एकामागून एक तीन आघात ! सामाजिक बांधिलकी जपत दिला वर्गमित्राच्या निराधार कुटुंबाला आधार

Social
Social

पेनूर (सोलापूर) : मित्राच्या घरावर झालेल्या आघातांची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून समजताच त्या निराधार कुटुंबीयाची भेट घेत नुसते सांत्वन न करता रोख 63 हजार रुपयांची मदत करत सामाजिक बांधिलकी जपण्यात आल्याची घटना पेनूर (ता. मोहोळ) येथे घडली. सोशल मीडियाचा असा विधायक वापर पेनूरकरांना सुखावून गेला आहे. 

पेनूर येथील बब्रुवान नाना डोके यांना तीन मुली व दोन मुले होती. यापैकी मोठा मुलगा नानासाहेब बब्रुवान डोके याने बार्शी येथील शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालय येथे 2002 ते 2005 दरम्यान शिकत असताना जिवाभावाचे वर्गमित्र बनवले होते. पण नंतर नोकरीनिमित्त ते अनेक ठिकाणी विखुरले गेले. 2005 मध्ये नानासाहेब डोके यांचे अपघाती निधन झाले. यामुळे डोके परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. घरातील एक उमदा होतकरू तरुण गेल्याचे अतीव दुःख झाले. त्यातून सावरत असताना 2012 साली नानासाहेब यांचा धाकटा भाऊ अनिल यांचे निधन झाले. त्यांना पत्नी व दोन लहान मुले आहेत. हा दुसरा आघात बसला. 

या वेळी कुटुंबाची जबाबदारी वंदना डोके या बहिणीवर आली. त्या मोहोळ येथे अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या डोक्‍यावर या दोन्ही घटनांचा विपरीत परिणाम झाला. वडील बब्रुवान डोके यांनी अनेक ठिकाणी त्यांच्यावर उपचार केले. पण यश आले नाही. मागील वर्षी कोरोना काळात मे 2020 मध्ये त्यांचेही निधन झाले. एकाच घरावर तीन आघात झाले. 

ही घटना मोहोळ येथील बालविकास प्रकल्प संचालक किरण सूर्यवंशी यांना समजली. ते नानासाहेब डोके यांचे डीएडचे वर्गमित्र होते. त्यांनी व्हॉट्‌सऍपवरून मित्रांशी ही माहिती शेअर केली. त्यानंतर 2002-05 च्या बॅचच्या सर्व मित्रांनी एकत्र येत डोके कुटुंबीयांची आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला. यातून तब्बल 63 हजार रुपये रक्कम जमा झाली. काही मित्रांनी पेनूर येथे या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली. या वेळी जमा केलेली 63 हजार रुपये सामाजिक बांधिलकी म्हणून बब्रुवान डोके व राहिबाई डोके यांच्याकडे सुपूर्द केले. 

या वेळी डोके परिवार व उपस्थितांना नानासाहेब यांच्या आठवणीने गहिवरून आले होते. या वेळी शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीपक गुंड, शिक्षक बापूराव सिरसट, दत्तात्रय नावडकर, संतोष मनगोंडे, अशोक कपाले, किरण जाधव, ऋषिकेश भाग्यवंत, समाधान कोकाटे, सुधाकर मोरे, सुनीता डोके, पायल डोके आदी उपस्थित होते. 

सोशल मीडियाचा विधायक वापर 
सोशल मीडियाचा विधायक कामासाठी कसा वापर करावा याचे उत्तर उदाहरण म्हणजे ही घटना आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून नानासाहेब डोके यांचे सर्व मित्र एकत्र आले आणि त्यांनी नानासाहेब यांच्या कुटुंबीयाला आर्थिक आधार दिला. आपल्या मित्राच्या निराधार कुटुंबाला मदत केल्याचे समाधान सर्व मित्रांच्या चेहऱ्यावर दिसून येत होते. तर या मदतीमुळे डोके कुटुंबही गहिवरून गेले होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com