Solapur Lok Sabha Election 2024 : प्रणिती शिंदे यांच्या विजयाचे ऐतिहासिक महत्त्व

सोलापूर जिल्ह्यातून पहिली महिला खासदार होण्याचा मान प्रणिती शिंदे यांना मिळालेला आहे, त्यामुळे हा विजय ऐतिहासिकही आहे.
Praniti Shinde
Praniti Shindesakal

- वैभव गाढवे

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून नूतन खासदार प्रणिती शिंदे यांनी मिळविलेला विजय हा अनेक अर्थाने महत्त्वाचा आहे. सोलापूर जिल्ह्यातून पहिली महिला खासदार होण्याचा मान प्रणिती शिंदे यांना मिळालेला आहे, त्यामुळे हा विजय ऐतिहासिकही आहे.

शिंदे यांच्या रूपाने सोलापूरला प्रथमच युवा खासदार मिळाला आहे. सोलापूर लोकसभेमध्ये सुशीलकुमार शिंदे यांचा दोनवेळा तर उज्ज्वला शिंदे यांना एकवेळा असा तीनवेळा शिंदे कुटुंबाला येथे पराभव स्वीकारावा लागला.

त्या पराभवाचा वचपा प्रणिती शिंदे यांनी यावेळी काढला, हे आणखी एक वैशिष्ट्य. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतलेल्या आणि भाजपने संपूर्ण ताकद लावलेल्या या सोलापूरच्या लक्षवेधी लढतीमध्ये प्रणिती शिंदे यांनी तब्बल ७४ हजार १९७ मतांनी विजय मिळविला आहे. ही गोष्ट सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसला बारा हत्तीचे बळ देणारी आहे.

एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या सोलापुरात मागील दोन निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठनेते सुशीलकुमार शिंदे यांना पराभव स्वीकारावा लागला. यावेळी पराभवाची हॅटट्रिक करण्याच्या इराद्याने भाजप मैदानात उतरली होती.

देवेंद्र फडणवीस यांनी आपला हुकमी एक्का राम सातपुते यांना येथून प्रणिती शिंदे यांच्या विरोधात उमेदवारी दिली. गत दोन निवडणुकांमध्ये भाजपचे दोन्ही खासदार मोदींच्या चेहऱ्यावर निवडून आले. या दोन्ही खासदारांची एकूण कामगिरी अगदी सुमार राहिली आहे.

यावेळीही नवखा आणि मतदारसंघाबाहेरील उमेदवार देऊन भाजपने मोदींच्या चेहऱ्यावर निवडणूक लढविण्यावर भर दिला. त्यामुळे सोलापुरातील या लढतीला मोदी विरुद्ध प्रणिती शिंदे असेही स्वरूप आले होते, हे आणखी एक वैशिष्ट्य.

राज्यातील सर्वात कठीण अशा सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून सलग तीनवेळा निवडून येण्याची किमया प्रणिती शिंदे यांनी केलेली आहे. त्यामुळे लोकसभेची ही लढाई कशी लढली पाहिजे, याचा अंदाज शिंदे यांना होता.

शहर मध्य हा बहुभाषिक, बहुजातीय आणि बहुसांस्कृतिक मतदारसंघ आहे. विधानसभेला या मतदारसंघात कम्युनिस्ट पक्ष, काँग्रेस, एमआयएम, शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप अशी बहुरंगी लढत होत.

या मतदारसंघात मुस्लिम, दलित, मोची, मराठा, तेलुगू भाषिक, लिंगायत, कैकाडी, लोधी आदी समाजाचे प्राबल्य आहे. अशा अत्यंत कठीण समीकरणामध्ये प्रणिती शिंदे यांनी विजयाची हॅटट्रिक केलेली आहे.

स्थानिक लोकांना सतत उपलब्ध असणे आणि लोकांमध्ये जावून मिसळणे, यामुळेच ही कामगिरी करता येऊ शकते. किंबहुना यामुळे येथील लोकांमध्ये प्रणिती शिंदे यांच्याबद्दल प्रचंड आपुलकी आहे.

ही सर्व पार्श्वभूमी असल्यामुळे प्रणिती शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून सर्व यंत्रणा एकहाती हाताळली. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभांपैकी पाच ठिकाणी महायुतीचे आमदार आहेत. तसेच या मतदारसंघात भाजपची मोठी ताकद आहे.

पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, प्रदेशाध्यक्ष अशा भाजपच्या स्टार प्रचारकांच्या सोलापुरात सभा झाल्या. केंद्र आणि राज्यातील सत्तेचा फायदाही भाजप उमेदवाराला होता. त्यामानाने प्रणिती शिंदे यांनी स्थानिक नेतृत्वाला विश्‍वासात घेऊन हा विजय मिळविला आहे.

सोलापूर शहरासह ग्रामीण भागातील प्रत्येक गावापर्यंत आणि प्रत्येक मतदारांपर्यंत पोचण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

प्रचारामध्ये त्या-त्या ठिकाणच्या स्थानिक प्रश्‍नांवर शिंदे यांनी आज उठविला आणि हे प्रश्‍न सोडविण्याबाबतचा लोकांना विश्‍वास दिला. त्याला मतदारांनी विशेषतः ग्रामीण भागातील मतदारांनी भरभरून साथ दिली आणि या मतदारांनीच त्यांच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

लोकसभा निवडणुकीतील हा विजय प्रणिती शिंदे यांच्या राजकीय करिअरचा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. एक तरुण, मुत्सद्दी आणि प्रभावशाली चेहरा म्हणून त्यांचा सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात उदय झाला आहे.

प्रणिती शिंदे यांचा विजय सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेसलाही ऊर्जा देणारा आहे. याचा परिणाम भविष्यातील जिल्ह्याच्या राजकारणावर निश्‍चित होणार आहे.

सुशीलकुमार शिंदेंची महत्त्वपूर्ण भूमिका

प्रणिती शिंदे यांच्या विजयात त्यांचे वडील सुशीलकुमार शिंदे यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. दिल्लीपासून गल्लीपर्यंतच्या अनेक निवडणुकांना अनुभव असलेल्या शिंदे यांनी पडद्यामागे राहून संपूर्ण निवडणुकीची सूत्रे हलवली.

गेल्या १० ते १५ वर्षांमध्ये दुरावलेल्या अनेक जुन्या सहकाऱ्यांना आणि नेत्यांना त्यांनी एकत्र केले. तसेच वेगवेगळ्या समाज घटकांशी संवाद साधून त्यांना आपल्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न केला. या सर्वांचा निवडणूक निकालावर परिणाम झाल्याचे दिसून आले.

लक्षवेधी...

  • आमदार म्हणून केलेल्या कामाचा प्रणिती शिंदेंना मोठा फायदा

  • शेतकरी आणि पाणी प्रश्‍नावर घेतलेली ठाम भूमिका लोकांना पटली

  • पंढरपूर-मंगळवेढा, मोहोळमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचा निवडणुकीवर मोठा परिणाम

  • सामाजिक समीकरणे योग्यवेळी जुळून आल्याचा लाभ

  • थेट सर्वसामान्य लोकांशी संपर्क असल्याने मतदारांमध्ये आपुलकीची भावना

प्रणिती शिंदे यांची वाटचाल

  • जाई-जुई विचार मंचाच्या माध्यमातून सामाजिक कार्य

  • शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा आमदार

  • काँग्रेसच्या कार्याध्यक्ष

  • ऑल इंडिया काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्य

  • सोलापूर लोकसभेच्या खासदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com