Pandharpur
Pandharpursakal

Solapur : पंढरपूरमध्ये कार्तिकी यात्रेनिर्मित्त विविध सोई सुविधाचे नियोजन

नदी परिसर आदी ठिकाणी विविध सोई सुविधा उपलब्ध केल्या आहेत
Published on

पंढरपूर : कार्तिकी यात्रेचा सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने प्रशासन गतिमान झाले असून यात्रेला येणाऱ्या भाविकांसाठी ६५ एकर चंद्रभागा नदी परिसर आदी ठिकाणी विविध सोई सुविधा उपलब्ध केल्या आहेत.

कार्तिकी यात्रेला यंदा सुमारे दहा ते बारा लाख भाविक येण्याची शक्यता गृहीत धरून प्रशासनाने त्याप्रमाणे नियोजन केले आहे. चंद्रभागा नदीच्या पैलतीरावरील ६५ एकर परिसरामध्ये भाविकांना तंबू राहूट्या उभारण्यासाठी ५२८ खुले प्लॉट तयार केले आहेत. या प्लॉटच्या माध्यमातून सुमारे अडीच ते तीन लाख भाविकांची राहण्याची सोय होणार आहे. सोमवारी ६५ एकर मधील प्लॉटचे आगाऊ बुकिंग करण्यासाठी भाविकांनी तेथील आपत्कालीन मदत केंद्रावर गर्दी केली होती. सोमवारी दुपारपर्यंत एकूण ८० प्लॉटचे बुकिंग झाले होते.

यात्रे दरम्यान मुक्कामासाठी येणाऱ्या भाविकांना प्रशासनाने पिण्याचे पाणी, २४ तास वीजपुरवठा, हायमास्ट लॅम्पच्या माध्यमातून पुरेशी प्रकाश व्यवस्था, मुबलक प्रमाणात स्वच्छतागृहे आदी सुविधा उपलब्ध केल्या आहेत. हा परिसर स्वच्छ व दुर्गंधी मुक्त असावा याकरिता पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने साफसफाई करण्यात आली आहे. प्रशासनाच्यावतीने भाविकांसाठी सुमारे १ हजार ३०० कायमस्वरूपी स्वच्छतागृहे तर तात्पुरती ३०० स्वच्छतागृहे उभारण्यात आली आहेत.

६५ एकर परिसरातील एमटीडीसी संकुलामध्ये यात्रेला बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासाची सोय करण्यात आली आहे. यात्रा कालावधीमध्ये चंद्रभागा नदीमध्ये स्नान करण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी होत असते. हे पाहता नगरपालिकेने चंद्रभागा वाळवंटाची स्वच्छता केली असून भाविकांसाठी तात्पुरत्या शौचालयांची उभारणी केली आहे. तर नदी तीरावरील प्रत्येक घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सूचनाफलक लावण्यात आले आहेत. भाविकांच्या सुविधेसाठी महाद्वारघाटा लगत एक आपत्कालीन केंद्र सुरू करण्यात आले आहे. वाळवंटातील स्टॉलधारकांनी केलेल्या अतिक्रमण हटवण्यात येत आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने चंद्रभागा नदीवरील नवीन पुल ते तीन रस्ता चौक यादरम्यानच्या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास प्रारंभ केला आहे. दरम्यान जुन्या दगडी पुलावरील रस्त्यावर सर्वत्र वाळू पसरली आहे. ६५ एकर मधील दिंड्या नगर प्रदक्षिणेला जाताना या वाळूमुळे त्यांची गैरसोय होणार आहे. हे ध्यानात घेऊन प्रशासनाने तेथे योग्य ती उपाययोजना करण्याची गरज आहे.

यावर्षीच्या कार्तिकी यात्रेसाठी मोठ्या प्रमाणावर भाविकांचे आगमन होणार आहे. हे गृहीत धरून नगरपालिकेच्या वतीने भाविकांसाठी ६५ एकर, चंद्रभागा नदी परिसर व शहरात विविध सुविधा उपलब्ध केल्या आहेत. अरविंद माळी, मुख्याधिकारी, पंढरपूर नगरपरिषद, पंढरपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com