esakal | पंढरपूर-मंगळवेढ्यात शह-काटशह ! कोण बाजी मारणार...?
sakal

बोलून बातमी शोधा

In the Pandharpur Mangalwedha assembly constituency many parties are preparing for the elections.jpg

राष्ट्रवादी काॅंग्रेस, भाजपा, वंचित बहुजन आघाडी, एमआयएम अशा अनेक पक्षांनी निवडणुकीच्या दृष्टीने तयारी केली आहे, परंतु अद्याप कोणीही उमेदवार घोषीत केलेले नाहीत.

पंढरपूर-मंगळवेढ्यात शह-काटशह ! कोण बाजी मारणार...?

sakal_logo
By
अभय जोशी

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघात प्रमुख नेतेमंडळींकडून एकमेकाला शह -काटशह देण्यासाठी जोरात प्रयत्न सुरु आहेत. त्यातच शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनी बंडखोरी करत उमदेवारी अर्ज भरला असून समाधान आवताडे यांचे चुलत बंधू सिध्देश्वर आवताडे, नगराध्यक्षा साधना भोसले यांचे पती नागेश भोसले यांनी उमेदवारी अर्ज घेतले आहेत. अर्ज दाखल करुन सिद्धेश्वर अवताडे आणि नागेश भोसले हे दोघे खरेच निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर आवताडे आणि भालकें या दोन्ही मातब्बर नेत्यांना त्यांच्या उमेदवारीचा फटका बसणार आहे.

श्री विठ्ठल मंदिर सुरू; वाढत्या कोरोनामुळे बाजारपेठ कडेकोट बंदच, भाविकांची झाली गैरसोय

राष्ट्रवादी काॅंग्रेस, भाजपा, वंचित बहुजन आघाडी, एमआयएम अशा अनेक पक्षांनी निवडणुकीच्या दृष्टीने तयारी केली आहे, परंतु अद्याप कोणीही उमेदवार घोषीत केलेले नाहीत. तथापी राष्ट्रवादी काॅंग्रेसची उमेदवारी निश्चित मानून श्री विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके यांनी वेगाने प्रचार सुरु केला आहे. मंगळवेढा शहरात तब्बल ५५ बैठका घेतल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून पंढरपूर शहरातील अनेक भागातील लोकांशी भगीरथ हे बैठकांच्या माध्यमातून संवाद साधत असून त्यांना चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे.

सांगोल्यात 24 कैदी कोरोना पॉझिटिव्ह; संपर्कातील सर्वांची होणार चाचणी, पोलिस दलात खळबळ

दुसरीकडे भाजपा कडून विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक, दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांच्या नावाचा प्राधान्याने विचार केला जात आहे. पक्ष देईल त्या उमेदवाराचा प्रचार करावा लागणार असल्याचे परिचारकांकडून सांगितले जात आहे. तथापी परिचारकांच्या कुटुंबातीलच व्यक्तीने निवडणूक लढवावी अशी मागणी होत असून युटोपियन शुगरचे अध्यक्ष उमेश परिचारकांसाठी कार्यकर्त्यांमधून आग्रह धरला जात आहे.

शह-काटशहाला वेग

मुंबईत ॲन्टीलिया, वाझे आणि त्या अनुषंगाने होत असलेल्या आरोपप्रत्यारोपानंतर अनेक नेत्यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. त्याची दखल राष्ट्रपती घेतात किंवा नाही हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे, परंतु सध्यातरी या मागणीच्या पार्श्वभूमीवर मंगळवेढा मतदार संघातील पोटनिवडणूक होणार असल्याने नेते मंडळींकडून सावध पवित्रा घेतला जात आहे. सध्या एकमेकाला शह काटशह कशा पध्दतीने देता येतील या दृष्टीने हालचाली सुरु आहेत.

दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांचे चुलत बंधू, मंगळवेढा खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिध्देश्वर आवताडे तसेच पंढरपूरच्या नगराध्यक्षा साधना भोसले यांचे पती, पंढरपूर मर्चंट बॅंकेचे अध्यक्ष नागेश भोसले यांनी घेतलेल्या उमेदवारी अर्जांना महत्व आले आहे. सिध्देश्वर आवताडे आणि नागेश भोसले यांनी अर्ज भरुन खरोखरच निवडणूक लढवली तर निवडणूकीतील चुरस कमालीची वाढणार आहे. मतांची विभागणी होऊन सिध्देश्वर आवताडे यांच्यामुळे समाधान आवताडे यांना तर नागेश भोसले यांच्यामुळे भगिरथ भालके यांना फटका बसण्याची शक्यता अधिक आहे.

महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवेसनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवायचीच या दृष्टीने त्यांनी हिरीरीने मतदारांच्या गाठीभेटी सुरु केल्या आहेत. शिवसेनेकडून अद्याप भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही तथापि त्यांची उमेदवारी कायम राहिली तर भगीऱथ भालके यांच्याकडे जाणाऱ्या शिवसेनेच्या मतापैकी काही मते कमी होऊन ती गोडसे यांच्याकडे वळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शैला गोडसे यांची उमेदवारी भगीरथ भालके यांच्या दृष्टीने अ़डचणीची ठरणार आहे. 

राज्य पातळीवर स्वाभीमानी शेतकरी संघटनेचा महाविकास आघाडीला पाठींबा असताना देखील स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे. अल्पावधीत त्यांनी कार्यकर्त्याची मोठी फळी जमवली आहे.सचिन पाटील यांची उमेदवारी कायम राहिल्यास भगीरथ भालके यांच्याकडे जाणारी मते देखील काही प्रमाणात त्यांच्याकडे वळण्याची जास्ती शक्यता आहे.

कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही पोटनिवडणूक होणार असल्याने मतदार नेहमी प्रमाणे मतदानासाठी येणार नाहीत अाणि त्यामुळे मतदान कमी होईल असा अंदाज आहे. उच्च शिक्षित, सधन, व्यापारी मंडळी, महिला आणि वृद्ध मतदानासाठी जास्ती संख्येने येणार नाहीत. त्याचा सर्वाधिक फटका भाजपाच्या उमेदवाराला बसणार आहे.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड.प्रकाश अांबेडकर यांनी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असल्याचे जाहीर केले आहे. एमअायएम कडून देखील चाचपणी सुरु आहे. एकंदरीतच एकमेकाला शह काटशह देण्यासाठी वेगाने हालचाली सुरू आहेत.

मंगळवार 30 मार्च ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. प्रमुख पक्षांनी उमेदवार जाहीर केलेले नसल्याने शेवटच्या दोन दिवसात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना धावपळ करावी लागणार आहे.