esakal | कांद्याचा वांदा ! बाजारपेठा बंद; उत्पादक शेतकरी अडचणीत
sakal

बोलून बातमी शोधा

Onion

तालुक्‍यातील कांद्याची विक्री बार्शी व सोलापूर येथील बाजारपेठेत होते. मात्र, बाजारपेठा बंद असल्याने कांदा शेतात उघड्यावर पडून आहे.

कांद्याचा वांदा ! बाजारपेठा बंद; उत्पादक शेतकरी अडचणीत

sakal_logo
By
कुलभूषण विभूते

वैराग (सोलापूर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या कडक निर्बंधामुळे शेतकऱ्यांना कांदा साठविण्यासाठी लागणाऱ्या चाळीची सामग्री मिळत नसल्याने कांदा कडक उन्हात पडून आहे. त्यातच बाजार समितीही बंद असल्याने तसेच कांदा साठवणुकीची पंचाईत झाल्याने कांदा उत्पादक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे कांद्याचे वांदे झाल्याची वेळ उत्पादकावर आली आहे.

तालुक्‍यातील कांद्याची विक्री बार्शी व सोलापूर येथील बाजारपेठेत होते. मात्र, बाजारपेठा बंद असल्याने कांदा शेतात उघड्यावर पडून आहे. त्यामुळे बहुतांश शेकऱ्यांकडे रांगडा व लाल कांदा अद्याप शिल्लक आहे. हा कांदा जास्त दिवस चांगल्या अवस्थेत टिकू शकत नसल्याने शेतकरी तो तत्काळ बाजारात आणावा लागतो. सध्या बाजार समितीतील व्यवहार बंद असल्याने उन्हाळा कांद्यासह इतर शेतमाल विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध नाही.

मागील महिन्यात मार्च अखेरीचे कारण पुढे करून जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्या आठ ते दहा दिवस बंद ठेवल्या. त्यामुळे हजारो क्विंटल कांदा विनाकारण पडून राहीला. त्याचा परिणाम लिलाव सुरळीत झाल्यावर आवक वाढली व दर घसरले. अगोदर बाजार समित्या बंद राहिल्याने मोठे नुकसान झाले आहे. आता कोरोना रोगामुळे सर्वत्र लॉकडाऊन सुरु असल्याने कांदा मात्र शेतकऱ्यांना रडवतअसल्याचे दिसत आहे.

ग्रामीण भागात कांदा साठवणुकीस वेग

कोरोनामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला असून ग्रामीण भागात कांदा साठवणुकीत वेग आला आहे. अवकाळी पावसाने या कांद्याचे वांदे होत आहे. ग्रामीण भागात लॉकडाउनमुळे शेतकरी कुटंबातील सर्व सदस्य घरी आहेत. अनेक कुटुंबे शेती कामात रमली आहेत. मागील वर्षांच्या तुलनेत यावर्षी उन्हाळा कांद्यात उत्पादनात तीस ते चाळीस टक्‍क्‍यानी घट झाली आहे. सध्या रब्बी हंगामाचा कांदा काढणी, कांदा चाळीस भरणे ही कामे सुरू आहेत. तर काही शेकऱ्यांनी नांगर धरला आहे.

"सरकारनं हमी भावाने कांदा खरेदी करावा. जिल्ह्यातील बाजार समित्या बंद असल्याने कांदा लिलाव बंद आहेत. काही व्यापारी कमी भावाने कांदा खरेदी करून साठवणूक करतात. शेतकरी मात्र आर्थिक अडचणीत सापडतात. याची चौकशी व्हावी व कारवाई व्हावी. "

- कमलाकर क्षीरसागर, कांदा उत्पादक शेतकरी, मुंगशी (वा), ता. बार्शी

"पणन मंडळाच्या आदेशानुसार तीन दिवसाच्यावर समिती बंद ठेवता येत नाही. असे असताना लिलाव बंद करून कांदा उत्पादकावर अन्यायच केला जात आहे. "

- प्रताप पाटील, अध्यक्ष, कांदा उत्पादक शेतकरी बचत गट, दहिटणे, ता. बार्शी

loading image