महेश कोठेंनी विधानसभेलाच नाकारली अजितदादांची ऑफर 

ajitdada pawar
ajitdada pawar

सोलापूर : महापालिकेचे विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी ऑगस्टमध्ये सोलापुरातील सर्वपक्षिय नगरसेवकांच्या विकास निधीसाठी पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांची भेट घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याच्या चर्चेने महेश कोठे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणूकीत करमाळ्यातील अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे यांना जसे राष्ट्रवादी कॉंग्रेसने शेवटच्या टप्प्यात पुरस्कृत उमेदवार केले होते. तशीच ऑफर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी महेश कोठे यांना देखील दिली होती. त्यावेळी कोठे यांनी ही ऑफर साफपणे नाकारली. त्यावेळी ही ऑफर स्विकारली असती तर?...आज राजकारणात काय काय झाले असते? याची रुखरुख आज महेश कोठे यांच्या समर्थकांना आजही लागली आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली ऑफर होती शहर उत्तर विधानसभा मतदार संघातून लढण्याची. 2014 ची विधानसभा निवडणूक महेश कोठे यांनी शहर मध्यमधून शिवसेनेच्या तिकिटावर लढली. आयत्यावेळी राज्यातील शिवसेना-भाजपची युती तुटली आणि भाजपची उमेदवारी मोहिनी पत्की यांना मिळाली. 2014 च्या निवडणूकीचे निकाल समोर आले आणि युती असती तर किंवा महेश कोठे भाजपचे उमेदवार असते तर विजयी झाले असते अशी चर्चा रंगू लागली. 2014 ते 2019 या पाच वर्षात कोठे यांनी शिवसेना की भाजप आणि शहर उत्तर की शहर मध्य? या प्रश्‍नाचे स्पष्टपणे कधी उत्तर दिलेच नाही. कोठे यांची सर्व निर्णय प्रक्रिया शिवसेना-भाजप युतीवर अवलंबून होती. नाही, होय म्हणत 2019 च्या निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपची युती झाली. माजी आमदार दिलीप माने यांच्या आयत्या वेळेच्या शिवसेनेत प्रवेश झाला. महेश कोठे यांची शहर मध्यमधील शिवसेनेची उमेदवारी कापली गेली. 

उमेदवारी कापली तरीही कोठे यांनी शहर उत्तर अणि शहर मध्य अशा दोन्ही मतदार संघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. 2014-19 या पाच वर्षात महेश कोठे यांनी ठेवलेला उत्तर की मध्यचा संभ्रम उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत व त्या दिवसातील मुदतीच्या शेवटच्या मिनिटापर्यंत कायम होता. कोठे यांच्या दोन अर्जाची माहिती अजितदादा पवार यांच्यापर्यंत पोहोचली. त्यावेळी अजित पवारांनी ग्रामीण भागातील समर्थकांमार्फत महेश कोठे यांना ऑफर दिली. मध्यमधील अर्ज मागे घ्या आणि शहर उत्तरमधील अर्जावर तुम्ही विधानसभा निवडणूक लढवा. आमचे राष्ट्रवादीचे शहर उत्तरचे उमेदवार मनोहर सपाटे यांना माघार घ्यायला लावतो आणि तुम्हाला पुरस्कृत करतो, तुम्ही निवडून याल असा विश्‍वासही अजित पवार यांनी महेश कोठे यांना दिला होता. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या या ऑफरबद्दल महेश कोठे म्हणाले, होय मला अजित पवार यांनी शहर उत्तरमधील पुरस्कृत उमेदवारीची ऑफर दिली होती. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत माझ्यावर शहर मध्य विधानसभा मतदार संघात अन्याय झाला होता. मागील पाच वर्षात मी याच मतदार संघात (शहर मध्य) काम केले आहे. या मतदार संघातील नवीन कार्यकर्ते जोडले आहेत. त्यामुळे शहर मध्यमधूनच आमदार होईल असा विश्‍वास होता. शहर उत्तर मतदार संघातील माझा संपर्क कमी झाल्याने मी येथून आमदार होऊ शकणार नाही. म्हणून मी अजित पवारांची ही ऑफर नाकारल्याचे महेश कोठे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com