esakal | अतिवृष्टी आणि महापुरानंतर आता द्राक्ष बागांवर कीड रोगाचे संकट 
sakal

बोलून बातमी शोधा

Grapes Damage

अतिवृष्टी आणि महापुरामुळे सोलापूर जिल्ह्यातील हजारो हेक्‍टर क्षेत्रावरील द्राक्षासह विविध फळबागांचे नुकसान झाले आहे. नुकसानीमुळे आधीच मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांसमोर पुन्हा नव्या संकटाने तोंड वर काढले आहे. पुराचे पाणी ओसरताच करपा, दावण्या आणि भुरी अशा विविध कीडरोगांचा द्राक्ष बागांवर मोठा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. 

अतिवृष्टी आणि महापुरानंतर आता द्राक्ष बागांवर कीड रोगाचे संकट 

sakal_logo
By
भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर) : अतिवृष्टी आणि महापुरामुळे सोलापूर जिल्ह्यातील हजारो हेक्‍टर क्षेत्रावरील द्राक्षासह विविध फळबागांचे नुकसान झाले आहे. नुकसानीमुळे आधीच मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांसमोर पुन्हा नव्या संकटाने तोंड वर काढले आहे. पुराचे पाणी ओसरताच करपा, दावण्या आणि भुरी अशा विविध कीडरोगांचा द्राक्ष बागांवर मोठा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. 

वाढत्या प्रादुर्भावामुळे पंढरपूर तालुक्‍यातील जवळपास 15 हजार एकरावरील द्राक्षपीक नव्या संकटात सापडले आहे. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी देण्यासाठी राज्य सरकारने भरीव मदत करावी, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत. 

सोलापूर जिल्ह्यात कासेगाव हे द्राक्षाचे आगार म्हणून ओळखले जाते. येथे पाच हजार एकरावर द्राक्ष तर तीन हजार एकरावर डाळिंबाचे उत्पादन घेतले जाते. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे येथील द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे द्राक्षबागा उद्‌ध्वस्त झाल्या आहेत. त्यातच विविध कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. अशातच पावसामुळे ऑक्‍टोबर छाटणीची कामेही ठप्प झाली आहेत. त्यामुळे यंदाचा द्राक्ष हंगाम महिनाभराने लांबणीवर पडणार आहे. 

कासेगाव परिसरात सरासरी 10 ते 15 इंच पाऊस पडतो. यावर्षी मात्र तब्बल विक्रमी 40 इंच पाऊस झाला आहे. मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसामुळे द्राक्षबागा पाण्यात गेल्या आहेत. तर अनेक ठिकाणी बागा कोलमडून पडल्या आहेत. नवीन लागवडीदेखील पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेल्या आहेत. रोपांमध्ये माती गेल्याने रोपे जागेवर सडून गेली आहेत. 

अतिवृष्टीमुळे येथील शेतकरी धनाजी देशमुख यांच्या अकरा एकर द्राक्षबागेचे नुकसान झाले आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून बागेत तीन ते चार फूट पाणी आहे. अति पाण्यामुळे द्राक्षांच्या खोडांना कुजवा लागला आहे. तर बागेवर दावण्या, करपा आणि मर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. अशा या दुहेरी संकटामुळे देशमुख यांचे किमान एक कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. 

पुन्हा नव्याने बागांची छाटणी करावी लागणार आहे. छाटणी केली तर द्राक्ष घड लागतीलच याची शाश्वती नाही. त्यामुळे येणाऱ्या हंगामात द्राक्षाचे उत्पादन कमालीचे घटणार आहे. उत्पादन घटल्याने पुन्हा शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. 

एक एकर द्राक्षबाग उभारण्यासाठी सहा लाखांचा खर्च यतो. कीटकनाशकांची फवारणी, रासायनिक, जिवाणू आणि अन्न मूलद्रव्ये अशी विविध खते, मजुरी यासाठी लागणारा खर्चही वेगळा करावा लागतो. एक एकर द्राक्ष बागेसाठी किमान तीन लाख रुपयांचा खर्च येतो. यासाठी येथील शेतकऱ्यांनी बॅंकांची कर्जे काढली आहेत. अतिवृष्टी आणि आता कीडरोग यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी काहीच पडणार नसल्याने शेतकरी पुन्हा कर्जाच्या ओझ्याखाली दबले जाणार आहेत. सरकारने अत्यंत तोकडी मदत जाहीर केली आहे. या मदतीने द्राक्ष बागेतील गवत देखील काढता येणार नाही. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना एकरी दोन लाख रुपयांची मदत जाहीर करावी, अशी मागणी येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी दिलीप ढुणे व प्रशांत देशमुख यांनी केली आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

loading image
go to top