
सोलापूर : उत्तर सोलापूरच्या सभापती भडकुंबे विरुद्धचा अविश्वास ठराव मंजूर
सोलापूर : उत्तर सोलापूर तालुका पंचायत समितीच्या सभापती रजनी भडकुंबे यांच्या विरोधात दाखल केलेला अविश्वास ठराव आज तीन विरुद्ध एक अशा मताने मंजूर करण्यात आला.
उत्तर सोलापूर तालुका पंचायत समितीच्या सभागृहात अविश्वास ठरावाच्या संदर्भातील सभा पीठासन अधिकारी तथा प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. सकाळी 11 वाजता सभेच्या कामकाजाची सुरुवात झाली. पीठासन अधिकारी निकम यांनी अविश्वास ठरावाबाबत हात उंचावून मतदान घेतले. त्यावेळी अविश्वास ठरावाच्या बाजूने तीन सदस्यांनी हात वर केले तर विरोधात एक सदस्यांनी हात वर केला. त्यामुळे भाजपच्या सदस्य संध्याराणी पवार, राष्ट्रवादीचे सदस्य जितेंद्र शीलवंत, माजी आमदार दिलीप माने गटाचे सदस्य हरिदास शिंदे या तिघांनी एकत्र येऊन दाखल केलेला अविश्वासाचा ठराव तीन विरुद्ध एक अशा मताने मंजूर करण्यात आला.
चार सदस्य संख्या असलेल्या उत्तर सोलापूर तालुका पंचायत समितीच्या या सभागृहात सभापती भडकुंबे यांच्या विरोधात तीन सदस्यांनी एकत्र येत 8 ऑक्टोबरला जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास ठराव दाखल केला होता. तो ठराव रद्द करण्यात यावा, अशी मागणी सभापती भडकुंबे यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली होती. मात्र त्यांच्या मागणीचा विचार जिल्हाधिकाऱ्यांनी केला नाही. एवढेच नाही तर माजी आमदार दिलीप माने यांनीही या अविश्वासाच्या ठरावा संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याची चर्चा तालुक्यांमध्ये सुरू होती.
हेही वाचा: २५ हजार कोटीचा भ्रष्टाचार झाला हा खोटा आरोप - अजित पवार
त्यामुळे अविश्वास ठराव बारगळणार की होणार याबाबत उत्सुकता होती. मात्र आज सकाळी साडेअकरा वाजता सभापती भडकुंबे यांच्या विरोधातील अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. त्यामुळे भडकुंबे यांनी केलेले प्रयत्न तोकडे ठरल्याचे आजच्या घडामोडी वरून दिसून येते.
आता सभापती निवडीकडे लक्ष
अविश्वास ठराव मंजूर झाल्या बाबतचे प्रोसिडिंग जिल्हाधिकाऱ्यांकडे जाईल. त्यानंतर जिल्हाधिकारी नवा सभापती निवडण्याच्या संदर्भात सभा बोलावतील. त्यामुळे ती सभा केव्हा होईल याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. आता नवा सभापती कोण होणार याबाबत तालुक्यात उत्सुकता आहे.
ठराव मंजूर झाल्यानंतर गोंधळ
अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर पंचायत समितीच्या सभागृहाबाहेर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्या ठिकाणी दोन गटांमध्ये मारामारी झाल्याची चर्चाही सध्या सुरू आहे. नेमकं कुणी कुणाला मारलं हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे. सदर बाजार पोलिस चौकीत गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
Web Title: North Solapur Speaker Passes No Confidence Motion Against Bhadkumbe
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..