esakal | अखेर जानकरांना झाला साक्षात्कार ! म्हणाले, भाजपच्या पाठीवर बसून किती दिवस जायचे? 
sakal

बोलून बातमी शोधा

mahadev_jankar.

श्री. जानकर हे आज पक्षाच्या जिल्हा आढावा बैठकीच्या निमित्ताने पंढरपूरला आले होते. कॉंग्रेसचे कार्यकर्ते आदित्य फत्तेपूरकर यांच्या निवासस्थानी त्यांनी सदिच्छा भेट दिली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

अखेर जानकरांना झाला साक्षात्कार ! म्हणाले, भाजपच्या पाठीवर बसून किती दिवस जायचे? 

sakal_logo
By
अभय जोशी

पंढरपूर (सोलापूर) : भाजपकडून लाईट बिल प्रश्नावर आंदोलन होत आहे, ही चांगली गोष्ट आहे. त्यांना आमचा पाठिंबा आहे. आपल्या पक्षाने आधीच आंदोलन केले होते. या माध्यमातून भाजप, रासप, आरपीआय या प्रत्येक पक्षाने आपापली ताकद दाखवून दिली पाहिजे. आपण किती दिवस त्यांच्या पाठीवर बसून जायचे, असा प्रश्न आहे. सर्व पक्ष आपल्या पक्षाच्या वाढीसाठी प्रयत्न करत असतात, त्याप्रमाणे रासप हा एनडीएमध्ये राहून देखील पक्ष वाढीसाठी प्रयत्नशील आहे. राष्ट्रीय समाज पक्षाच्या स्थापनेपासूनच पक्ष स्वतंत्र निवडणुका लढवत आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

श्री. जानकर हे आज पक्षाच्या जिल्हा आढावा बैठकीच्या निमित्ताने पंढरपूरला आले होते. कॉंग्रेसचे कार्यकर्ते आदित्य फत्तेपूरकर यांच्या निवासस्थानी त्यांनी सदिच्छा भेट दिली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

महाविकास आघाडीने वीज बिलाच्या बाबतीत घूमजाव करू नये. शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी लाईट बिल सरसकट पूर्णपणे माफ केले पाहिजे. एखाद्या उद्योगपतीचे बिल एका मिनिटात माफ होते परंतु सामान्य शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या, मध्यमवर्गीयांच्या प्रश्नावर मात्र फार कायदा दाखवण्याचा प्रयत्न होतो. कोरोनामुळे सर्व जनता परेशान आहे. त्यामुळे लाईट बिल माफ करू, असे या सरकारने जाहीर केले होते. त्यानुसार कार्यवाही करावी, अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केली. 

श्री. जानकर म्हणाले, कोणत्याही पक्षाला एखाद्या जातीच्या विरोधात जाणे महागात पडेल. धनगर समाजाची केस कोर्टात आहे. फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनी धनगर समाजाला आदिवासींच्या सवलती राज्यात लागू करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु सध्याच्या राज्य सरकारने बजेटमध्ये त्यासाठी एक रुपयाची देखील तरतूद केली नाही. धनगर समाजाच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. त्याचा खर्च देखील आमचे राज्य सरकार भरत होते. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती आहे. आता मराठा समाजाच्या कामासाठी जसे पैसे भरत आहात त्या पद्धतीने धनगर समाजाच्या वकिलांची फी देखील भरावी आणि फडणवीस सरकारच्या काळात आम्ही ज्या तेरा योजना धनगर समाजासाठी लागू केल्या होत्या, त्यासाठी बजेटमध्ये तरतूद करावी. 

आमदार गोपीचंद पडळकर हे राज्यभर दौरे करत आहेत. त्यामुळे तुम्हाला भाजपकडून साईड ट्रॅक केले जात आहे का, या प्रश्नाला उत्तर देताना श्री. जानकर म्हणाले, बिलकूल तसे काहीही नाही. पक्ष वाढवण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. कोणी कुठे जावे याचे प्रत्येकाला स्वातंत्र आहे. त्यामुळे कोणी कोणाला साईड ट्रॅक करण्याचा प्रश्न नाही. आपण देखील ब्राह्मण समाजातील लोकांना आपल्याकडे वळवू शकतो. आमदार प्रशांत परिचारक हे भारतीय जनता पक्षाचे सहयोगी सदस्य असले तरी उद्या माझ्याही पक्षात ते येऊ शकतात. ते नाही आले तर त्यांचे बंधू उमेश परिचारक माझ्या पक्षात येऊ शकतात. ताकद असेल तो पुढे जात असतो, असे श्री. जानकर यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना नमूद केले आणि परिचारकांच्या पक्ष प्रवेशाच्या संदर्भात कोणतीही चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले. 

पार्थ पवार यांनी पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवावी अशी चर्चा आहे. त्या विषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना श्री. जानकर म्हणाले, पंढरपूरची जनता सूज्ञ आहे. ती योग्य निर्णय घेईल. योग्य त्या उमेदवारालाच विठोबा पावेल. त्यामुळे कोणी आले कोणी गेले तरी फरक पडणार नाही. पंढरपूर विधानसभा मतदार संघात रासपची ताकद नाही. त्यामुळे आपला पक्ष पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभा करणार नसल्याचे श्री. जानकर यांनी स्पष्ट केले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल