Pandharpur News : माढ्याच्या उमेदवारीचा सस्पेन्स कायमच; उमेदवारी देण्याचा अधिकार पार्लमेंटरी बोर्डाला

विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकरांची कोणी प्रशंसा केली म्हणून पक्ष त्यांना उमेदवारी देईल, असे होत नाही
Chandrasekhar Bawankule
Chandrasekhar Bawankulesakal

Pandharpur News : पक्ष कोणालाही उमेदवारी देऊ शकतो किंवा कोणालाही थांबवू शकतो. विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकरांची कोणी प्रशंसा केली म्हणून पक्ष त्यांना उमेदवारी देईल, असे होत नाही.

मी स्वतः १५ वर्षे आमदार आणि पाच वर्षे ऊर्जामंत्री म्हणून चांगले काम केले होते, तरीही पक्षाने मला मागील विधानसभा निवडणुकीत थांबवले होते, असे सांगत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांनी, उमेदवारी देण्याचा अधिकार पार्लमेंटरी बोर्डाला असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे माढ्याच्या उमेदवारीचा सस्पेन्स आणि तिढा आणखी वाढला आहे.

माढा लोकसभेच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये सरळसरळ दोन गट पडले आहेत. विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी पुन्हा उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे.

मतदार संघात ४० वर्षांत जेवढा विकास झाला नाही तेवढा पाच वर्षात विकास केल्याचा दावा करत त्यांनी उमेदवारीवर हक्क सांगितला आहे. तर दुसरीकडे, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील यांचे पुतणे भाजपचे जिल्हा संघटक धैर्यशील मोहिते- पाटील यांनीही माढ्यातून उमेदवारी मिळावी, अशी मागणी पक्षाकडे केली आहे. त्यामुळे माढ्यातील उमेदवारीचा तिढा वाढला आहे.

श्री. बानकुळे आज (बुधवारी) पंढरपूर येथे आले होते. यावेळी त्यांना माढ्याच्या उमेदवारीबाबत विचारले असता त्यांनी खासदार निंबाळकरांचे थेट नाव न घेता उमेदवारी देण्याचा निर्णय वरून घेतला जातो, पक्ष कोणालाही थांबवू शकतो, कोणालाही उमेदवारी देऊ शकतो, असे सांगत दोन्ही नेत्यांना सूचक इशारा दिला आहे. माढ्यात उमेदवारीवरून कोणताही तिढा नाही.

तो फक्त वरून दिसतोय. मतभेद आहेत पण मनभेद नाहीत. भाजप शंभर टक्के एकसंघ आहे. त्यामुळे भाजपचा उमेदवार ५१ टक्के मते घेऊन विजयी होईल, असा दावाही बावनकुळे यांनी केला आहे.

अलीकडेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माढ्याचे भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांच्या कामाचे कौतुक करत पुन्हा त्यांनाच उमेदवारी मिळेल, असे संकेत दिले होते.

त्यानंतर मोहिते- पाटील समर्थकांमध्ये खळबळ उडाली होती. श्री. बावनकुळेंच्या या संकेतानंतरही धैर्यशील मोहिते- पाटील यांनी भाजपची उमेदवारी शंभर टक्के मलाच मिळेल, असा दावा केला होता. त्यानंतर मोहिते- पाटील समर्थकांनी ‘आमचं ठरलंय’ या टॅगलाइनखाली ‘भावी खासदार धैर्यशील मोहिते’ असे अनेक भागात बॅनर लावले आहेत.

त्यानंतर खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांच्या समर्थकांनीही सोशल मीडियातून मोहिते- पाटील यांना उत्तर दिले आहे. सध्या निंबाळकर आणि मोहिते- पाटील यांच्या समर्थकांमध्ये उमेदवारीवरून ‘सोशल मीडिया वॉर’ सुरू आहे.

मोहिते-पाटील समर्थकांना काही अंशी दिलासा

श्री. बावनकुळे हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. मंगळवारी (ता. २६) माळशिरस येथे चंद्रशेखर बावनकुळे यांचे खासदार निंबाळकर गटाच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केले होते. तर अकलूज येथे मोहिते- पाटील यांच्याकडून बावनकुळे यांचे जोरदार स्वागत केले. त्यानंतर सुपर वॉरियर्सची बैठक झाली.

त्या बैठकीला मोहिते- पाटील आणि खासदार निंबाळकर एकाच व्यासपीठावर हजर असले, तरी दोन्ही नेत्यांमध्ये असलेला दुरावा स्पष्टपणे दिसून आला. दरम्यान, बानकुळे यांनी खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांच्या कामाचे कौतुक केले;

परंतु त्यांच्या उमेदवारीबाबत स्पष्ट मत व्यक्त न करता ‘उमेदवारीचा निर्णय वर होतो’, असे जाहीर केले. त्यामुळे सध्या तरी मोहिते- पाटील समर्थकांना काही प्रमाणात दिलासा मिळाल्याची चर्चा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com