esakal | गुन्हेगारांच्या एका टोळीवर लवकरच "मोक्‍का'ची कारवाई ! पोलिस आयुक्‍तांनी बनविली यादी

बोलून बातमी शोधा

CP Ankush Shinde

शहरातील शांतता व सुव्यवस्था बिघडविण्यास कारणीभूत ठरणाऱ्या गुन्हेगारांच्या टोळ्यांवर "मोक्‍का' अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांनी शहरातील सात पोलिस ठाण्यांचा आढावा सुरू केला आहे. 

गुन्हेगारांच्या एका टोळीवर लवकरच "मोक्‍का'ची कारवाई ! पोलिस आयुक्‍तांनी बनविली यादी
sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : शहरातील शांतता व सुव्यवस्था बिघडविण्यास कारणीभूत ठरणाऱ्या गुन्हेगारांच्या टोळ्यांवर "मोक्‍का' अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांनी शहरातील सात पोलिस ठाण्यांचा आढावा सुरू केला आहे. विजापूर नाका, एमआयडीसी आणि सलगर वस्ती या तीन पोलिस ठाण्यांपैकी एका पोलिस ठाण्याअंतर्गत एका टोळीवर आगामी काळात मोक्‍काअंतर्गत कारवाई केली जाणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. 

खासगी सावकारकीच्या माध्यमातून लोकांकडून ज्यादा व्याज घेणे, वसुलीसाठी वारंवार तगादा लावणे, दमदाटी तथा मारहाण करणे, मटका चालविणे, गल्ली, नगर अथवा त्या परिसरात दहशत निर्माण करणे आणि वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर विविध पोलिस ठाण्यांमध्ये यापूर्वीच गुन्हे दाखल झालेले आहेत. गुन्हे दाखल असतानाही वारंवार त्याच प्रकारचे अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर आता "मोक्‍का'ची कारवाई केली जाणार आहे. 

काही दिवसांपूर्वी पोलिस आयुक्‍तांनी पोलिस ठाणेनिहाय अशा लोकांची यादी बनविली आहे. त्यामध्ये त्यांनी सध्याच्या गुन्हेगारांची पार्श्‍वभूमीवर, त्यांचे शिक्षण, कुटुंबातील स्थितीसह अन्य माहिती संकलित केली आहे. त्यांनी गुन्हेगारीचा मार्ग का निवडला, याचीही शहानिशा केली. सुधारण्याची संधी देऊनही न सुधारणाऱ्यांना आता जेलची हवा खावी लागणार आहे. सराईत गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची अथवा तडिपारीची कारवाई केली जाणार असून, गुन्हेगारी टोळ्यांवर मात्र मोक्‍का अंतर्गतच कारवाई होईल, असेही सांगण्यात आले. 

शहरात शांतता व सुव्यवस्था हवी 
शहरातील सर्वसामान्य नागरिकांना शांततेत राहता यावे, त्यांना कोणत्याही गुन्हेगारांचा त्रास होणार नाही, या दृष्टीने गुन्हेगारांवर कारवाई केली जाणार आहे. मोक्‍काअंतर्गत कारवाई करण्याच्या निकषांत बसणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असून, त्यानुसार संबंधित पोलिस ठाण्यातील वरिष्ठांना निर्देश दिले आहेत. 
- अंकुश शिंदे, 
पोलिस आयुक्‍त, सोलापूर 

ठळक बाबी... 
तीन अथवा तीनपेक्षा अधिक गुन्हे दाखल झालेल्यांवर होणार हद्दपारीची कारवाई 
हद्दपारीनंतरही गुन्हेगाराच्या वर्तनात बदल न झाल्यास त्याला केले जाणार स्थानबद्ध 
संघटितपणे गुन्हेगारीचे काम करणाऱ्या टोळीवर केली जाते मोक्‍काअंतर्गत कारवाई 
पोलिसांनी तयार केली शहरातील शंभरहून अधिक सराईत गुन्हेगारांची यादी 
स्थानबद्ध करूनही ज्यांची गुन्हेगारी रोखणे अशक्‍य आहे, त्यांच्यावर होते "एमपीडीए'ची कारवाई 

संपादन : श्रीनिवास दुध्याल