

तात्या लांडगे
सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. २७) ६०४ गाड्या कांदा विक्रीसाठी आला होता. २६ जानेवारीच्या सुट्टीनंतरही आवक मर्यादितच होती, पण भाव खूपच पडला. शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल सरासरी ८०० रुपयांचा भाव मिळाला. चांगल्या कांद्याला १७०० ते १९०० रुपयांपर्यंतच भाव होता.
दरवर्षी ऑक्टोबर ते जानेवारी या काळात सोलापूर बाजार समितीत कांद्याला सरासरी १५०० ते २५०० रुपयांपर्यंत भाव असतो. मात्र, यंदा कांद्याला मागणी नसल्याने आणि निर्यातीवर निर्बंध असल्याने भावात अपेक्षित सुधारणा झाली नाही. मंगळवारी सोलापूर बाजार समितीत आलेल्या ६० हजार ४३२ क्विंटल कांदा विक्रीतून शेतकऱ्यांना किमान सहा ते सात कोटी रुपये मिळतील, अशी आशा होती. मात्र, भावात घसरण झाल्याने शेतकऱ्यांच्या हाती अवघे पावणेपाच कोटी रुपयेच पडले. अजूनही जिल्ह्यात पाच हजार हेक्टरवर कांदा असून उत्पन्नाच्या प्रमाणात खर्चही निघत नसल्याने अनेक शेतकरी कांदा जमिनीत गाडण्याच्या तयारीत आहेत.
दुसरीकडे बंगरुळूच्या बाजारात कांद्याला सोलापूरच्या तुलनेत प्रतिक्विंटल ७०० रुपये ते एक हजार रुपये जास्त भाव मिळत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी कांदा तिकडे हलविला आहे. त्याठिकाणी विकलेल्या कांद्याचे पैसे लगेच मिळतात. सोलापूर बाजार समितीत मात्र व्यापाऱ्यांकडून १० हजार रुपयांपर्यंत उचल देऊन बाकीच्या रकमेसाठी १५ ते २० दिवसांच्या मुदतीचा धनादेश दिला जातो. आता कांद्याचे दर वाढण्याची शक्यता धूसर असल्याचे बाजार समितीतील अधिकारी सांगतात. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली असून त्यांनी राज्य सरकारकडून प्रतिक्विंटल अनुदानाची मागणी केली आहे.
‘या’ जिल्ह्यातून सोलापुरात येतोय कांदा
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोलापूर, पुणे, धाराशिव, अहिल्यानगर, सातारा, बीड या जिल्ह्यातून कांदा बाजारात येत आहे. अतिवृष्टी, महापूर येऊन गेल्यावर अनेक शेतकऱ्यांनी दोन पैसे मिळतील या आशेने कांदा लागवड केली होती. पण, १० जानेवारीपासून कांद्याचे दर पडल्याने उत्पन्नासाठी केलेला खर्च देखील निघत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.