उन्हामुळे पुढील आठवड्यापासून सकाळची शाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Morning school from next week due to sun 10th 12th exams

उन्हामुळे पुढील आठवड्यापासून सकाळची शाळा

सोलापूर : उन्हाचा कडाका वाढत असल्याने आणि दहावी- बारावीच्या परीक्षांच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील झेडपीच्या शाळा सकाळच्या सत्रात भरतील, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी दिली. ३ मार्च रोजी शिक्षण समितीची बैठक होणार असून त्यावेळी त्यासंबंधीचा अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

जिल्ह्यात झेडपीच्या दोन हजार ७९६ शाळा आहेत. त्या शाळांमध्ये एक लाख ५० हजार ३४८ मुले प्रवेशित आहेत. कोरोनाच्या संकटामुळे यंदा शाळा खूपच विलंबाने सुरू झाल्या आहेत. १ फेब्रुवारीपासून शाळा सुरू झाल्या, परंतु आता उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढू लागला आहे. या पार्श्‍वभूमीवर काही पालकांनी मुलांना शाळेत पाठविणेच बंद केल्याचे चित्र आहे. विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होणार नाही, त्यांची गैरहजेरी वाढणार नाही, याची खबरदारी घेऊन आता पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा (जिल्हा परिषद) सकाळच्या सत्रात भरविली जाणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षण विभागाचे सभापती, समिती त्यासंबंधीचा अंतिम निर्णय दोन-तीन दिवसांत घेतील. माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यासंदर्भात काहीच सांगितलेले नाही. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे पेपर सकाळी साडेदहा वाजताच सुरू होणार असल्याने पाचवी ते नववीच्या मुलांच्या शाळांबाबत ते काय निर्णय घेतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आरटीई प्रवेशासाठी वय निश्‍चित

चालू शैक्षणिक वर्षात ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्‍के प्रवेश सवलतीत दिले जातात. त्यासाठी बालकांचे किमान वय निश्‍चित करण्यात आले आहे. शाळा प्रवेशासाठी बालकाचे वय निश्‍चित करण्यासाठी १८ सप्टेंबर २०२० रोजीच्या शासन निर्णयानुसार मानीव दिनांक ३१ डिसेंबर निश्‍चित करण्यात आला आहे. त्यामागे जुलै ते नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये हा हेतू आहे. त्यानुसार प्ले-ग्रुप, नर्सरीसाठी १ जुलै २०१८ ते ३१ डिसेंबर २०१९ (चार वर्षे पाच महिने ३० दिवस), ज्युनियर केजीसाठी १ जुलै २०१७ ते ३१ डिसेंबर २०१८ (पाच वर्षे पाच महिने ३० दिवस) आणि सिनियर केजीसाठी १ जुलै २०१६ ते ३१ डिसेंबर २०१७ (सहा वर्षे पाच महिने ३० दिवस) आणि पहिलीसाठी १ जुलै २०१५ ते ३१ डिसेंबर २०१६ (सात वर्षे पाच महिने ३० दिवस) अशी वयोमर्यादा निश्‍चित करण्यात आली आहे.

दरवर्षी उन्हाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर मार्च महिन्यात मुलांची शाळा सकाळच्या सत्रात भरविली जाते. आता उन्ह वाढू लागले असून शाळेची वेळ सकाळी करण्यासंदर्भात ३ मार्च रोजी शिक्षण समितीत अंतिम निर्णय होईल.

- किरण लोहार, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर जिल्हा परिषद