esakal | कोरोना : पहिला रुग्ण घरी परतल्यानंतर डॉ. आवटेंची व्हायरल झालेली कविता
sakal

बोलून बातमी शोधा

Poem on the Corona by Dr Pradeep Awate

सोलापूर : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर एक शुभ बातमी आली आहे. जगभर थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसने महाराष्ट्रातील पहिला कोरोना रुग्ण बरा होऊन घरी परतला आहे. त्यावर डॉ. प्रदीप आवटे यांनी केलेली कविता जशाच तशी...

कोरोना : पहिला रुग्ण घरी परतल्यानंतर डॉ. आवटेंची व्हायरल झालेली कविता

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर एक शुभ बातमी आली आहे. जगभर थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसने महाराष्ट्रातील पहिला कोरोना रुग्ण बरा होऊन घरी परतला आहे. त्यावर डॉ. प्रदीप आवटे यांनी केलेली कविता जशाच तशी...

महाराष्ट्रातील पहिल्या करोना रुग्णाचे नाव 
' जीवनधर'
 ( खरं म्हणा की खोटं , नाही तर बदलून ठेवलेलं म्हणा)
सहजीवनाची पंचविशी साजरी करायला तो तिच्यासवे दुबईला गेला
आणि जगभर थैमान घालत असलेला करोना
या जीवनधराचा हात धरुन इथं वर आला
हा योगायोग 'विचित्र' नाही
तो मोठा अर्थपूर्ण आहे 

सुक्ष्मरुप धारण करुन मृत्यू अवतीभवती
वावरत असताना 
जगण्यावरली आपली श्रद्धा बळकट करणारा 'योगायोग' आहे हा…!
It reaffirms our faith in life.
जगणं असं आतून मुसंड्या मारत असतं
अवखळ खोंडाने गाईला लुचावं तसं !

आज हा जीवनधर खडखडीत बरा होऊन घरी परततोय …
'अनंत मरणे झेलून घ्यावी, इथल्या जगण्यासाठी,' हे उच्च रवाने सांगावं असा क्षण आहे हा …
लोकांनी गुढ्या उभारल्याहेत..
कडुनिंबाला मोहर आलाय ..
फांदीफांदीवर कोवळी पालवी फुटलीय …

निर्जन रस्त्यांना उत्फुल्ल जगण्याची 
वसंतमाखली स्वप्नं पडताहेत !
' फुलून येता फूल बोलले,
मी मरणावर हृदय तोलले '
दुरुन कुठून तरी गाणं कानावर येतंय ...
तुम्ही ऐकताय ना ?
आपणही आपल्या तारा छेडायला हव्यात…!

- डॉ. प्रदीप आवटे

loading image