"सहनही होईना अन्‌ सांगताही येईना ! सोशल मीडियाद्वारे तरुणींची होणारी फसवणूक थांबवा' 

Social Media
Social Media

दक्षिण सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यात समाज माध्यमाच्या (सोशल मीडिया) वापरातून होत असलेली तरुण-तरुणींची आर्थिक, सामाजिक व मानसिक फसवणूक थांबवण्यासाठी विविध समाजसंस्था व संघटनांसह विशेषतः पोलिसांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता राज सलगर यांनी केली. 

सोशल मीडियाच्या वापरातून अनेक तरुण- तरुणी सहज फसले जात आहेत. अशा फसलेल्या अनेकांची अवस्था "सहन होईना अन्‌ सांगताही येईना' अशी झाल्याने जीवनयात्रा संपवण्याचा मार्ग अवलंबावा लागल्याचे दिसून येते. सोशल मीडियावर काही टोळ्यांनी सोलापूर जिल्ह्यातील तरुण- तरुणींना फसवण्यासाठी पद्धतशीर व्यूहरचना केल्याचे दिसत आहे. या टोळ्यांच्या जाळ्यात अनेक सुशिक्षित तरुण अडकत आहेत. त्यामुळे अशा युवकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

या टोळ्यांकडून सोशल मीडिया, फेसबुकच्या माध्यमातून तरुण- तरुणींना परराज्यातील मुलींचे फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून मैत्री केली जाते. त्यातून पुढे मैत्री वाढवून फोन नंबर एक्‍स्चेंज करून व्हॉट्‌सऍप कॉल करत समोरील तरुणी अश्‍लील चाळे करून समोरील पीडितास अश्‍लील चाळे करण्यास भाग पाडते. समोरील तरुणी व तरुण देखील भावनेच्या आहारी जाऊन अशा प्रकारास बळी पडतो. काहीच वेळात व्हिडिओ कॉल संपल्यानंतर तुमच्या मोबाईलवर, व्हॉट्‌सऍपवर पीडितेचा नग्न व्हिडिओ, अश्‍लील हावभाव करताना पाठवला जातो. हा व्हिडिओ कुटुंबीयांना, मित्र परिवाराला व समाज माध्यमांवर अपलोड करण्याची धमकी पीडितास दिली जाते. 

या माध्यमातून पीडिताची फसवणूक करुन आर्थिक स्वरूपाची मागणी केली जाते. मागणी पूर्ण न केल्यास नग्न व अश्‍लील हावभाव केलेला व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित केला जातो. अशा प्रकारांची सोलापूर शहरामध्ये वाढ झालेली आहे. कित्येक जणांनी याला बळी पडत, इज्जतीला घाबरून पैशाची पूर्तता केलेली आहे. तरीसुद्धा पीडितेस होणारा आर्थिक, मानसिक व सामाजिक त्रास थांबत नाहीत असे निदर्शनास आलेले आहे. 

आपल्या समाजातील इज्जत व प्रतिष्ठेमुळे कोणीही पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देण्यास पुढे येत नाही. त्यामुळे याचाच फायदा गुन्हेगार घेऊन राजरोसपणे असे प्रकार आणखीन जास्त आता विश्वासाने करीत आहेत. तरी या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देऊन पीडितांचे होणारे आर्थिक, मानसिक व शारीरिक नुकसान थांबविण्यासाठी योग्य ते कायदेशीर पावले उचलावीत; अन्यथा येणाऱ्या काळात सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये या त्रासातून एखाद्याचा नाहक बळी जाण्याची देखील शक्‍यता आहे. 

पोलिस आयुक्तांमार्फत एक समिती नेमून या प्रकारांना लवकरात लवकर आळा बसविण्याचा प्रयत्न करावा, अशी मागणी श्री. सलगर यांनी केली. अशा प्रकरणात अडकलेल्या तक्रारदाराची तक्रार स्वीकारण्यासाठी शहर व जिल्हा स्तरावर स्वतंत्र कक्ष केल्यास तक्रारदार पुढे येतील. तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवल्यास आणखी सोयीचे होईल. समाजामध्ये त्याची चेष्टा अथवा अवहेलना होणार नाही याबाबत त्वरित पावले उचलणे ही काळाची गरज झालेली आहे. सोलापुरातील कित्येक पीडित संपर्कात आहेत पण ते पोलिसांसमोर येण्यास तयार नाहीत. कुठे तरी या अन्यायाला वाचा फुटली पाहिजे. पीडिताला न्याय मिळाला पाहिजे, जेणेकरून या टोळ्या जेरबंद होऊन असे प्रकार करणे बंद होईल, असेही श्री. सलगर यांनी सांगितले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com