esakal | चंद्रभागेत भाकरीचा चंद्र शोधण्यासाठी राबताहेत वृद्धांचे हात 

बोलून बातमी शोधा

A life threatening struggle to get the money donated to the Chandrabhaga river basin

भाविक चंद्रभागेला अर्पण करतात दान 
दक्षिण काशी म्हणून पंढरपूरचे महात्म्य आहे. विठ्ठल दर्शनासाठी येणारे भाविक चंद्रभागेत स्नान करूनच परत जातात. स्नानासाठी आलेले भाविक दान म्हणून एक, दोन, पाच, दहा रुपयांची चिल्लर नदीपात्रात टाकतात. अनेक भाविक पैशाबरोबरच सोने-चांदीचे दागिनेही चंद्रभागेला अर्पण करतात. त्यामुळे भाविकांनी नदीत टाकलेले दान परत मिळवण्यासाठी येथील कोळी समाजातील काही लोक गेल्या अनेक वर्षांपासून हा व्यवसाय करतात. याच व्यवसायावर अनेकांची उपजीविकादेखील चालते. गेल्या दीड महिन्यापासून भाविक येत नसल्यामुळे पात्रात दान पडले नाही. पूर्वी टाकलेले दान मिळवण्यासाठी आता एकच झुंबड उडाली आहे, असे वाळूतून पैसे काढणारे अरुण पवार यांनी सांगितले. 

चंद्रभागेत भाकरीचा चंद्र शोधण्यासाठी राबताहेत वृद्धांचे हात 
sakal_logo
By
भारत नागणे

पंढरपूर (जि. सोलापूर) : विठुरायाच्या दर्शनासाठी दररोज हजारोंच्या संख्येने येणारे भाविक आता लॉकडाउनमुळे कुठेच दिसत नाहीत. त्यामुळे तीर्थक्षेत्र आणि पर्यटनस्थळ म्हणून नावारूपाला आलेल्या पंढरीतील अनेकांची परवड सुरू झाली आहे. अशातच अनेकांच्या हातचा रोजगारही गेल्याने वृद्ध पुरुष आणि महिलांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे आता पोटाची खळगी भरण्यासाठी अशा वृद्धांना चंद्रभागेतील वाळवंटात भाकरीचा चंद्र खुणावू लागला आहे. दिवसभर तळपत्या वैशाख उन्हात बसून दिवसाकाठी 25-50 रुपये मिळवण्यासाठी अनेक वृद्ध महिला आणि पुरुषांचे हात वाळूतील पैसे काढण्यासाठी राबताना दिसत आहेत. 
कोरोनामुळे राज्यभरातील धार्मिक स्थळांच्या ठिकाणी नीरव शांतता पसरली आहे. गर्दी टाळण्यासाठी भक्तांना देवाची दारे बंद केली आहेत. त्यामुळे हजारोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांची रेलचेल थांबली आहे. पंढरपूर तीर्थक्षेत्रही याला आता अपवाद राहिले नाही. वारकरी संप्रदायात चंद्रभागा स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पंढरीत येणारा प्रत्येक भाविक चंद्रभागेचे स्नान करून पंढरीची वारी पूर्ण झाल्याचे समाधान घेऊनच घरी जातो. याच चंद्रभागा वाळवंटात हरिनामाचा जागरही केला जातो. नेहमीच भाविकांच्या गर्दीने फुलेलं वाळवंट कोरोनामुळे ओस पडले आहे. गेल्या दीड महिन्यापासून भाविक पंढरीत येत नसल्याने चंद्रभागेच्या काठावर चालणारा विठुनामाचा जागरही थांबला आहे. 
एकीकडे कोरोनाच्या संकटामुळे विठु भक्तांच्या मानात हुरहूर असतानाच दुसरीकडे याच शांत आणि निर्मनुष्य चंद्रभागेच्या पात्रात भाकरीचा चंद्र शोधण्यासाठी वृद्धांची धडपड सुरू असल्याचे विरोधाभास चित्र सध्या चंद्रभागेत पाहायला मिळत आहे. 
कोरोनामुळे गेल्या दीड महिन्यांपासून चंद्रभागेचे पात्र रिकामे आहे. या रिकाम्या पात्रातील वाळूची चाळण करून त्यातून भाविकांनी टाकलेले दान मिळवण्यासाठी अनेक वृद्ध महिला आणि पुरुषांची कसरत सुरू आहे. दिवसभर वाळू चाळल्यानंतर कधी 25 तर कधी 50 रुपये मिळतात. याच मिळालेल्या पैशावर हे वृद्ध आपली उपजीविका साधतात.