
Solapur News : सिद्धापुर येथील मातुर्लिंग यात्रा सोमवार पासून...
ब्रह्मपुरी(सोलापूर) : महाराष्ट्रासह आंध्र, कर्नाटक येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मातुर्लिंग यात्रा सिद्धापुर (ता. मंगळवेढा) येथे सोमवार (ता. 16) पासून सुरु होत असून विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती यात्रा समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब नांगरे पाटील यांनी दिली.
कोरोना महामारीमुळे गेली सलग दोन-तीन वर्षे यात्रा रद्द करण्यात आली होती परंतु यावर्षी यात्रा मोठ्या उत्साहात भरणार असून भाविकांना यावर्षी श्री चे दर्शन होणार आहे. मंगळवेढा तालुक्यातील सिध्दापूर येथील मातुर्लिंग गणपतीची यात्रा सोमवारपासुन सुरु होत आहे.
सिध्दापूर पासून तीन किमी अंतरावर भिमा नदीच्या पात्रात गणपतीची स्वयंभु मुर्ती प्रकट झालेली असून नवसाला पावणारा बाळ गणपती म्हणून प्रसिध्द आहे. दरवर्षी संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच किंक्रांतीला येथे मोठी यात्रा भरते.
महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश येथील लाखो भाविकांचे श्रध्दा स्थान असून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. पारंपारीक बैलगाडीतून सहकुटुंब दर्शनाला येणारे भाविक लक्ष वेधून घेतात.
यात्रे दिवशी सोमवार(ता .16) रोजी' श्री'उत्सव मूर्ती गावातून वाजत गाजत मातुलिंग यात्रा स्थळावर मार्गस्थ होते पहाटे सहा वाजता 'श्री 'ची महापूजा आमदार समाधान अवताडे यांच्या हस्ते तर माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.
तसेच खासदार डॉ. जयसिद्धेवर महास्वामी, आमदार प्रशांत परिचारक व प्रमुख भाविक मान्यवर यांच्या उपस्थितीत होणार आहे. सांगली संस्थानकडुन यात्रेतील भक्ताना महाप्रसादाचे वाटप होणार आहे. यावर्षी भीमा नदीच्या पात्रात पाणी नसल्यामुळे भाविकांमध्ये नाराजी आहे.
देवस्थान पासून नदीपात्रामध्ये कॉंक्रिटीकरण करून भाविकांना दर्शनासाठी जाण्यासाठी दुहेरी रस्ता करण्यात आला आहे . मंदिर समितीच्या ट्रस्टकडून भाविकांना श्री चे दर्शन सुलभ व्हावे म्हणून स्वयंभू गणपतीच्या बाजूस दर्शन घेणारी रांग व दर्शन घेऊन जाणारे भाविकना दुतर्फा मार्ग बनवला आहे.
मंगळवेढा एसटी आगाराकडून मंगळवेढा ते सिद्धापूर तसेच मंगळवेढा- माचनूर ते सिद्धापूर या मार्गे ज्यादा एसटी बसेस ची सोय करण्यात आली आहे. यात्रा समिती कडून भाविकांना सुरक्षित सोय म्हणून दोन चाकी,चारचाकी तसेच इतर वाहनासाठी स्वतंत्र वाहनतळाची सोय करण्यात आली आहे.
यात्रा ठिकाणी भाविकांना स्वच्छ पिण्याचे पाणी व्यवस्था, आरोग्य सुविधा,यात्रेत भाविकाना धुळीचा त्रास होऊ नये म्हणुन मंदीर परीसर व यात्रापरीसर धुळविहीरीत करण्यात आला आहे.यात्राकालावधीमध्ये अनुचितप्रकार घडु नये म्हणुन उप विभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील , पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी यांनी यात्रा परिसरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवला आहे.
संध्याकाळी श्री च्या पालखीसमोर गावातील प्रमुख मार्गांवर शोभेचे अतिषबाजी करण्यात येणार आहे. रात्री 9:30 वाजता भाविकाच्या मनोरंजनासाठी कन्नड सामाजिक नाटक "गर्ती हेनगे गर्वद गडू "चे सादरीकरण मातृलिंग मंदीर ट्रस्टच्यावतीने होणार असल्याची माहिती यात्रा समितीने दिली.यात्रा यशस्वी करण्यासाठी सिध्दापुर ग्रामस्थ व भाविक परीश्रम घेत आहेत.