esakal | बळीराजा चिंतेत ! अवकाळी मदतीसाठी पैसेच नाहीत 
sakal

बोलून बातमी शोधा

avkali paus nuksan
  • मदत व पुनवर्सन विभागाचे तोंडावर बोट 
  • आदेशानंतरही सुरु नाहीत नुकसानीचे पंचनामे 
  • अधिकारी कर्जमाफीच्या प्रक्रियेत व्यस्त : काही जिल्ह्यांचा प्राथमिक अंदाजही मिळेना 
  • सरकारच्या आश्‍वासनानंतरही मदतीसाठी किमान तीन महिन्यांची करावी लागणार प्रतीक्षा 

बळीराजा चिंतेत ! अवकाळी मदतीसाठी पैसेच नाहीत 

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : अवेळी पडलेल्या पावसामुळे राज्यातील 19 जिल्ह्यांमधील तीन लाख 67 हजार हेक्‍टरवरील पिकांचे सुमारे पाच हजार कोटींहून अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला. मात्र, सरकारने विविध योजनांचा कात्री लावत कर्जमाफीसाठी पैशांची जुळवाजुळव केल्याने आता अवकाळीग्रस्तांना मदतीसाठी पुरेसा निधी उपलब्ध नसल्याचे मदत व पुनर्वसन विभागातील सूत्रांनी स्पष्ट केले. अद्याप एकाही जिल्ह्यातून नुकसानीचा अहवाल प्राप्त न झाला नसून सरकारने मदतीसाठी पैसे उपलब्ध करुन देण्याचे आश्‍वासन दिले मात्र, त्यासाठी किमान तीन महिन्यांची वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे बळीराजा चिंतामुक्‍त नव्हे तर चिंताग्रस्त झाल्याचे चित्र आहे. 


हेही नक्‍की वाचा : पाच दिवसांचा आठवडा ! 'बायोमेट्रिक'ची सक्‍ती 


सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड, पाटण, माण, खटाव, वाई, फलटण तर सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, मोहोळ, सांगोला, करमाळा, बार्शी, उत्तर व दक्षिण सोलापूर या तालुक्‍यांमधील पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच नागपूर, अकोला, वर्धा, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, नांदेड, लातूर, परभणी, उस्मानाबाद, जालना, नाशिक, बीड, औरंगाबाद यासह अन्य काही जिल्ह्यांनाही अवकाळीचा मोठा फटका बसला आहे. त्यामध्ये गहू, सोयाबीन, उडीद, ज्वारी, मूग या पिकांसह द्राक्ष, केळी, अंब्याचे नुकसान झाले आहे. कर्जमाफीच्या कामात अधिकारी व्यस्त असल्याने नुकसानीच्या पंचनाम्यास सुरुवात झाली नसल्याचे काही अधिकाऱ्यांनी सांगितले. तत्पूर्वी, काही दिवसांपूर्वी अवकाळीने 71 हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला होता. अंतिम अहवालात मात्र, काहीच नुकसान झाले नसल्याचे सांगण्यात आले. ऑक्‍टोबर- नोव्हेंबर 2019 मधील अवकाळीग्रस्त एक कोटी तीन लाख शेतकऱ्यांसाठी सरकारने सात हजार 309 कोटींची मदत दिली. परंतु, खाते क्रमांक मिळाले नसल्याचे कारण पुढे करीत अद्यापही मदतीचे पैसे वितरीत झालेले नाहीत. त्यामुळे आता या अवकाळीग्रस्त बळीराजाला मदत मिळणार का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

हेही नक्‍की वाचा : काय म्हणता ! सोलापुरात 'मेट्रो'चे प्लानिंग 


पंचनामे करण्याचे दिले आदेश 
राज्यातील काही जिल्ह्यांना अवकाळीचा फटका बसला असून फळपिकांचे नुकसान झाले आहे. ज्वारीसह अन्य पिकेही बाधित झाली आहेत. संबंधित जिल्ह्यांमधील जिल्हाधिकाऱ्यांना नुकसानीची माहिती तत्काळ द्यावी, पंचनामेही करावेत, असे निर्देश दिले असून आणखी एकाही जिल्ह्याचा अहवाल आलेला नाही. 
- किशोरराजे निंबाळकर, सचिव, मदत व पुनर्वसन, मुंबई 


हेही नक्‍की वाचा : शिक्षक आमदारांबाबात शिक्षकांमध्ये नाराजी 


ठळक बाबी... 

  • राज्यातील 19 जिल्ह्यांमधील पावणेचार लाख हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान 
  • तहसिलदारांकडून नुकसानीचा प्राथमिक अहवाल आपत्ती व्यवस्थापनाला मिळाला नाही 
  • नुकसानीच्या पंचनाम्याला कर्जमाफीचा अडथळा : अधिकाऱ्यांकडून उत्तर 
  • मदतीसाठी सरकारकडे पैसेच नाहीत : मदत व पुनर्वसन विभागातील सूत्रांचे स्पष्टीकरण 
  • अवकाळीमुळे तब्बल पाच हजार कोटींहून अधिक नुकसानीचा अंदाज 
loading image