
‘प्रदूषण’च्या अजित पाटलांची खुली चौकशी! किरण लोहारांकडे ५० कोटींहून अधिक रुपयांची मालमत्ता
सोलापूर : प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी अजित पाटील यांना आठ दिवसांपूर्वी दोन लाखांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते. त्यांना अजूनही न्यायालयातून जामीन मिळालेला नाही. त्यांच्या घरझडतीत लॉकरमध्ये दहा तोळे दागिने सापडले आहेत. मुंबईत एक प्रशस्त घर असून, इतर ठिकाणी त्यांची मालमत्ता आहे का, यासंदर्भात आता खुली चौकशी सुरू झाली आहे.
तक्रारदारास साखर कारखान्याच्या डिस्टिलरी युनिटचे ‘कन्सेंट टू ऑपरेट’ लायसन्स नूतनीकरण करण्यास मदत केल्याचा मोबदला आणि कारखान्याकडून हवा व पाणी प्रदूषण होत असल्याबाबत लोकांकडून आलेल्या तक्रारींवर कारवाई न करण्यासाठी आणि प्रस्तावित फार्मास्यूटिकल्स युनिटचे कन्सेंट्स टू इस्टॅब्लिश या लायसन्सचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यासाठी पाटील यांनी तक्रारदाराकडे दोन लाखांची लाच मागितली. लाचेची रक्कम स्वतः स्वीकारून त्यांनी वैयक्तिक सांपत्तिक फायदा मिळवण्यासाठी गुन्हेगारी स्वरूपाचे वर्तन केले. त्यानुसार त्यांच्याविरुद्ध सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल झाला. अटकेनंतर त्यांचा ब्लडप्रेशर खूपच वाढल्याने त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले होते. आता त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, शनिवारी (ता. ३१) न्यायालयात हजर केले, पण जामीन मिळू शकला नाही. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुंबईतील त्यांच्या घरी झडती घेतली, त्यावेळी कागदपत्रांशिवाय दहा तोळे दागिने हाती लागले. आता त्याअनुषंगाने राज्यात इतर जिल्ह्यांमध्ये किंवा जवळच्या नात्यातील कोणाच्या नावे त्यांची मालमत्ता आहे का, यासंदर्भात चौकशी केली जात असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील विश्वसनीय सूत्रांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.
नववर्षात लोहारांची मालमत्ता ५० कोटींवर
तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना देखील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काही दिवसांपूर्वी २० हजारांची लाच स्वीकारताना त्यांच्या कार्यालयातच रंगेहाथ पकडले होते. त्यांची खुली चौकशी आता अंतिम टप्प्यात असून, मागील आठवड्यात अधिकाऱ्यांनी त्यांना बोलावून अधिक चौकशी देखील केली. भूमी अभिलेख कार्यालयाकडून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जागा, जमीन, जुमल्याचे दस्त जमा केले आहेत. त्यांच्या खात्यात ३० लाख रुपये होते. कोट्यवधी रुपयांच्या दागिन्यांच्या पावत्या त्यावेळी आढळल्या होत्या. एकूणच, नोकरी लागल्यापासून नऊ वर्षांत त्यांची मालमत्ता ५० कोटींहून अधिक रुपयांची झालीच कशी, याचा तपास आता सुरू आहे. हिशेबाचा ताळमेळ न बसल्यास ‘अपसंपदा’अंतर्गत त्यांच्यावर कारवाई होऊ शकते, असेही लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील सूत्रांनी सांगितले.