esakal | काळजी घ्या बाबांनो ! आज 40 जणांचा मृत्यू; मृतांमध्ये 14 जणांचे वय 50 पेक्षाही कमी
sakal

बोलून बातमी शोधा

Corona

काळजी घ्या बाबांनो ! आज 40 जणांचा मृत्यू; मृतांमध्ये 14 जणांचे वय 50 पेक्षाही कमी

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : शहरातील व ग्रामीण भागातील रुग्णसंख्या कमी करण्याच्या दृष्टीने प्रशासनाचे प्रयत्न सुरू असतानाच मृतांची संख्या वाढू लागल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. आज कोरोना काळातील सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली असून शहरातील 23 तर ग्रामीणमध्ये 17 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, शहरात 436 तर ग्रामीणमध्ये आज 709 रुग्ण आढळले असून शहर-जिल्ह्यातील एक हजार 335 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता वाढत असतानाच मध्यम व तीव्र, अतितीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या लक्षणीय असल्याचे चित्र आहे. आज मृत्यू झालेल्यांपैकी बरेच रुग्ण उपचारासाठी विलंबाने रुग्णालयात दाखल झाल्याचेही अहवालावरून स्पष्ट होते. लक्षणे असलेल्यांनी तत्काळ कोरोना टेस्ट करून रुग्णालयात उपचार घ्यावेत, असे आरोग्य विभागाने आवाहन करूनही अनेकजण आजार अंगावर काढू लागले आहेत. मृतांची कारणे शोधण्यासाठी प्रशासनाने स्वतंत्र नियोजन केले आहे. परंतु, मृत्यूदर रोखण्याचे प्रमुख आव्हान आता प्रशासनासमोर आहे.

आतापर्यंत शहरात 21 हजार 982 रुग्ण आढळले असून त्यापैकी 919 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 17 हजार 534 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून उर्वरित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दुसरीकडे, ग्रामीण भागात आजवर 59 हजार 19 व्यक्‍ती कोरोना बाधित आढळल्या असून त्यातील एक हजार 415 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 50 हजार 293 रुग्णांनी कोरोनावर मात करीत घर गाठले असून उर्वरित सात हजार 311 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

अशी घ्या खबरदारी...

  • अनावश्‍यक कामासाठी घराबाहेर पडू नका; मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा

  • कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस टोचून घ्या; गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा

  • सर्दी, ताप, खोकला, दम लागणे, हातपाय दुखणे, अशी लक्षणे असल्यास कोरोना टेस्ट करून घ्या

  • आजार अंगावर काढू नका; स्वत:बरोबरच कुटुंबीयांच्या आरोग्याचीही काळजी घ्या

ठळक बाबी...

  • आज शहरातील 23 तर ग्रामीणमधील 17 रुग्णांचा कोरोनाने घेतला बळी

  • कोरोना काळातील सर्वाधिक मृत्यूची नोंद; शहर-जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार 334 मृत्यू

  • आज 1145 रुग्ण नव्याने आढळले तर 1335 जण बरे होऊन घरी परतले

  • सोलापूर शहरातील 23 जणांचा कोरोनामुळे मृत्यू; मृतांमध्ये दहा रुग्णांचे वय 50 पेक्षाही कमी

  • ग्रामीण भागातील 17 रुग्णांचा आज कोरोनाने घेतला बळी; चार रुग्णांचे वय 50 पेक्षाही कमीच