
एटीएम च्या सुरक्षेसाठी बँकांनी सुरक्षा रक्षक नेमावा असे विविध बँकांना पोलीस विभागाने लेखी पत्र देऊनही अनेक बँकांनी त्याची अंमलबजावणी न केल्याने मोहोळ तालुक्यातील एटीएम च्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर.
'मोहोळ शहरासह ग्रामीण भागातील एटीएम च्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर'
मोहोळ - एटीएम च्या सुरक्षेसाठी बँकांनी सुरक्षा रक्षक नेमावा असे विविध बँकांना पोलीस विभागाने लेखी पत्र देऊनही अनेक बँकांनी त्याची अंमलबजावणी न केल्याने मोहोळ तालुक्यातील एटीएम च्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गेल्या एक महिन्यापूर्वी मोहोळ व कुरूल येथील एटीएम फोडीचा तपास लागतो ना लागतो तोच 23 जुलै रोजी पुन्हा मोहोळ शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला.
मोहोळचे वाढते शहरीकरण, दररोजच्या व्यवहारासाठी बँकेत होणारी गर्दी टाळण्यासाठी बँकांनी एटीएमची पद्धत सुरू केली, याचा नागरिकांना फायदा तर झालाच परंतु बँकेतील कर्मचाऱ्यांच्या कामाचा ताणही कमी झाला. या दोन गोष्टी फायद्याच्या असल्या तरी एटीएम च्या सुरक्षेसाठी कुठल्याही बँकेला त्याचे गांभीर्य नसल्याचे उघड झाले आहे. एटीएम फोडीच्या घटना घडल्यानंतर मोहोळचे पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी सर्व बँक अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यात सुरक्षेविषयी चर्चा करून प्रत्येक बँक अधिकाऱ्याला सुरक्षा रक्षक नेमण्याबाबत लेखी पत्र दिले, मात्र त्याची अंमलबजावणी अतिशय कमी बँकांनी केली मात्र त्या पत्राला केराची टोपली दाखविण्याचे काम जास्तीत जास्त बँकांनी केले.
मोहोळ शहरासह ग्रामीण भागात स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, जिल्हा मध्यवर्ती बँक, विदर्भ कोकण बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, युनायटेड वेस्टर्न बँक, देना बँक या बँकांच्या सुमारे 40 ते 45 शाखा आहेत, तर शहरासह ग्रामीण भागातील एटीएम ची संख्या ही 100 च्या आसपास आहे. कुठल्याही बँकेचे एटीएम फोडून त्यातील रकमेची चोरी झाल्यानंतर ते एटीएम कायदेशीर सोपस्कार पार पाडून पुन्हा पूर्वपदावर येण्यासाठी अंदाजे तीन ते चार दिवसाचा कालावधी जातो. तोपर्यंत नागरिकांचा वेळ व पैसा वाया जातो. दिवसभर नागरिक असतात, बँकेचे अधिकारी असतात मात्र सुरक्षा रक्षकाची गरज ही रात्री असते. रात्री नऊ ते सकाळी नऊ अशा वेळेत सुरक्षा रक्षकांची आवश्यकता असते. मात्र त्याची काटेकोर अंमलबजावणी झाली तरच अशा घटना थांबणार आहेत.
प्रतिक्रिया -
एटीएम च्या सुरक्षे बाबत पोलीस खात्यासह वरिष्ठाशी पत्रव्यवहार झाला आहे. एटीएम हे ठेकेदारी पद्धतीने चालवले जात आहेत. जो पर्यंत ठेका घेणाऱ्याला सुरक्षा रक्षक नेमल्या शिवाय आम्ही ठेका देणार नाही असा नियम लावतील त्यावेळेला या घटनांना आळा बसणार आहे.
- उत्तमकुमार गावडे, वरिष्ठ मॅनेजर स्टेट बँक ऑफ इंडिया मोहोळ.
प्रतिक्रीया -
अशा वारंवार घडणाऱ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सर्व बँक अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना सुरक्षा रक्षक नेमण्याबाबत सूचना दिल्या आहेत, त्यांनी त्याचे काटेकोर पालन करावे.
- अशोक सायकर, पोलीस निरीक्षक मोहोळ पोलीस ठाणे
Web Title: Mohol City Atm Security
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..