
शाळेच्या वेळेत बदल नाहीच! मध्यान्ह भोजनात शाळेबाहेर जाणारे शिक्षक होणार बिनपगारी
सोलापूर : जिल्ह्यातील नदीला महापूर आला, ओढे, नाले तुडूंब भरून वाहत असल्याने शाळेला जाता किंवा येताच येत नाही, अशी स्थिती कुठेही नाही. जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडेल, असा हवामान खात्याचा अंदाजही नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शाळांची वेळ सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेपाच हीच असेल, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी स्पष्ट केले आहे.
सोलापूर जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. त्यामुळे उजनी धरणात जवळपास दहा टीएमसी पाणी आले आहे. जिल्ह्यातील कोणत्याही नदीला पूर येईल अशी स्थिती नाही. पावसाचा वेग कमी असल्याने नदी, नाले, ओढ्यांना पाणी आल्याने मुलांना किंवा शिक्षकांना शाळेत यायला अडचणी येत आहेत, असेही चित्र नाही. शहरातदेखील पावसामुळे शाळेत येता येत नाही, अशी स्थिती नाही. त्यामुळे शाळेच्या वेळांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तसेच शाळांना सुटी देण्याचे नियोजन सुध्दा नाही, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी दिली. शिक्षकांनी सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेपाच या वेळेत उपस्थित राहावे, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. मध्यान्ह भोजनाच्या सुटीत कोणत्याही शिक्षकांनी शाळेतून घरी किंवा शाळा सोडून बाहेर जाऊ नये. शाळा सोडून कोणताही शिक्षक बाहेर गेल्याचे आढळल्यास त्यांची त्या दिवशीची बिनपगारी रजा मांडली जाईल, असा इशाराही प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी दिला आहे.
सर्दी, खोकला असल्यास मुलाला शाळेत नकोच
पावसामुळे सर्दी, खोकला असे आजार वाढतात. कोरोनाचेही रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर ज्या मुलांना सर्दी, खोकला आहे, ती मुले घरी थांबू शकतात. पालकांनी त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. शहरातील शाळा नियमित सुरुच राहतील. शाळेची वेळ कमी करणे किंवा शाळांना सुटी देण्यासारखी परिस्थिती नाही, असे महापालिकेचे प्रशासन अधिकारी संजय जावीर यांनी सांगितले.
पालकांना सूचना...
मुलांना शाळेत पाठविताना त्याच्याकडे रेनकोट व छत्री द्यावी
मुलगा पावसात भिजणार नाही याची पालकांनी काळजी घ्यावी
शाळा सुटण्यापूर्वी पालकांनी लहान मुलांना न्यायला वेळेत जावे
पावसाचा अंदाज घेऊन दूरवरील पालकांनी मुलांना शाळेत पाठवावे
Web Title: No Change In School Hours Teachers Who Go Out Of School For Lunch Will Be
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..