esakal | 'या' निवडणुकीतील विजयानंतर प्रणिती शिंदेंना मंत्रिपद? प्रचाराची ठरली टीम
sakal

बोलून बातमी शोधा

'या' निवडणुकीतील विजयानंतर प्रणिती शिंदेंना मंत्रिपद? प्रचाराची ठरली टीम

मोदी लाटेत हातून निसटलेली महापालिकेवरील सत्ता पुन्हा मिळविण्यासाठी कॉंग्रेसने रणनीती तयार करायला सुरवात केली आहे.

'या' निवडणुकीतील विजयानंतर प्रणिती शिंदेंना मंत्रिपद?

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : मोदी लाटेत हातून निसटलेली महापालिकेवरील (Solapur Municipal Corporation) सत्ता पुन्हा मिळविण्यासाठी कॉंग्रेसने (Congress) रणनीती तयार करायला सुरवात केली आहे. आमदार प्रणिती शिंदे (MLA Praniti Shinde) यांच्यावर प्रमुख जबाबदारी असून त्यांच्या नेतृत्वाखाली प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्यांची नावे काढली आहेत. दुसरीकडे, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh), राज्यमंत्री विश्‍वजित कदम (Vishwjit Kadam), आमदार धीरज देशमुख (MLA Dheeraj Deshmukh) यांनाही प्रचारासाठी बोलावण्याचे नियोजन केले जात आहे. काहीही करून महापालिकेवर सत्ता मिळवायचीच, असा संकल्प शहराध्यक्ष प्रकाश वाले (Prakash Wale) यांनी केला आहे. महापालिकेवर सत्ता मिळविल्यानंतर कदाचित मंत्रिमंडळ (Cabinet) विस्तारात प्रणिती शिंदे यांना संधी मिळण्याची शक्‍यता आहे.

हेही वाचा: ओबीसी आरक्षणावरून प्रणिती शिंदे म्हणाल्या, 'या' समाजानेच टिकवली लोकशाही

2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना दुसऱ्यांदा पराभवाला सामोरे जावे लागले. त्या वेळी मोदी लाट ओसरलेली नव्हती आणि कॉंग्रेसमधून माजी आमदार दिलीप माने हे शिवसेनेत गेले होते. त्यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात शिवसेनेकडून उमेदवारी मिळविली. दुसरीकडे, शिवसेनेकडून उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले महेश कोठे यांनी बंडखोरी करून शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. माजी आमदार नरसय्या आडम यांच्याबरोबरच एमआयएमचे उमेदवार फारुख शाब्दी यांचेही प्रणितींसमोर तगडे आव्हान होते. या पार्श्‍वभूमीवर आमदार प्रणिती शिंदे यांचा पराभव निश्‍चितपणे होणार, असा अनेकांनी अंदाज वर्तविला. मात्र, सर्वांना पराभूत करून तिसऱ्यांदा प्रणिती शिंदे यांनी विधानसभा गाठली. परंतु, लोकसभेचा बालेकिल्ला मजबूत करण्यासाठी अक्‍कलकोट, दक्षिण सोलापूर आणि महापालिका यावर कॉंग्रेसची सत्ता महत्त्वाची आहे. त्यानंतर आगामी काळातील मंत्रिमंडळ विस्तारात आमदार प्रणिती शिंदे यांना जिल्ह्यातील कॉंग्रेसची ताकद वाढविण्याच्या निमित्ताने मंत्रिमंडळात संधी मिळेल, असा अंदाज वर्तविला जात आहे.

श्रीदेवी फुलारे, प्रिया माने हे कॉंग्रेसमध्ये नाहीत

कॉंग्रेस पक्षाकडून स्वत:च्या व पक्षाच्या ताकदीवर निवडून आलेले महापालिकेत 14 नगरसेवक आहेत. त्यापैकी नगरसेविका श्रीदेवी फुलारे आणि प्रिया माने यांनी पक्षाचे काम सोडून दिल्याचे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांना पक्षाने गृहीत न धरता संभाव्य उमेदवारांची यादी तयार केल्याचेही सांगण्यात आले.

हेही वाचा: मोठा निर्णय! ग्रामसेवक, सरपंच ठरवणार गावगाड्यातील भटक्‍यांची जात

"या' पदाधिकाऱ्यांवर असणार प्रचाराची धुरा

आमदार प्रणिती शिंदे यांच्यासोबत शहरातील विविध प्रभागांमध्ये प्रचारासाठी जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील, शहराध्यक्ष प्रकाश वाले, माजी महापौर ऍड. यू. एन. बेरिया, संजय हेमगड्डी, अलका राठोड, नलिनी चंदेले, माजी आमदार विश्‍वनाथ चाकोते, चेतन नरोटे, विनोद भोसले, उदशंकर चाकोते, सुदीप चाकोते, अरुणा वर्मा, अरुणा वाकसे, लता गुंडला, भारती इप्पलपल्ली, नंदा कांगरे, बाबूराव म्हेत्रे, लक्ष्मीकांत साका, राहुल वर्धा, अरुण साठे, देवा गायकवाड, आसिफ नदाफ, प्रकाश कोडम, नागनाथ कदम यांच्यावर जबाबदारी असणार आहे.

महापालिकेसाठी तगडी फाईट

महापालिकेवर एकहाती सत्ता मिळविण्यासाठी कॉंग्रेसला विरोधी पक्ष भाजपबरोबरच राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, एमआयएम या चार पक्षांशी टक्‍कर द्यावी लागणार आहे. राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचारासाठी आमदार संजय शिंदे हे शहरात तळ ठोकून राहतील. संघटन कौशल्यातून समोरील व्यक्‍तीला आपलेसे करण्याची कला त्यांच्याकडे असून तौफिक शेख, महेश कोठे, आनंद चंदनशिवे यांच्यामुळे राष्ट्रवादीची ताकद आणखी वाढली आहे. दुसरीकडे, भाजपनेही काही उमेदवार बदलून तगड्यांना संधी देण्याची रणनीती आखली आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांशी खरा सामना कॉंग्रेसला करावा लागणार आहे.

loading image
go to top