Maratha Reservation : कुणबी दाखल्यासाठी ५० हजार रुपये; बहुजन संघर्ष सेनेच्या राजाभाऊ कदमांचा आरोप

करमाळा तहसील कार्यालयाला कायमस्वरूपी तहसीलदार मिळावा, म्हणून काढण्यात आलेल्या मोर्चावेळी राजाभाऊ कदम बोलत होते.
Bribe
BribeSakal

करमाळा - एका बाजूला मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात आंदोलने सुरू असतानाच करमाळा तहसील कार्यालयात मात्र कुणबी मराठा दाखले काढण्यासाठी एजंट ५० हजार रुपये घेत असल्याचा आरोप बहुजन सेनेचे राजाभाऊ कदम यांनी केला आहे.

करमाळा तहसील कार्यालयाला कायमस्वरूपी तहसीलदार मिळावा, म्हणून काढण्यात आलेल्या मोर्चावेळी राजाभाऊ कदम बोलत होते. राजाभाऊ कदम यांनी केलेल्या वक्तव्याला जाहीर पाठिंबा मिळू लागला असून, ही एजंटगिरी बंद झाली पाहिजेत अशी मागणी वाढत आहे. एका बाजूला मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे म्हणून राज्यभर आंदोलने सुरू असताना, करमाळा तहसील कार्यालयात घडणाऱ्या या प्रकाराबद्दल जाहीर वक्तव्य झाल्याने याबाबत सर्वत्र उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.

कुणाच्या आशीर्वादाने हे एजंट हे काम करतात, सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक कुणबी मराठा दाखले करमाळा तालुक्यातील दिल्याचे आत्तापर्यंत निष्पन्न झाले आहे. यावरून कुणबी मराठा दाखल्याच्या माध्यमातून किती मोठी आर्थिक उलाढाल झाली आहे याचा अंदाज येतो. वरिष्ठ पातळीवर याची दखल घेण्याची मागणी होत आहे.

सध्या मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, म्हणून प्रयत्न सुरू आहेत आंदोलने सुरू आहेत. करमाळा तहसील कार्यालयात ११ हजारापेक्षा जास्त कुणबीच्या नोंदी सापडल्या आहेत. मात्र या नोंदी नेमक्या कोणाच्या सापडल्या ह्या अद्याप स्पष्ट झालेले नाही.

याशिवाय कुणबी मराठा दाखले काढून देण्यासाठी करमाळा तहसील कार्यालयात एजंटचा सुळसुळाट उठला असून, एका दाखल्यासाठी ५० हजार रुपये द्यावे लागतात ही पिळवणूक अनेक वर्षापासून सुरू आहे. एजंट ने घेतलेल्या ५० हजारातील कुणाला किती पैसे पोचविले जातात याबाबत ही चर्चा सुरू झाली आहे.

माझ्या कुटुंबात कुणबीची नोंद असल्याचे मला समजल्यानंतर दाखला काढण्यासाठी प्रयत्न केला. तहसील कार्यालयातून कुठलेही सहकार्य मिळाले नाही. त्यानंतर एजंट मार्फत दाखला काढण्यासाठी प्रयत्न करण्याचा सल्ला दिला गेला. एजंटमार्फत दाखला काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर दाखला काढण्यासाठी ४० हजार रुपये व कास्ट व्हॅलिडीटी साठी ६० हजार रुपये असे एकूण एक लाख रुपये माझ्याकडून घेतले गेले.

पैसे जास्त होतात म्हटल्यानंतर संबंधित एजंट ने हे पैसे कुठल्या कुठल्या टेबलला किती प्रमाणात द्यावे लागतात हे मला सांगितले. गोरगरीब पालकांना एवढे पैसे देणे परवडणारी गोष्ट नाही. त्यामुळे पैसे देऊन कुणबी दाखले काढणाऱ्या एजंटाचा बंदोबस्त झाला पाहिजे.

- निलचंद भाऊसाहेब दुरंदे, रा.राजुरी, ता.करमाळा, जि.सोलापूर

करमाळा तहसील कार्यालयात एजंटामार्फत कुणबीचे दाखले काढून दिले जात नाहीत. तहसील कार्यालयात एजंट मार्फत कुणबी दाखल्याची प्रकरणे स्वीकारली जात नाहीत. जर अशा पद्धतीने कोणी एजंटगिरी करत असेल तर त्याची तक्रार थेट आमच्याकडे करावी. कुणबी दाखल्यासाठी मदत कक्ष उभारला आहे. नागरिकांनी थेट त्या मदत कक्षाशी संपर्क साधावा. कोणी एजंट म्हणून कुणबी दाखला काढून देण्याचा प्रयत्न करत असेल ही गोष्ट निदर्शनास आले तर त्यांच्यावरती फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात येईल.

- विजयकुमार जाधव, प्रभारी तहसीलदार करमाळा

एजंटाना आळा बसावा

कुणबी मराठा दाखला काढून देणारे एजंट जाहीरपणे महसूल कार्यालयाच्या रेकॉर्ड रूममध्ये जाऊन स्वतःच्या हाताने कागदपत्रे तपासत असताना, अनेकांनी पाहिल्याचे यापूर्वीही सांगितले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात तरी या सर्व प्रकाराला आळा बसावा अशी मागणी करण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com