प्रणिती शिंदे म्हणाल्या, माझ्या पक्षांतराची अफवा! भाजप अफवा पसरविण्यात टॉपवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 praniti-shinde.jpg
प्रणिती शिंदे म्हणाल्या, माझ्या पक्षांतराची अफवा! भाजप अफवा पसरविण्यात टॉपवर

प्रणिती शिंदे म्हणाल्या, माझ्या पक्षांतराची अफवा! भाजप अफवा पसरविण्यात टॉपवर

सोलापूर : भाजपकडे सक्षम नेतृत्व नसल्याने त्यांच्याकडून माझ्यासह काँग्रेस नेत्यांच्या पक्षांतराच्या अफवा पसरविल्या जात आहेत. अफवा पसरवून फायदा उठविण्यात भाजप टॉपवर असल्याची टीका आमदार प्रणिती शिंदे यांनी केली. भारत जोडो निमित्त गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपवर टीका केली.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील ‘भारत जोडो’ पदयात्रा सोमवारी (ता. ७) महाराष्ट्रात येणार आहे. त्याच्या नियोजनासाठी गुरुवारी (ता. ३) काँग्रेस भवन येथे आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बैठक पार पडली. त्यावेळी त्यांनी भाजपचा खरपूस समाचार घेतला. यावेळी माजी गृह राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील, धनाजी साठे, शहराध्यक्ष प्रकाश वाले, माजी नगरसेवक बाबा मिस्त्री, चेतन नरोटे, महिला जिल्हाध्यक्षा शाहीन शेख, शहर महिलाध्यक्षा हेमा चिंचोळकर आदी उपस्थित होते.

आमदार शिंदे म्हणाल्या, महागाई, बेरोजगारी, शेतकरी व कामगारविरोधी धोरणे, सरकारी कंपन्या विकणे, संविधानिक संस्थांचा गैरवापर, विरोधकांचा, पत्रकारांचा आवाज दाबून टाकणाऱ्या हुकूमशाही मोदी सरकारविरोधात सार्वसामान्यांसाठी ही भारत जोडो पदयात्रा आहे. या पदयात्रेत सोलापूर शहर-जिल्ह्यातील जवळपास २० हजार लोक सहभागी होतील. ही यात्रा १६ नोव्हेंबर रोजी होम मैदान येथून सकाळी १० वाजता निघेल आणि १७ नोव्हेंबरला पातूर (जि. अकोला) येथे पोचेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. माजी मंत्री म्हेत्रे म्हणाले, काँग्रेस नेते राहुल गांधींची ही यात्रा जगातील सर्वांत मोठी पदयात्रा आहे. मोदींच्या दुखण्यावर बोट ठेवल्याने त्यांच्या नेत्यांची बडबड थांबली आहे. यात्रेला कोट्यवधींनी समर्थन दिले असून सामान्य जनता त्यात सामील होत आहे. माजी आमदार यलगुलवार म्हणाले, काँग्रेसने अशाच अनेक पदयात्रांतून ब्रिटिशांना घालविले होते. ज्यावेळी देशात अशा पदयात्रा, आंदोलने झाली तेव्हा सत्ता परिवर्तन झाले आहे. सातलिंग शटगार यांनी सूत्रसंचालन केले. सुनील गोरे यांनी आभार मानले.