कोरोनात गायब, मात्र निवडणुकीच्या तोंडावर दातृत्वाचा महापूर | Solapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

political news
कोरोनात गायब, मात्र निवडणुकीच्या तोंडावर दातृत्वाचा महापूर

कोरोनात गायब, मात्र निवडणुकीच्या तोंडावर दातृत्वाचा महापूर

सोलापूर : गेली साडेचार वर्षे न दिसलेल्या आणि कोरोना (Covid-19) महामारीत गायब झालेल्या नगरसेवकांना आता निवडणुकीच्या तोंडावर जनतेच्या समस्यांची, त्यांच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव मोठ्या प्रमाणात होत आहे. निवडणुकीच्या तोंडावर प्रभागातील भटकंतीदरम्यान नगरसेवक मतदारांच्या नजरेस पडू लागले आहेत. मतदारांच्या छोट्या-मोठ्या कार्यक्रमांत सहभागी होण्याबरोबरच मतदारांचा सत्कार, सन्मान, भेटवस्तू, साहित्य वाटप ही दानत्व भावनाही उफाळून येत आहे.

हेही वाचा: आता फकस्त पक्ष वाढवायचा हाय..!

2017 च्या निवडणुकीत मोदी लाटेत भाजपची सत्ता आली. त्यातच सर्वपक्षीयांचे एकूण सदस्यांपैकी 70 टक्‍के नवे चेहरे सभागृहात आले. नव्या उमेदवारांमध्ये युवकांची संख्याही मोठी आहे. त्यातच 50 टक्‍के आरक्षणामुळे महिलांची संख्याही सभागृहात अधिक आहे. यातील बहुतांश महिला नगरसेवकांचा कारभार हा पती व मुलांच्या हाती आहे. तर काही पुरुष नगरसेवक देखील ना महापालिकेत ना प्रभागात दिसले आहेत. त्यामुळे गेल्या साडेचार वर्षात काही नगरसेवकांनी महासभेला केवळ हजेरी लावून पगार घेण्यापुरती जबाबदारी निभावली आहे. येत्या पंचवार्षिक निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी नगरसेवक जनतेशी नाळ जोडण्यासाठी ना-ना तऱ्हा अवलंबत आहेत.

गेली साडेचार वर्षे गायब झालेले नगरसेवक प्रभागातील जनतेच्या सुख-दु:खात सहभागी होत आहेत. त्याचबरोबर पक्षीय बैठकांमध्येही वावर वाढला आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये निवडणुकीचा बार उडणार असल्याने मतदारांना प्रभावित करण्यासाठी नगरसेवकांच्या हाती केवळ तीन महिने शिल्लक राहिले आहेत. त्यासाठी एकही सण, उत्सव, विशेष दिन, वाढदिवस, लग्नसमारंभ, अंत्यविधी आदी सर्वच उपक्रमांना हजेरी लावून जनतेच्या मनात आपलेपणाची भावना निर्माण करण्यासाठी नगरसेवक धडपडत आहेत.

हेही वाचा: 2 ते 17 वर्षांच्या मुलांना COVAXIN चा डोस! जानेवारीपासून लसीकरण

शहरातील 102 नगरसेवकांपैकी कोरोनाच्या महामारीत बोटावर मोजण्याइतके नगरसेवक जनतेच्या सेवेसाठी वाहून घेतलेले पाहायला मिळाले. निवडणुकीनिमित्त सर्वपक्षीय नगरसेवकांकडून दानत्वाचा महापूरच पाहायला मिळत आहे. दिवाळी सणानिमित्त फराळ आणि साडी वाटपाचा धुराळाच उडाला. मतदारांच्या वाढदिवसानिमित्त भेटवस्तू देणे, संघटना, संस्थांना आवश्‍यक साहित्य वाटप करणे आदी उपक्रमांना जोर वाढला आहे. त्याचबरोबर सोशल मीडियातून दानत्वाचे पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यातही नगरसेवक आघाडीवर असल्याचे दिसून येते.

बातमीदार : प्रमिला चोरगी

loading image
go to top