esakal | जिल्ह्यातील 1674 रुग्णांची कोरोनावर मात ! नव्याने वाढले 2009 रुग्ण

बोलून बातमी शोधा

Corona
जिल्ह्यातील 1674 रुग्णांची कोरोनावर मात ! नव्याने वाढले 2009 रुग्ण
sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : जिल्ह्यातील रुग्णसंख्या आता एक लाख आठ हजार 275 झाली आहे. तर त्यातील दोन हजार 924 रुग्ण कोरोनाचे (Covid-19) बळी ठरले आहेत. आज ग्रामीणमध्ये एक हजार 841 रुग्ण वाढले असून 29 रुग्ण कोरोनाने दगावले आहेत. तर शहरात 168 रुग्ण वाढले असून, 18 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज एका दिवसात एक हजार 674 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. (On Tuesday 1674 patients in Solapur district recovered from corona disease)

सोलापूर ग्रामीणमध्ये कोरोना रुग्णांची संख्या शहराच्या तुलनेत झपाट्याने वाढत आहे. चिंतेची बाब म्हणजे मृत्यूदरही कमी झालेला नाही. दररोज सरासरी 28 ते 30 रुग्णांचा मृत्यू होत असून त्यामध्ये 45 वर्षाच्या आतील तरुणांचा सर्वाधिक समावेश आहे. आज सोलापूर ग्रामीणमधील 29 तर शहरातील 18 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यामध्ये शहर व ग्रामीणमधील प्रत्येकी सहा रुग्णांचे वय 47 पेक्षा कमी आहे. आतापर्यंत ग्रामीणमधील आठ लाख 84 हजार 291 संशयितांपैकी 80 हजार 293 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तर शहरांमध्ये आतापर्यंत 25 हजार 982 रुग्ण आढळले असून सध्या दोन हजार 137 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर ग्रामीणमधील 15 हजार 860 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा: डोळ्यांदेखत जळताहेत पिके, तरीही "नीरा'चे मिळेना आवर्तन ! अधिकारी नॉट रिचेबल

ऍक्‍टिव्ह रुग्णांची संख्या वाढू लागल्याने आरोग्य यंत्रणेवर ताणदेखील पुन्हा वाढू लागला आहे. एकीकडे ऑक्‍सिजनची कमतरता तर दुसरीकडे रेमडेसिव्हीरसाठी रुग्णांच्या नातेवाइकांची कसरत पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाची कसोटीही पाहायला मिळत आहे. ऑक्‍सिजन, व्हेंटिलेटर बेडअभावी व वेळेत बेड न मिळाल्याने काही रुग्णांचा मृत्यू होत असल्याचीही वस्तुस्थिती आहे. परंतु प्रशासनाने त्याबद्दल तोंडावर बोट ठेवले असून नातेवाईकही दुःखाच्या सावटात गप्पच आहेत.

माढ्यात सर्वाधिक मृत्यू

ग्रामीणमध्ये आज माळशिरस तालुक्‍यात सर्वाधिक 348 रुग्ण सापडले असून या तालुक्‍यातील चार रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तर माढ्यात 179 रुग्ण आढळले असून या तालुक्‍यातील सर्वाधिक आठ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अक्कलकोट तालुक्‍यात 38 रुग्ण वाढले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. बार्शीत 230 रुग्ण वाढले असून तिघांचा मृत्यू झाला आहे. करमाळ्यात 142 रुग्ण वाढले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. मंगळवेढ्यात 326 रुग्ण वाढले असून तिघांचा मृत्यू झाला आहे. मोहोळ तालुक्‍यातील 115 रुग्ण वाढले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. सांगोल्यात 122 रुग्ण वाढले असून चौघांचा मृत्यू झाला. दक्षिण सोलापूर तालुक्‍यात 36 रुग्ण वाढले असून एकाचा मृत्यू झाला आहे. तर उत्तर सोलापूर आणि पंढरपूर तालुक्‍यात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. परंतु, उत्तर सोलापूर तालुक्‍यात 50 रुग्ण वाढले असून पंढरपूर तालुक्‍यात 255 रुग्ण वाढले आहेत.