महापालिकेत महाविकास आघाडी पक्की! काँग्रेस महिला व अल्पसंख्याक शहराध्यक्ष बदलणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्याप्रमाणे सांगोल्यातही महाविकास आघाडी होईल का?
महापालिकेत महाविकास आघाडी पक्की! काँग्रेस महिला व अल्पसंख्याक शहराध्यक्ष बदलणार

महापालिकेत महाविकास आघाडी पक्की! काँग्रेस महिला व अल्पसंख्याक शहराध्यक्ष बदलणार

सोलापूर : आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून भाजपला शह देण्याची तयारी काँग्रेसने सुरू केली आहे. चेतन नरोटे यांना शहराध्यक्ष केल्यानंतर आता महिला व अल्पसंख्याक शहराध्यक्ष बदलाचे नियोजन पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी केले आहे. फेब्रुवारीत दोन्ही पदांवर नवीन चेहरे दिसतील, असे काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्याने ‘सकाळ’शी बोलताना स्पष्ट केले.

महाविकास आघाडीचे सरकार राज्यात सत्तेवर आल्यानंतर काँग्रेसमधील माजी महापौर नलिनी चंदेले, ॲड. यू. एन. बेरिया, माजी शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी पक्षांतर केले. आता महापालिकेत सत्तेचे स्वप्न पाहणाऱ्या महाविकास आघाडीला विशेषत: काँग्रेसला शिंदे गटाशी देखील सामना करावा लागणार आहे. पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करताना तरुण व महिलांची फळी पक्षासोबत उभी करण्याचे नियोजन शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी केले आहे. दरम्यान, महिला शहराध्यक्षा म्हणून हेमा चिंचोळकर यांनी अनेक वर्षे काम केले आहे. परंतु, पक्षाची ताकद वाढविण्याच्या दृष्टीने महिलांची संख्या अपेक्षेप्रमाणे वाढली नाही. अनेक जुन्या पदाधिकारी, माजी नगरसेविका पक्षापासून दुरावल्याचे बोलले जात आहे. आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी त्या सर्वांना एकत्रित आणले जाणार आहे. दुसरीकडे, अल्पसंख्याक शहराध्यक्षपदी तौफिक हत्तुरे यांना पक्षाने अनेक वर्षे संधी दिली आहे. आता त्या ठिकाणी मुस्लिम समाजातील तरुण चेहऱ्याला संधी मिळणार आहे.

शहराध्यक्षपदी ‘यांना’ मिळणार संधी

महिला शहराध्यक्ष पदासाठी पद्मशाली समाजातील भारती इप्पलपल्ली, मुस्लिम समाजातील फिरदोस पटेल व मागासवर्गीयातून प्रमिला तुपलोंढे यांची नावे आघाडीवर आहेत. पक्षाकडून लिंगायत समाजातील महिलेचाही शोध सुरू आहे. दुसरीकडे, अल्पसंख्याक शहराध्यक्ष पदासाठी मुस्लिम समाजातील जुबेर कुरेशी यांच्या नावाची चर्चा आहे. त्यांनाच संधी मिळेल, असे पक्षातील वरिष्ठ नेत्याने ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे यांच्याशी चर्चा करूनच हा बदल होईल, असेही त्या नेत्याने यावेळी सांगितले.

महापालिकेत महाविकास आघाडीच

आगामी महापालिका निवडणुकीत भाजपला तगडी टक्कर देण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसला स्वतंत्रपणे लढणे परवडणारे नाही. तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे महाविकास आघाडी करून महापालिका निवडणूक लढल्यास निश्चितपणे महापालिकेवर सत्ता मिळू शकते. तत्पूर्वी, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, गणेश वानकर, शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगावकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, महेश कोठे, संतोष पवार यांच्यासह सर्व नेत्यांसोबत बैठक होईल. त्यातून जागावाटप निश्चित होऊन जागांचा तिढा सोडविला जाईल, अशी माहिती काँग्रेस नेत्यांनी दिली.