
पंढरपूर (सोलापूर) ः पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदार संघात निवडणूक जाहीर झालेली असताना स्थानिक नेत्यांमधील मतभेद संपलेले नाहीत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारी वरुन पेच निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर थेट उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उद्या (ता.21) पंढरपुरात येणार आहेत. या दौऱ्यानंतर भगीरथ भालके किंवा (कै.) भारत भालके यांच्या पत्नी जयश्री भालके यांच्या पैकी एका नावावर शिक्कामोर्तब होणार का अन्य पर्यायांचा विचार होणार या विषयी उत्सुकता आहे.
दोन्ही नेते पंढरपुरात
अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या दौऱ्याची माहिती देण्यासाठी माजी आमदार दीपक साळुंखे यांनी पंढरपुरात पत्रकार परिषद घेतली. सकाळी नऊ वाजता दोन्ही नेते पंढरपुरात येणार असून कोर्टी रस्त्यावरील श्रीयश पॅलेस येथे प्रमुख कार्यकर्त्यांच्या सोबत विचारविनिमय करणार आहेत. सहकार शिरोमणी वसंतराव काळे कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे हे उद्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत किंवा नाहीत या विषयी आपल्याला कल्पना नसल्याचे सांगून त्यांनी अधिक बोलणे टाळले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार (कै.) भारत भालके यांच्या निधनामुळे पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात कोणाला उमेदवारी द्यायची यावरुन पक्षापुढे पेच निर्माण झाला आहे. श्री विठ्ठल कारखान्याच्या अध्यक्षपदासाठी माजी आमदार (कै.) औदुंबरआण्णा पाटील यांचे नातू व कारखान्याचे संचालक युवराज पाटील यांनी दावा केला होता परंतु वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेवरुन (कै.) भालके यांचे पुत्र भगीरथ यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यानंतर तालुकाध्यक्ष म्हणून ऍड. दिपक पवार हे हिरीरीने काम करत असताना त्यांना कोणतीही कल्पना न देता त्यांना हटवून विठ्ठल कारखान्याचे संचालक विजयसिंह पवार यांची तालुकाध्यक्षपदी निवड झाली.या दोन्ही निवडीतून अनेक कार्यकर्ते दुखावले गेले. युवराज पाटील, ऍड. दीपक भोसले, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. गणेश पाटील यांनी एकत्र येऊन तीव्र नाराजी व्यक्त केली. भगीरथ भालकेंच्या उमेदवारीला अनेकांनी विरोध सुरू केल्याने पक्षापुढे पेच निर्माण झाला आहे.
निवडणूक जाहीर झालेली असताना पक्षातील धूसफूस वाढत चालली आहे. पक्षाच्या जिल्हा आणि स्थानिक नेतेमंडळीत ताळमेळ राहिलेला नाही. संबंधितांकडून प्रयत्न करुन देखील मतभेद संपत नसल्याने अजित पवार आणि थेट पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनाच पंढरपूरला येणे भाग पडले आहे. त्यामुळे मतदार संघात उद्याच्या दौऱ्याविषयी कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.
नाराज मंडळींची समजूत घालून त्यांना भगीरथ भालके यांच्या पाठीशी उभा करणे, भगीरथ भालके यांच्या ऐवजी (कै.) भारत भालके यांच्या पत्नी जयश्री भालके यांना उमेदवारी देऊन नाराज मंडळींची नाराजी कमी करणे हे दोन प्रमुख पर्याय पक्षापुढे आहेत. भालके कुटुंबात उमेदवारी देण्याऐवजी दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे किंवा डिव्हीपी उद्योग समूहाचे प्रमुख अभिजित पाटील यांच्या पैकी एका नावावर सहमती घडवता येईल का या दृष्टीने देखील या नेत्यांकडून प्रयत्न होण्याची शक्यता आहे. मतदारसंघात महाविकास आघाडीची ताकद मोठी असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याला महत्त्व आहे. भगीरथ यांना उमेदवारी देण्याची मागणी पक्ष निरीक्षकांच्या उपस्थितीत झालेली असताना ही त्यांच्या नावाला अद्याप हिरवा कंदील पक्षाने दिलेला नाही. त्यामुळे श्री.पवार व श्री.पाटील उद्याच्या दौऱ्याला महत्त्व आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नसताना भाजपाकडून देखील पर्यायी उमेदवारांच्या नावाची चाचपणी सुरु आहे. परंतु कमळ चिन्हावर निवडणूक लढवल्यास मुस्लिम आणि अन्य धर्मियांची मते मिळत नाहीत त्याऐवजी राष्ट्रीय समाज पक्षासारख्या पक्षाची उमेदवारी मिळवत भाजपाचा पाठिंबा मिळवत निवडणुकीच्या रिंगणात उतरता येईल काय या दृष्टीने संबंधितांकडून चाचपणी सुरु आहे. वंचित बहुजन आघाडी, स्वाभीमानी शेतकरी संघटना यांनीही निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरु केली असल्याने मतदारसंघातील उत्सुकता वाढली आहे.
संपादन : अरविंद मोटे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.