
करकंब : दिल्ली येथील छत्रसाल स्टेडियमवर पार पडलेल्या ६८ व्या शालेय राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सतरा वर्षाखालील ६५ किलो वजनी गटामध्ये करकंबच्या रामभाऊ जोशी हायस्कूलच्या पवन बालाजी धायगुडे याने देशात प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदकाला गवसणी घातली. यावेळी त्याच्या उजव्या हाताचा अंगठा अन् मनगटाजवळ दुखापत झाली. तरीसुद्धा जराही विचलित न होता त्याने अंतिम सामन्यात उत्तर प्रदेशचा पैलवान मोनू याला चितपट करून सुवर्णपदक पटकाविले.