पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या चक्रव्यूहात "यांचे' दर कधी वाढले कळलंच नाही !

Inflation
Inflation

केत्तूर (सोलापूर) : सध्या पेट्रोल- डिझेलच्या दराने शतक पार केले आहे. घरगुती गॅसमध्येही भरमसाठ मोठी दरवाढ झाली आहे. शेतीच्या मशागतीच्या दराबरोबरच रासायनिक खतांच्या दरातही भरमसाठ वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकही महागाईचा सामना करीत आहेत. 

शेतकऱ्यांना शासन हमी भाव देण्यास तयार नाही. त्यातच सध्या गोडे तेलाचे दरही वरचेवर वाढत असल्याने गृहिणींनाही महागाईचा ठसका बसत आहे. तर दुसरीकडे राज्यात कोरोना रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत असल्याने पुन्हा एकदा लॉकडाउन होते की काय, या भीतीमुळे सर्वसामान्य शेतकरी व नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे या महागाईच्या खाईत मात्र कोरोनाची घाई अशा विचित्र परिस्थितीत नागरिक सापडले आहेत. 

चार राज्यांमध्ये सध्या विधानसभा निवडणुकांचा माहोल रंगला असतानाच, इंधन दरवाढ मात्र थांबली नाही. यामध्ये आणखी वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत. 

खाद्य तेलाचे दर आवाक्‍याबाहेर 
खाद्य तेलाच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने भाज्या किंवा चपात्या बिगर तेलाच्या करायच्या का, असा सवाल सर्वसामान्य गृहिणींतून विचारला जाऊ लागला आहे. महिनाभरात 50 ते 70 रुपयांनी खाद्य तेलाच्या दरात वाढ झाली आहे. खाद्य तेलाबरोबरच डाळी व कडधान्य यांचे दरही कडाडले आहेत. खाद्य तेलाच्या किमती दिवाळीपासून रोज वाढत आहेत. 15 किलो तेल डब्यामागे 200 ते 300 रुपयांची वाढ झाली आहे. एकूणच, वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे महिन्याचे आर्थिक गणित मात्र पारच कोलमडून पडले आहे. 

असे वाढत आहेत दरमहा तेलाचे दर 

  • महिना               सूर्यफूल        सोयाबीन        शेंगा 
  • ऑक्‍टोबर 2020 : 1660            1500             2350 
  • नोव्हेंबर 2020 :   1800            1720             2400 
  • डिसेंबर 2020 :    1860            1760            2450 
  • जानेवारी 2021 :   2100           1960             2650 
  • फेब्रुवारी 2021 :   2000            1860            2650 
  • मार्च 2021 :         2300            2100           2650 

डाळींचे सध्याचे दर 

  • तूरडाळ : 110-115 
  • मूगडाळ : 100 -110 
  • मसूर डाळ : 70-80 
  • चणाडाळ : 65-75 

गॅस दरवाढ 

  • नोव्हेंबर 2020 : 599 
  • डिसेंबर 2020 : 649 
  • जानेवारी 2021 : 699 
  • फेब्रुवारी 2021 : 750 
  • फेब्रुवारी 2021 : 774 
  • फेब्रुवारी 2021 : 799 
  • मार्च 2021 : 827 
  • एप्रिल 2021 : 817 

पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या भांडणात खाद्य तेलाचे दर केव्हा वाढले, हे समजलेच नाही. डाळीबरोबरच गॅसचे दर वाढल्याने महिन्याचे बजेट मात्र कोलमडले आहे. जुळवाजुळव करताना मोठी कसरत करावी लागत आहे. 
- ऊर्मिला माने, 
गृहिणी, केत्तूर 

डिझेलच्या दरात वाढ झाल्याने वाहतुकीचे दर वाढले आहेत. पर्यायाने जीवनावश्‍यक वस्तूंचे दरही वाढले आहेत.महागाई जगणे त्रस्त करत आहे. 
- सुहास निसळ, 
व्यापारी 

वाढत्या महागाईचा किराणा वस्तू खरेदीवर परिणाम झाला असून, महिन्याच्या वस्तू घेणारे ग्राहक कमी झाले आहेत. ज्या वस्तू लागतील त्याप्रमाणेच आता ग्राहक खरेदी करत आहेत. 
- दिलीप खेडकर, 
व्यापारी 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com