

solapur city accident
sakal
सोलापूर : ट्रकला ओव्हरटेक करून पुढे जात असताना ट्रकने वळण घेतले आणि दुचाकीवरील दोघेही ट्रकखाली आले. त्यात बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) येथील दोन तरुण जागीच ठार झाले. हा भीषण अपघात शुक्रवारी (ता. २७) सकाळी आठच्या सुमारास सोलापूर शहरातील जुना बोरामणी नाका चौकात झाला. वजिरोद्दीन अल्लाउद्दीन पटेल (वय ३६), सैफन शेखफरीद पटेल (वय ४०, दोघेही रा. बोरामणी) अशी मृतांची नावे आहेत.
उन्हाच्या आधी ऑर्डर घेऊन परत गावी येता येईल म्हणून वजिरोद्दीन व सैफन दोघेही सकाळी साडेसात वाजताच घरातून बाहेर पडले होते. बाजार समितीकडून जुना बोरामणी नाका चौकातून सोलापूर शहरात येत असताना हा अपघात झाला. ट्रकला ओव्हरटेक करून दोघेही पुढे जात होते, पण त्यांच्यासमोर चारचाकी होती. त्यामुळे त्यांना ओव्हरटेक करता आले नाही. चौकातून शांती नगराच्या दिशेने निघालेल्या ट्रक चालकाने वळण घ्यायचे असल्याने वेग कमी केला. त्यावेळी समोरील कार कन्ना चौकाच्या दिशेने पुढे निघून गेली. ट्रक देखील सरळ पुढे जाईल, असा दुचाकीस्वारांचा अंदाज होता. त्यामुळे त्यांनी आहे तशीच दुचाकी थेट पुढे नेली. त्याचवेळी ट्रकने शांती नगराच्या दिशेने वळण घेतले आणि त्यांची दुचाकी ट्रकखाली आली. दोघांच्याही अंगावरून ट्रक गेल्याने दोघेही जागीच ठार झाले.
एकजण दुचाकीजवळ तर दुसरा ट्रकच्या मागील चाकाखाली आला होता. अपघातानंतर ट्रकचालक काही फुटांवर जाऊन थांबला. हा भीषण अपघात तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अपघातानंतर पोलिसांनी ट्रक चालकास ताब्यात घेतले. मृताचा भाऊ शुकूर अल्लाउद्दीन पटेल यांच्या फिर्यादीवरून ट्रकचालक सलीम इस्माईलसाब भैरामगडी (रा. सुटणर, ता. आळंद, कलबुर्गी) याच्याविरुद्ध जेलरोड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
स्वयंपाकाची ऑर्डर घ्यायला जाताना अपघात
बोरामणी येथील वजिरोद्दीन व सैफन हे एकाच गावातील नातेवाईक होते. दोघे मिळून आचारी तथा स्वयंपाकी म्हणून काम करीत होते. पानमंगळूर (ता. अक्कलकोट) येथील कार्यक्रमाची ऑर्डर घ्यायला ते निघाले होते. सोलापूर शहरातील किरकोळ कामे उरकून दोघेही त्या गावाला जाणार होते. त्यांचा तोच निर्णय चुकला आणि काळाने त्यांच्यावर घाला घातला. अपघाताची वार्ता समजताच गावातील नातेवाइकांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मोठी गर्दी केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.