esakal | जिल्ह्यातील तिघांनीच दिला आमदार निधी ! कोरोनासाठी दहा आमदारांकडून दमडाही नाही
sakal

बोलून बातमी शोधा

MLA Fund

जिल्ह्यातील तिघांनीच दिला आमदार निधी ! कोरोनासाठी दहा आमदारांकडून दमडाही नाही

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा कोरोनाला रोखण्यात अपयशी ठरत असतानाच ऑक्‍सिजन, रेमडेसिव्हीर, व्हेंटिलेटरअभावी अनेकांना जीव गमवावा लागत आहे. जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या एक लाखाकडे वाटचाल करीत असून दररोज 40 रुग्णांचा मृत्यू होत आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रत्येक आमदाराने दोन कोटींपैकी एक कोटीचा निधी कोरोनासाठी खर्च करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली. तरीही, जिल्ह्यातील 13 आमदारांपैकी अवघ्या तिघांनीच आतापर्यंत सव्वा कोटीचा निधी दिला आहे.

करमाळा, माळशिरस, माढा, पंढरपूर, बार्शी या तालुक्‍यांसह सोलापूर शहरात रुग्णवाढ मोठी आहे. पंढरपूर तालुक्‍यात सर्वाधिक 13 हजार 516 तर माळशिरस तालुक्‍यात साडेबारा हजार, बार्शी तालुक्‍यात बारा हजारांवर रुग्ण आढळले आहेत. करमाळ्याने सहा हजारांचा टप्पा ओलांडला असून माढ्यातील रुग्णसंख्या साडेआठ हजारांवर पोचली आहे. अक्कलकोट, उत्तर सोलापूर तालुक्‍याची रुग्णसंख्या दोन हजारांच्या आत आहे. दरम्यान, पंढरपूर तालुक्‍यातील 287 तर बार्शी तालुक्‍यातील 285 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. माढ्यातील 173, मोहोळ तालुक्‍यातील 141, करमाळ्यातील 100, अक्‍कलकोट तालुक्‍यातील 97, मंगळवेढ्यातील 79, दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील 82 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तरीही, निवडणुकीपूर्वी गावोगावी फिरून मतदान करा, म्हणणारे आमदार आता पालकमंत्री असो वा अन्य मंत्र्यांच्या बैठकीत व्यासपीठावर दिसतात; मात्र मतदारसंघातील जनता सुरक्षित राहावी, कोरोनामुळे कोणाचाही जीव जाणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या कर्तव्याला त्यांनी बगल दिल्याची चर्चा सुरू आहे. आश्‍चर्याची बाब म्हणजे, दोन कोटींच्या आमदार निधीतील एक कोटीचा निधी कोरोनासंबंधी उपाययोजनांसाठी खर्चास मान्यता असतानाही, त्यांचे हे दुर्लक्ष मनाला चटका लावणारेच आहे.

हेही वाचा: 34 कोरोना रुग्णांवर गुन्हा दाखल ! पॉझिटिव्ह असूनही क्वारंटाइन न होता फिरत होते बिनधास्त

"या' तीन आमदारांनी दिले प्रस्ताव

करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांनी कोरोना उपाययोजनासाठी 20 लाखांच्या मदतीचा प्रस्ताव दिला आहे. तर माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी 65 लाखांच्या निधीचा प्रस्ताव दिला असून आमदार प्रणिती शिंदे यांनी महापालिकेला एक रुग्णवाहिका आणि एक शववाहिका देण्याचा प्रस्ताव जिल्हा नियोजन कार्यालयाला दिला आहे. उर्वरित कोणत्याही आमदारांनी कोरोनासंबंधी मदत करण्यास आमचा निधी वापरावा, अशी मागणी केलेली नाही, असे जिल्हा नियोजन कार्यालयातील सूत्रांनी सांगितले.

रस्ते, बांधकामाच्या कामालाच प्राधान्य

मतदारसंघातील कार्यकर्ते, पक्षातील पदाधिकाऱ्यांना सांभाळण्यासाठी आमदार निधी समाज मंदिर, रस्ते, बांधकामाच्या कामाला कोट्यवधींचा निधी दिला जातो. आता खऱ्या अर्थाने कोरोना काळात मतदारसंघातील जनता सुरक्षित राहावी, तालुक्‍यातील आरोग्य सुविधा सुधारावी, यासाठी आमदार निधी देण्याची गरज आहे. मात्र, दोन कोटींचा निधी सरकारकडून मिळत असतानाही आमदारांची एवढी उदासीनता का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत प्रत्येक आमदाराला 50 लाखांचा निधी कोरोनासाठी देण्यास परवानगी होती. त्या वेळी मोजके आमदार वगळता सर्व आमदारांनी चार कोटी 81 लाखांचा निधी दिला होता. आमदार प्रशांत परिचारक यांना निधी मागण्यात आला, परंतु त्यांनी दिला नाही, असेही सूत्रांनी सांगितले. जिल्ह्यात 11 आमदार व दोन विधान परिषदेचे आमदार असून त्यातील दहा आमदारांनी एक रुपयाही निधी यंदा कोरोनासाठी दिला नाही.

loading image