esakal | पालकमंत्र्यांची पोलिस बंदोबस्तात बैठक ! बंदोबस्ताचे "हे' होते कारण

बोलून बातमी शोधा

Police Security
पालकमंत्र्यांची पोलिस बंदोबस्तात बैठक ! बंदोबस्ताचे "हे' होते कारण
sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : शहर-जिल्ह्यातील कोरोना वाढत असतानाही पालकमंत्र्यांनी लक्ष दिले नाही. उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी इंदापूरला पळविल्याची अफवा, यामुळे त्यांच्याविरुद्ध नाराजीचा सूर होता. या पार्श्‍वभूमीवर त्यांना काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध केला जाणार आहे. त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली जाणार असून अंगावर शाई टाकण्याचाही प्रयत्न होऊ शकतो, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या आयोजित बैठकीला मोठा तगडा बंदोबस्त लावण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज अक्‍कलकोट, दक्षिण व उत्तर सोलापूर आणि शहरातील कोरोनाचा आढावा घेतला. नियोजन भवनात दोन तासांहून अधिक काळ बैठक पार पडली. त्या वेळी खासदार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, आमदार, महापौर, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिकेचे आयुक्‍त आदी उपस्थित होते.

दरम्यान, उजनीचे पाणी आणि शहर-जिल्ह्यातील वाढलेला कोरोना, या पार्श्‍वभूमीवर पालकमंत्र्यांचा निषेध व्यक्‍त करीत त्यांना काळे झेंडे दाखविण्यात येणार होते. तर काहीजण शाई अंगावर टाकणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे या बैठकीवेळी विजयपूर रोडवरील वाहतूक बंद करण्यात आली होती. सात रस्ता परिसरात व मराठी पत्रकार भवन हा मार्ग वाहतुकीसाठी बंद केला होता. बैठकीवेळी नियोजन भवनाबाहेर सदर बझार, विजापूर नाका पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी व कर्मचारी, आरसीपी जवानांची एक तुकडीसह पोलिस उपायुक्‍त, सहायक पोलिस आयुक्‍तांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. अधिकाऱ्यांशिवाय बैठकीसाठी येणाऱ्यांची कसून चौकशी करण्यात आली. त्यावेळी अनेकजण नाराजदेखील झाले, परंतु बैठकीनंतर पालकमंत्र्यांनी सर्वांची दिलगिरी व्यक्‍त केली.

सुरेश पाटील यांना अटक व सुटका

पालकमंत्र्यांच्या बैठकीला महापौर श्रीकांचना यन्नम, सभागृह नेते श्रीनिवास करली, नगरसेवक आनंद चंदनशिवे, चेतन नरोटे, तौफिक शेख, किसन जाधव, विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, राष्ट्रवादीचे पदाधिकारी भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, जुबेर बागवान आदी उपस्थित होते. दरम्यान, बैठकीला येण्यापूर्वीच सुरेश पाटील यांना गेटवर पोलिसांनी अडविले. त्यांनी काळे कपडे व टोपी घातली होती. पालकमंत्र्यांविरूध्द त्यांनी त्याठिकाणी घोषणा बाजी करीत पालकमंत्री बदलून आमदार प्रणिती शिंदे यांना त्याची जबाबदारी द्यावी, अशी मागणी केली. विजापूर नाका पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन काही वेळाने त्यांना सोडून दिले. तत्पूर्वी, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष गणेश वानकर, महापालिकेचे सभागृह नेते श्रीनिवास करली यांनाही पोलिसांनी अडविले होते. तर माध्यम प्रतिनिधींचे पोलिसांनी खिसे तपासले आणि आत प्रवेश दिला.