आता नगरसेवकांच्या खांद्यावर ग्रामपंचायतींच्या प्रचाराची जबाबदारी !

Dhoomshan
Dhoomshan

सोलापूर : लोकसभा, विधानसभा, पदवीधर व शिक्षक आमदारकीच्या निवडणुकीनंतर आता जिल्ह्यातील 658 ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे. त्यानंतर नगरपालिका, नगरपरिषदांच्या निवडणुका होणार आहेत. तत्पूर्वी, खासदार- आमदारकीसाठी पाया मजबूत असावा, या हेतूने सर्वाधिक ग्रामपंचायतींवर आपलीच सत्ता यावी, म्हणून भाजप आणि महाविकास आघाडीतर्फे नगरसेवकांना प्रचारासाठी मैदानात उतरविले जाणार आहे. 

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या हेतूने राजकीय तज्ज्ञांचे अंदाज चुकवत राज्यात शिवसेनेला सोबत घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसने महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. आता तसा प्रयोग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही पाहायला मिळणार आहे. मात्र, निवडणुकीपूर्वीच सरपंच पदासाठी वाद होऊ नयेत म्हणून राज्य सरकारने निवडणुकीनंतर सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होईल, असा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. तरीही भाजपने शेतकरी आत्महत्या, राज्यातील वाढलेली बेरोजगारी, कोरोना काळातही मंत्र्यांच्या बंगल्यांवरील कोट्यवधींचा खर्च, शेतकरी कर्जमाफी असे महत्त्वाचे मुद्दे घेऊन गावोगावी प्रचाराचे नियोजन केले आहे. 

तर शेतकरीविरुद्ध विधेयकासह अन्य मुद्द्यांवर महाविकास आघाडी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच टार्गेट करेल, अशी शक्‍यता वर्तवली जात आहे. मात्र, कधी नव्हे ते आता या निवडणुकीत चुरस पाहायला मिळणार असून ग्रामपंचायतींच्या प्रचारासाठी अभ्यासू, वक्‍तृत्व उत्तम असलेल्या आणि अनुभवी नगरसेवकांची मदत घेण्याचे नियोजन सुरू आहे. भाजपची आज (बुधवारी) त्यासंदर्भात बैठक आहे. त्यामुळे शहरातील राजकारणाबद्दल ऐकून असलेल्या ग्रामीण मतदारांना प्रत्यक्षात नगरसेवकांचेच अनुभव ऐकायला मिळणार आहेत. 

आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन 
जिल्ह्यातील 658 ग्रामपंचायतींची जानेवारीत निवडणूक आहे. या निवडणुकीच्या प्रचारानिमित्त जिल्ह्यातील कॉंग्रेसचे आमदार- माजी आमदार यांच्या जोडीला आता नगरसेवकही गावोगावी जातील. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसे नियोजन करण्यात येत आहे. 
- प्रकाश वाले,
शहराध्यक्ष, कॉंग्रेस 

शहरातील नगरसेवकांसह युवा सेनेचीही मदत घेतली जाईल 
विधानसभा, लोकसभा निवडणुकीचा पाया असलेल्या सर्वाधिक ग्रामपंचायतींवर शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस महाविकास आघाडीचा झेंडा असेल, असा विश्‍वास आहे. ग्रामपंचायतींच्या प्रचारासाठी वरिष्ठ नेतेमंडळींच्या मार्गदर्शनानुसार शहरातील नगरसेवकांसह युवा सेनेचीही मदत घेतली जाईल. 
- गणेश वानकर,
जिल्हाप्रमुख 

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन 
जिल्ह्यातील 658 ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारीला मतदान आहे. या पार्श्‍वभूमीवर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख, माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकही प्रचारात उतरतील. 
- विक्रम देशमुख,
शहराध्यक्ष, भाजप 

लवकरच सर्वपक्षीय नियोजन होईल 
पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळिराम साठे, कार्याध्यक्ष उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यातील सर्वाधिक ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीचीच सत्ता असेल. त्यासाठी आमदार, माजी- आमदारांसह शहरातील नगरसेवकांचीही प्रचारानिमित्ताने मदत घेतली जाईल. त्याचे लवकरच सर्वपक्षीय नियोजन होईल. 
- संतोष पवार,
कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस 

निवडणुकीचा कार्यक्रम 

  • एकूण ग्रामपंचायती : 658 
  • अर्ज करण्याची मुदत : 23 ते 30 डिसेंबर 
  • अर्जांची छाननी : 31 डिसेंबर 
  • अर्ज माघारीची मुदत : 4 जानेवारी दुपारपर्यंत 
  • मतदान : 15 जानेवारी 
  • मतमोजणी : 18 जानेवारी 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com