esakal | पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी पार्थ पवारांच्या नावाची चर्चा ! राजकीय निरीक्षकांच्या उंचावल्या भुवया 
sakal

बोलून बातमी शोधा

Parth Pawar.

आमदार भारत भालके यांच्यानंतर त्यांचे राजकीय वारस म्हणून पुत्र भगीरथ भालके यांना विधानसभेला संधी द्यावी, अशी मागणी विठ्ठल परिवारातील नेत्यांसह सर्वसामान्य नागरिकांतून केली जात आहे. त्यातच आता पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्याने पंढरपुरात राष्ट्रवादीचा उमेदवार कोण? या विषयाचे गूढ आणखी वाढले आहे. 

पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी पार्थ पवारांच्या नावाची चर्चा ! राजकीय निरीक्षकांच्या उंचावल्या भुवया 

sakal_logo
By
भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूरचे आमदार भारत भालके यांचे एक महिन्यापूर्वी निधन झाले आहे. त्यांच्या रिक्त जागेवर लवकरच पोटनिवडणूक होणार आहे. पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अशातच पंढरपूर येथील (कै.) औदुंबरअण्णा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमरजित पाटील यांनीही पार्थ पवार यांनी पंढरपूरची पोटनिवडणूक लढवावी, अशी मागणी केली आहे. 

श्री. पाटील यांच्या मागणीनंतर सोलापूरच्या राजकीय वर्तुळात पंढरपूरच्या पोटनिवडणुकीसाठी चर्चा सुरू झाली आहे. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार जो उमेदवार देतील त्याचा विजय निश्‍चित मानला जातो. आमदार भालके यांच्या निधनानंतर विठ्ठल साखर कारखान्याच्या रिक्त झालेल्या अध्यक्षपदी त्यांचे पुत्र भगीरथ भालके यांची निवड नुकतीच बिनविरोध झाली आहे. कारखान्याच्या अध्यक्षपदी भगीरथ भालके यांची निवड करण्यात शरद पवारांची भूमिका देखील महत्त्वाची राहिली आहे. कारखान्याच्या अध्यक्षपदाच्या निवडीनंतर आता विधानसभेच्या पोटनिवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे. 

आमदार भारत भालके यांच्यानंतर त्यांचे राजकीय वारस म्हणून पुत्र भगीरथ भालके यांना विधानसभेला संधी द्यावी, अशी मागणी विठ्ठल परिवारातील नेत्यांसह सर्वसामान्य नागरिकांतून केली जात आहे. त्यातच आता पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्याने पंढरपुरात राष्ट्रवादीचा उमेदवार कोण? या विषयाचे गूढ आणखी वाढले आहे. 

येथील अमरजित पाटील यांनीही पार्थ पवार यांनी पोटनिवडणूक लढवावी, अशी मागणी केल्याने निवडणूक जाहीर होण्यापर्वीच राजकीय धुराळा उडू लागला आहे. या मागणी आणि चर्चेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भूमिकेकडे पंढरपूरकरांचे लक्ष लागले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल