Solapur News : माणसांप्रमाणे आता जनावरांसाठी ‘पीपीई किट’; लंम्पीच्या महामारीवर सुरक्षा कवच

संकटांशी झुंजणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा! महूदच्या जितेंद्र बाजारेंचा जगातील पहिला भन्नाट प्रयोग.
PPE Kit for Animal
PPE Kit for AnimalSakal

- शिवाजी भोसले

सोलापूर - कोरोना महामारीत ‘पीपीई किट’ मुळे अक्षरश: चिलखतीप्रमाणे संरक्षण मिळालं. पीपीई किटमुळे लाखो-करोडोंचे जीव वाचले. तथापि, पीपीई किटचा प्रयोग आता जनावरांमध्ये आलेल्या लंम्पी महामारीच्या काळात लाखमोलाचे पशुधन वाचविण्यासाठी सांगोला तालुक्यात सुरु झालाय.

या तालुक्यातील महूदच्या जितेंद्र बाजारे या शेतकरी सुपुत्राने जनावरांसाठीच्या पीपीई किटचा बहुधा देशातीलच नव्हे, तर जगातील पहिला भन्नाट प्रयोग यशस्वी केला आहे. ज्यातून लाखमोलाच्या पशुधनाचा जीव वाचतोय अन् शेतकऱ्याचं होणारं लाखोचं नुकसान टळतंय. अस्मानी अन् सुलतानी संकटाशी झुंजणाऱ्या बळिराजला जिवापाड जपलेलं पशुधन वाचविण्यासाठी या किटच्या माध्यमातून दिलासा मिळतोय. हे किट पशुधाच्यादृष्टीने सुरक्षा कवच ठरतेय.

श्री. बाजारे यांनी वेगवेगळ्या वयाच्या आणि वजनांच्या जनावरांसाठी पीपीई किटस्‌ बाजारात विक्रीसाठी आणली आहेत. जास्तीत जास्त किटस्‌चे उत्पादन करून पशुधन वाचविण्यासाठी बाजारे परिवाराची अहोरात्र धडपड सुरु आहे.

महाराष्ट्रात लम्पींच्या महामारीचे भयावह संकट आले आहे. लंम्पी या संसर्गजन्य त्वचाविकारानं राज्यभरातील आजवर लाखोंच्या संख्येनं पशुधन मृत्यूमुखी पडलं. अक्षरश: गोठेच्यागोठे रिकामे होताहेत.

अगोदरच अस्मानी अन् सुलतानी संकटांशी टक्कर देता देता बेजार झालेल्या बळिराजाच्या पुढं लम्पीचं नवं संकट उभं आहे. लाखमोलाचं पशुधन डोळ्यादेखत पायखोडून तडफडत मृत्यूमुखी पडतंय. यातून राज्यभरामधील बळिराजा हतबल झालाय.

दरम्यान, याच प्राप्त परिस्थितीत सांगोला तालुक्यातील शेतकरी सुपुत्र आणि गारमेंट व्यावसायिक जितेंद्र बाजारे यांनी चार महिन्यांच्या संशोधनातून जनावरांसाठीच्या पीपीई किटची निर्मिती केली आहे. जे किट मुख्य लंम्पीसह अन्य संसर्गजन्य आजारांवर मात करण्यासाठी उपयोगी ठरताहेत.

श्री. बाजारे यांनी तयार केलेल्या किटची अनेक पशुवैद्यकीय तज्ज्ञांनी चाचणी घेऊन लंम्पीच्या बचावासाठी ते योग्य असल्याचा शेरा मारून पशुपालकांनी आपल्या जनावरांसाठी अशी किट्स वापरावीत असे शिफारसदेखील ते करताहेत. अशा किटस्‌च्या वापरातून सांगोला तालुक्यासह अन्य काही ठिकाणचे लाखो किंमतीचे पशुधन वाचत असल्याची माहिती शेतकऱ्यांकडून दिली जातेय.

