Breaking ! ऑक्‍सिजन तुटवडा; सोलापूर प्रायव्हेट हॉस्पिटल ओनर्स असोसिएशनचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

40Consumer_Reports_Best_Portable_Oxygen_Concentrator - Copy.jpg
40Consumer_Reports_Best_Portable_Oxygen_Concentrator - Copy.jpg

सोलापूर : सद्यस्थितीत खासगी रुग्णालयांमध्ये बेड शिल्लक आहेत, परंतु ऑक्‍सिजनचा तुटवडा असल्याने रुग्णांची जोखीम वाढली आहे. औद्योगिक क्षेत्रासाठीचा ऑक्‍सिजन पुरवठा कमी करून रुग्णालयांना पुरेशा प्रमाणात ऑक्‍सिजन उपलब्ध करून द्यावा. ऑक्‍सिजनचे दर वाढल्याने रुग्णालयांना ठरवून दिलेल्या दरात बदल करण्यास मान्यता द्यावी, अशी मागणी सोलापूर प्रायव्हेट हॉस्पिटल ओनर्स असोसिशएनने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना दिले आहे.

सध्या सोलापुरात काही अपवाद वगळता सर्व कोव्हिड आणि नॉनकोव्हिड हॉस्पिटल्स ऑक्‍सिजनच्या कमतरतेमुळे त्रस्त आहेत. जिल्ह्याला पुणे, मुंबई आणि कर्नाटकातून द्राव्य ऑक्‍सिजनचा पुरवठा होतो. सोलापुरातील डिस्ट्रिब्युटर्स त्या ऑक्‍सिजनचे रिफिलिंग करून तो वेगवेगळ्या हॉस्पिटलला पुरवितात. कर्नाटकतील पुरवठा बंद झाला असून पूर्वी साधारणपणे दोन ते तीन दिवसाला एक द्राव्य ऑक्‍सिजनचा टॅंकर सोलापूरची गरज भागवायचा. मात्र, आता दिवसाला तीन टॅंकरची गरज आहे. त्यामुळे पूर्वीपेक्षा ऑक्‍सिजनचे दर दुप्पट ते चौपट झाले आहेत. दरम्यान, सोलापूरजवळील तामलवाडी येथे ऑक्‍सिजनचे स्टोरेज होते. परंतु, तामलवाडी हे उस्मानाबाद जिल्ह्यात असल्याने हा पुरवठाही आता होत नाही. या पार्श्‍वभूमीवर पुणे, मुंबई, तामलवाडी व कर्नाटकातून होणारा पुरवठा पूर्वीप्रमाणे योग्य दरात आणि व्यवस्थित होईल, याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, असेही त्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


निवेदनातील ठळक बाबी...

  • रुग्णालयांना ऑक्‍सिजनचा पुरवठा ज्या दराने होते, तो दर आकारण्यास हवी परवानगी
  • पंधरा दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांकडे तक्रार करुनही तोडगा निघेना
  • आयसीयूमधील रुग्णास प्रती मिनिटाला पन्नास ते साठ लिटर ऑक्‍सिजनची लागते गरज
  • बहुतांश रुग्ण गरज नसताना घरच्या घरी स्वतः किंवा जवळपासच्या डॉक्‍टरांकडून ऑक्‍सिजन लावून घेत आहेत
  • ऑक्‍सिजनअभावी कोव्हिड रुग्ण भरडले जात असून नॉनकोव्हिड रुग्णांचेही हाल होत आहेत
  • लहान रुग्णालये व नर्सिंग होम्स येथे ऑपरेशनसाठी लागणारा ऑक्‍सिजन चढ्या दराने मिळतो

प्रशासनाने ऑक्‍सिजन पुरवठ्याकडे सातत्याने लक्ष द्यावे
सोलापूर प्रायव्हेट हॉस्पिटल ओनर्स असोसिएशनच्या वतीने ऑक्‍सिजनचा पुरवठा सुरळीत व नियमित व्हावा, यासंदर्भात जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्‍तांना निवेदन दिले आहे. कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्‍सिजनची नितांत गरज आहे. ऑक्‍सिजनमुळे अनेकांचा जीव वाचू शकतो. त्यामुळे प्रशासनाने ऑक्‍सिजन पुरवठ्याकडे सातत्याने लक्ष द्यावे. 
- डॉ. ज्योती चिडगूपकर, अध्यक्षा, प्रायव्हेट हॉस्पिटल ओनर्स असोसिएशन, सोलापूर


ऑक्‍सिजनची मागणी आणि पुरवठा यात तफावत
कोरोनामुळे जिल्ह्यातील ऑक्‍सिजनची गरज कित्येक पटीने वाढली आहे. ऑक्‍सिजनचे उत्पादन कमी होत असल्याने ऑक्‍सिजनची मागणी आणि पुरवठा यात तफावत होऊ लागली आहे. प्रत्येकाच्या रक्‍तातील ऑक्‍सिजन लेव्हल 95 टक्‍क्‍यांपर्यंत असावी. मात्र, कोरोना रुग्णांची लेव्हल 60 पेक्षा कमी झाल्यास त्यांना ऑक्‍सिजनची मोठी गरज लागत आहे. 
- डॉ. हरिष रायचूर, अध्यक्ष, "आयएमए', सोलापूर


ऑक्‍सिजनची सर्वत्र कृत्रिम टंचाई
जास्त पैसे दिल्यावर ऑक्‍सिजन मिळतो, मग तुटवडा कसा म्हणायचा. कोरोनापूर्वी एका फोनवर मिळणारा ऑक्‍सिजन आता वारंवार कॉल करुन मिळत नाही. प्रशासन ऑक्‍सिजन पुरवठ्याबाबत ठोस नियोजन केल्याचे दिसत नाही. आगामी काळातील ऑक्‍सिजनची गरज पाहून जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्‍तांनी पुरवठ्याबाबत काळजीपूर्वक लक्ष द्यायला हवे.
- सुदिप सारडा , माजी अध्यक्ष, प्रायव्हेट हॉस्पिटल ओनर्स असोसिएशन, सोलापूर


जिल्ह्यात कुठेही ऑक्‍सिजनचा तुटवडा नाही
जिल्ह्यात कुठेही ऑक्‍सिजनचा तुटवडा नाही. ऑक्‍सिजनची कमरता भासणार नाही, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पथक नियुक्‍त केले आहे. टेंभुर्णीत एक आणि मोहोळ एमआयडीसीत दोन ऑक्‍सिजनचे प्लॅण्ट आहेत. सोलापुरसाठी 58 किलो लिटर ऑक्‍सिजनची गरज असून सध्या 37 किलो लिटर ऑक्‍सिजन पुरवठा होतो आहे. त्यामुळे गरजेनुसार बेल्लारी, लातूर, पुणे यासह अन्य ठिकाणांहून ऑक्‍सिजनची गरज भागविली जात आहे. 
- मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com