पंढरपूर : शाळेतच काढला जातोय तोंडचा घास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

school

पंढरपूर : शाळेतच काढला जातोय तोंडचा घास

रोपळे बुद्रूक : पंढरपूर तालुक्यातील बहुतांश शाळांमध्ये मध्यान्ह भोजनात पातळ भाजी व कडधान्याच्या उसळी बनवण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे मेनूच बनवला जात नाही. या योजनेची नीट अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या तोंडचा घास काढण्याचे काम अनेक शाळांमध्ये सुरू असल्‍याचे दिसून येते आहे.

सोलापूर जिल्ह्यातील शाळा कोरोनातील दोन वर्षानंतर पूर्ण क्षमतेने भरत आहेत. कोरोनाची स्थिती नियंत्रणात आल्याने १५ मार्चपासून शाळास्तरावर तयार आहार देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहून त्यांची शालेय गुणवत्ता वाढावी म्हणून शासनाने शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळेतच मध्यान्ह भोजन देण्याची व्यवस्था केली आहे. मात्र अपवाद म्हणून काही शाळा वगळता बहुतांश शाळांमध्ये भातासोबत पातळ भाजी व कडधान्याची उसळ बनवली जात नाही. उलट भात शिजवतानाच त्यात अत्यल्प प्रमाणात धान्यादी माल व थोडा भाजीपाला वापरून एक वेगळाच मेनू बनवला जात आहे.

वास्तविक भात वेगळा शिजवून त्यासोबत खाण्यासाठी वेगळ्या कडधान्याच्या उसळी व पातळ भाज्या बनवण्याचे शाळांना शासनाने स्पष्ट आदेश दिले आहेत. तरीही आदेशाप्रमाणे मेनू बनवला जात नाही. पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ४५० उष्मांक (कॅलरी) आणि १२ ग्रॅम प्रोटीनयुक्त दुपारचे भोजन तसेच सहावी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ७०० उष्मांक आणि २० ग्रॅम प्रोटीनयुक्त आहार देण्यासाठी तांदूळ व धान्यादी मालाचे प्रमाण ठरवून दिले आहे.

काही शाळांना भेटी दिल्या तेव्हा ज्या शाळांमध्ये भातासोबत खाण्यासाठी वेगळी उसळ, वरण, सांबर किंवा आमटी बनवली जाते. अशा शाळेतील विद्यार्थी अतिशय आवडीने भात खात असल्याचे चित्र दिसून आले. तर या उलट वेगळी उसळ किंवा पातळ भाजी न बनवल्यामुळे विद्यार्थी असा भात फारच कमी प्रमाणात खात असल्याचे दिसून आले. अनेक शाळांमध्ये वेगळी उसळ, वरण, सांबर किंवा आमटी बनवण्याची उदासिनता दिसून आली. आमटी, वरण किंवा सांबर मुलांना देताना ते त्यांना पोळण्याची भीती असते, मुलं भात खाताना खाली सांडतात तर आमटी, वरण किंवा सांबर सांडल्यावर फरशा घाण होतात, भाजीपाला व तेल उधार मिळत नाही, तर मग आमटी, वरण किंवा सांबर कसे बनवायचे?, मुलांना शिकवायचे सोडून आमटी, वरण किंवा सांबर बनवण्यातच आमची एनर्जी वाया चाललीय? अशी विविध कारणे मध्यान्ह शिक्षक आणि भोजन बनविणाऱ्यांकडून ऐकावयास मिळाली.

या सर्व कारणांमुळे मुलांच्या पोटात काही केल्या दर्जेदार आहार जातच नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे पोषण होणार कसे? हा आता एक नव्याने प्रश्न उपस्थित झाला आहे. एका खासगी शाळेतील मुख्याध्यापकाने नाव न छापण्याच्या अटीवर आम्ही यातून बचत झालेली रक्कम शाळेच्या कामासाठीच वापरत असल्याचे अजब उत्तर दिले. उसळी व पातळ भाज्या बनवल्या जात नाहीत. त्यामुळे इंधन, तेल, मसाले व भाजीपाल्यामध्ये होत असलेल्या बचतीचा हिशोब संबंधीत मुख्याध्यापकांना कोण विचारणार? हा मोठा प्रश्न आहे. विद्यार्थी संख्या जास्त असलेल्या शाळेत आठवड्यातील पातळ भाजी बनवण्याच्या तीन दिवसापैकी एक दिवस जरी पातळ भाजी बनवली नाही. तर त्या शाळेची पोषण आहार खर्चात अगदी सहज एक ते दोन हजार रूपये बचत होते. ही बचत झालेली रक्कम मात्र खर्चात दाखवली जाते हे विशेष. या बाबतीत शाळा व्यवस्थापन समित्याही लक्ष घालत नाहीत.

Web Title: Pandharpur School Nutrition Scheme

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top