत्रा शेडमधील दर्शन रांगेत उभे राहिलो होतो.

Maghi Yatra
Solapur Zillaparishad : गुणवंत कर्मचाऱ्यासाठी चार प्रस्ताव प्राप्त

सुमारे सात तासांनी दुपारी साडे बाराच्या सुमारास आम्हाला श्री विठ्ठलाचे दर्शन प्राप्त झाले. मागील वर्षी दर्शन रांगेत घुसखोरी झाली होती. यंदा मात्र बॅरिकेटिंगमधील अंतर कमी केल्यामुळे घुसखोरी थांबली आहे. दरम्यान माघी यात्रेकरिता पंढरपूर नगरपालिका प्रशासनाच्या वतीने ६५ एकर परिसरात मुक्कामी असणाऱ्या दिंडीतील भाविकांसाठी सुमारे बाराशे स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, परिसर स्वच्छतेसाठी सफाई कर्मचारी आदी सोयी पुरवल्या आहेत.

६५ एकर परिसरात दिंडीतील भाविकांच्या निवासासाठी एकूण ४९७ प्लॉट पैकी रविवारी दुपारपर्यंत ३४५ प्लॉटचे वाटप करण्यात आले आहे. त्या परिसरामध्ये दिंड्यांचे आगमन होत असून तेथील प्लॉटमध्ये भाविकांची तंबू व राहुट्या उभारण्याची लगबग सुरू आहे.

जिल्हा प्रशासनाच्या वतीने ६५ एकर परिसरामध्ये ४९७ प्लॉटच्या माध्यमातून सुमारे तीन ते चार लाख भाविकांच्या निवासाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. या परिसरातील भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी काटेकोर नियोजन केले आहे.

— सुधाकर धाईंजे, आपत्कालीन मदत केंद्र प्रमुख, ६५ एकर, पंढरपूर

मागील यात्रेच्या वेळी ६५ एकरामधील जे प्लॉट आमच्या दिंडीला देण्यात आले होते, तेच प्लॉट या माघी यात्रेलाही आम्हाला देण्यात आले आहेत. त्यामुळे कोणतीही गडबड गोंधळ न होता सर्व दिंडीकरांना निवासासाठी प्लॉट उपलब्ध झाले आहेत.

— भागवत महाराज चवरे, दिंडी प्रमुख, पंढरपूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com