esakal | मनोरुग्ण महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी जन्मठेप 
sakal

बोलून बातमी शोधा

Life imprisonment for torture of a psychiatric woman

आरोपीचे कृत्य पाशवी 
पीडिता मतिमंद आणि विकलांग असल्याची जाणीव आरोपीस होती. आरोपीचे कृत्य पाशवी स्वरूपाचे असून निष्पाप पीडितेवर आरोपीने पराकोटीचा अन्याय केला आहे, अशी न्यायाधीश श्री. बाविस्कर यांनी निकालपत्रात नोंद करत आरोपीस आजन्म कारावास आणि 70 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेतून पीडितेच्या हितासाठी आर्थिक नुकसानभरपाई 50 हजार रुपये पीडितेच्या बॅंक खात्यावर वर्ग करण्याचा आदेश दिला.

मनोरुग्ण महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी जन्मठेप 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (जि. सोलापूर) : एका मनोरुग्ण, मानसिक विकलांग महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी हणमंत ऊर्फ हणमा बापू पडळकर (वय 55, रा. सांगोला) यास येथील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश सी. एस. बाविस्कर यांनी आजन्म कारावास आणि 70 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. 
सांगोला तालुक्‍यातील 22 वर्षीय पीडित महिला मतिमंद व मनोरुग्ण आहे. तिला थोडेफारच बोलता येते. तिला भाषा समजत नसून ती शारीरिक व मानसिक असहाय आणि विकलांग आहे. 17 जुलै 2016 रोजी पीडित महिला घराच्या परिसरातून बेपत्ता झाली होती. साक्षीदारांना ती आटपाडी रस्त्यावर अंगावर कपडे नसलेल्या अवस्थेत दिसली. संबंधित महिलेचा भाऊ फिर्यादीने आणि नातेवाइकांनी तिला घरी आणले आणि तिच्याकडे चौकशी केली असता आरोपी हणमंत ऊर्फ हणमा बापू पडळकर हा घेऊन गेला होता, असे सांगून पीडित महिलेने साक्षीदारांच्या समोर आरोपीस ओळखले. 
याप्रकरणी सांगोला पोलिस ठाण्यात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडितेने हावभाव आणि देहबोलीने तिच्यावर आरोपीने अत्याचार केला असल्याचे सांगितले. सांगोला पोलिसांनी आरोपीस अटक केली आणि पीडित महिलेचा जबाब घेण्यासाठी अग्निपंख मतिमंद शाळेतील शिक्षिका आणि मतिमंदांची भाषा जाणणारी दुभाषी यांना बोलवले. पीडितेच्या हावभावावरून व त्रोटक बोलण्यावरून देहबोलीच्या आधारे आरोपीने पीडितेवर अत्याचार केल्याचे समोर आले. त्यांनी तसा अहवाल पोलिसांना दिला. वैद्यकीय तपासणीतही पीडितेवर अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले. पोलिस तपासामध्ये पीडितेने आरोपीस ओळखले त्यावरून तपासिक अधिकारी श्री. सूर्यवंशी यांनी आरोपीविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. 
सरकार पक्षातर्फे युक्तिवाद करताना सरकारी वकील आनंद कुर्डूकर यांनी दुभाषी शिक्षिकेचा जबाब, परिस्थितिजन्य पुरावे तसेच आवश्‍यक कायदेशीर दुजोरे न्यायालयात सादर केले आणि आरोपीने संबंधित महिलेच्या असहायतेचा फायदा घेऊन तिचे अपहरण करून अमानवी गुन्हा केला असल्याचे न्यायालयास पटवून दिले. या खटल्यात सरकारतर्फे ऍड. आनंद कुर्डूकर, ऍड. सारंग वांगीकर यांनी तर आरोपीच्या वतीने ऍड. लेंडवे यांनी काम पाहिले. 

loading image