किटमुळे जीवघेण्या लम्पीपासून ‘असं’ मिळतं संरक्षण

जनवारांसाठी तयार करण्यात आलेल्या पीपीई किटसाठी लॅमिनेटेड ओवन कपड्याचा वापर करण्यात आलाय. पीपीई किट जनावराच्या अंगावर चढविल्यानंतर डास किंवा माशीचा दंश जनावराच्या थेट शरिरापर्यंत पोचू शकत नाही. परिणामी दंशाअभावी जनावर बाधित होऊ शकत नाही.

पीपीई किटची ठळक वैशिष्ट्ये ...

- किट धुवून करता येते स्वच्छ

- बुरशीनाशक औषधे ठेवण्यासाठी किटमध्ये विशिष्ट ठिकाणी कप्पे

- किट घातल्यानंतर स्टेथोस्कोप लावता यावा, यासाठी जनावराच्या पुढच्या पायाच्या डाव्या बाजूवर जागा

- किट घालण्यासाठी अवघा दहा मिनिटांचा लागतो अवधी

- दोन माणसे घालू शकतात किट

- तोंड आणि शौचाची जागा मोकळी असल्याने राहात नाही अडचण

- लंम्पीचा प्रार्दूभाव राहतो २८ दिवस, या काळात दोन किट पुरेशी

- किटसाठी पिवळा, नीळा आणि पांढरा रंग वापरल्याने जनावरे रंगाला बुजत नाहीत

- २८०० ते ३००० रुपयांच्या कीटमुळे वाचू शकते लाख मोलाचे

पशुधन

- पीपीई कीट घातलेले जनावर विलगीकरणात ठेवणे, सावलीत बांधणे आवश्यक

- थंडीत येणाऱ्या लाळ, खुरकत या संसर्गजन्य आजारापासूनदेखील किटमुळे मिळेल संरक्षण

कोराना महामारीच्या काळातील पीपीई किटबद्दल पंतप्रधान मोदी यांनी व्यक्तीश: फोन करुन माझे कौतुक केले होते. कोरोनात देशभरात पीपीई किट पाठविली. अशी कीट बनविणारी महूदची भक्ती गारमेंट ही देशातील ग्रामीण भागातील पहिली कंपनी ठरली होती. पशुधनासाठी तयार केलेले पीपीई किट लंम्पींवर प्रभावी ठरत आहे. शेतकऱ्यांना माफक दरात हे कीट देत आहेत. या किटला पेटंट मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. आमच्याकडून सरकारने कीट खरेदी करुन ते शेतकऱ्यांना मोफत किंवा अत्यंत माफक दरात द्यावे.

- जितेंद्र बाजारे, पीपीई किटस्‌ निर्माते

बिचाऱ्या मुक्या प्राण्यांचे प्राण वाचविण्यासाठी धडपड

मुकी जनावरे लंम्पीच्या महामारीतून वाचली पाहिजेत, यासाठी तीन साईजमध्ये पीपी-ई कीट तयार करण्याचं काम बाजरे परिवाराकडून साधारण १५ मजूरांना घेऊन अहोरात्र सुरु आहे. परिवारीतील एमबीए पदवीप्राप्त प्रतिक तांत्रिक यांची मदत करताहेत. फॅशन डिझायनर कल्याणी हिचे डिझाईन करण्यात तर उत्पादन करुन करून घेण्यात भाग्यश्री बाजारे यांचे योगदान आहे.

अकलूज प्रोफेसर विष्णू सुर्वे यांचेदेखील खूप मोठे पाठबळ लाभत आहे. किटस्‌ची संपूर्ण फर्म जितेंद्र बाजारे हे हाताळत आहेत. सांगोल्याची ओखळ खिलार बैल लंम्पीतून मृत्यूमुखी पडायला नकोत, यावरदेखील लक्ष केंद्रीत करुन तशा पीपीई कीटची निर्मिती केली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com