'एमआयएम'चे खासदार ओवेसींची बिगर नंबरप्लेटची गाडी! दोनशे रुपयांचा दंड | Solapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'एमआयएम'चे खासदार ओवेसींची बिगर नंबरप्लेटची गाडी! दोनशे रुपयांचा दंड
'एमआयएम'चे खासदार ओवेसींची बिगर नंबरप्लेटची गाडी! दोनशे रुपयांचा दंड

'MIM'चे खासदार ओवेसींची बिगर नंबरप्लेटची गाडी! दोनशे रुपयांचा दंड

सोलापूर : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आज (मंगळवारी) सोलापुरात खासदार बॅरिस्टर असदोद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्या उपस्थितीत एमआयएमचा (MIM) मेळावा होत आहे. सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात हा मेळावा होत असून त्यासाठी खासदार ओवेसी हे हैदराबादहून (Hyderabad) सोलापुरात आले आहेत. सर्वप्रथम शासकीय विश्रामगृहात ते दाखल झाले. त्यावेळी त्यांच्या गाडीला समोरील बाजूस नंबरप्लेट नव्हती. त्या ठिकाणी उपस्थित वाहतूक पोलिसांनी त्यांच्या गाडीला दोनशे रुपयांचा दंड ठोठावला. त्यानंतर चालकाने तत्काळ नंबरप्लेट (टीएस 11, ईव्ही 9922) लावून घेतली.

एमआयएमचा सोलापुरात मेळावा होत असल्याने सात रस्ता परिसरातील शासकीय विश्रामगृह परिसरात वाहतूक व शहर पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता. खासदार ओवेसी हे सकाळी दहाच्या सुमारास शासकीय विश्रामगृहात दाखल झाले. त्यांचे वाहन शासकीय विश्रागृहात दाखल झाल्यानंतर त्यांच्या गाडीला समोरील बाजूस नंबरप्लेट नव्हती, परंतु मागील बाजूला नंबरप्लेट लावलेली होती. वाहतूक पोलिस शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रमेश चिंताकिंदी यांनी केंद्रीय मोटार वाहन नियमानुसार त्यांच्या गाडीचा फोटो काढून घेतला. कारवाई करताना खासदार ओवेसी यांचे चालक त्या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी दोनशे रुपये दंड रोखीने भरला.

दरम्यान, वाहतूक पोलिसांनी त्यांना वाहनाला नंबरप्लेट लावण्याच्या सूचना केल्या. त्यावेळी चालकाने तत्काळ समोरील बाजूस नंबरप्लेट लावून घेतली. बेशिस्त वाहनचालकांना शिस्तीचे धडे देत असताना सोलापूर शहर वाहतूक पोलिसांनी खासदार ओवेसी यांच्या गाडीलाही सोडले नाही. सोशल मीडियातून त्या वाहतूक पोलिसांचे कौतुक केले जात आहे. एमआयएमचे जिल्हाध्यक्ष फारुख शाब्दी यांनी आयोजित केलेल्या पक्षाच्या मेळाव्यासाठी औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलिल हेदेखील उपस्थित आहेत.

ठळक बाबी...

  • एमआयएमचे खासदार असदोद्दीन ओवेसींच्या उपस्थितीत सोलापुरात आज मेळावा

  • शहरात जमावबंदी असतानाही होतोय मेळावा; महापालिकेने दिली परवानगी

  • पोलिसांनी बंद केला महापालिकेसमोरून जाणारा मार्ग; मेळाव्याला मोठी गर्दी

  • हैदराबादहून सोलापुरात दाखल झालेल्या खासदार ओवेसींच्या गाडीला पुढच्या बाजूला नव्हती नंबरप्लेट

  • सोलापूर वाहतूक पोलिसांनी केंद्रीय मोटार वाहन अधिनियमानुसार केला दोनशे रुपयांचा दंड

loading image
go to top