Solapur : वांगी येथील शेतकरी विकास वाघमोडे यांनी सात गुंठे क्षेत्रात स्ट्रॉबेरीची लागवड ; उजनी धरणाच्या कुशीत यशस्वी प्रयोग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

progressive farmer

Solapur : वांगी येथील शेतकरी विकास वाघमोडे यांनी सात गुंठे क्षेत्रात स्ट्रॉबेरीची लागवड ; उजनी धरणाच्या कुशीत यशस्वी प्रयोग

चिखलठाण - करमाळा तालुक्यातील वांगी नंबर तीन येथील विकास वाघमोडे या शेतकऱ्याने स्ट्रॉबेरी शेतीचा प्रयोग यशस्वी केला आहे. त्यांना केवळ सात गुंठ्ठे क्षेत्रावर चार लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे.

स्ट्रॉबेरी म्हटले की आपल्यासमोर उभा राहतो तो सातारा जिल्हा अन्‌ महाबळेश्वर परिसर. स्ट्रॉबेरीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेणारा म्हणून हा भाग ओळखला जातो. सोलापूर जिल्ह्यातील हवामान स्ट्रॉबेरीसाठी प्रतिकूल असल्याने येथे स्ट्रॉबेरीचे उत्पादन होऊ शकणार नाही, असा समज होता.

परंतु हा निष्कर्ष चुकीचा ठरवत वांगी (ता. करमाळा) येथील विकास वाघमोडे या शेतकऱ्याने स्ट्रॉबेरी शेतीचे चॅलेंज स्वीकारत ही शेती यशस्वी करून आपल्या सात गुंठे क्षेत्रांमध्ये आजपर्यंत सव्वादोन लाख रुपयांचे उत्पादन मिळवले आहे. आणखी दोन लाखांचे उत्पन्न त्यांना अपेक्षित आहे. उजनी धरणाच्या काठावर असलेल्या वांगी गावांमध्ये मुख्यतः ऊस व केळी हीच पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. या दोन्ही पिकांमध्ये उत्पादन चांगले मिळत असले तरी या पिकांसमोर ही भविष्यात अनेक अडचणी आहेत.

त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांनी फळबागांसारखा नवीन पर्याय शोधण्यात सुरू केला आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील हवामानात आजपर्यंत होऊ न शकलेले अनेक प्रयोग शेतकरी यशस्वी करत आहे. यामध्ये भरघोस उत्पादन मिळवणे शक्य करून दाखवले आहे. वांगी नंबर तीन येथील प्रगतशील शेतकरी विकास वाघमोडे यांनी आजपर्यंत केळी व ऊस या पिकांमध्ये सर्वोत्तम उत्पादन घेऊन नावलौकिक कमावलेला आहे.

त्यांच्या महाबळेश्वर येथील मित्रांच्या सूचनेवरून स्ट्रॉबेरी शेतीचा प्रयोग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. यामध्ये कोणत्याही रासायनिक खताचा वापर न करता सात गुंठे क्षेत्रावर नोव्हेंबरमध्ये त्यांनी सातारा जिल्ह्यातील भिलारवरून रोपे आणून स्ट्रॉबेरीची एक फुट अंतरावर बेडवर लागवड केली. कसल्याही रासायनिक खताचा वापर न करता एस.पी. ॲग्रोटेकचे सागर पार्लेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जैविक खतांचा वापर करत उत्कृष्ट असा प्लॉट तयार केला. साधारण एक लाख रुपये खर्च झाला.

आत्तापर्यंत त्यांनी स्वतः स्थानिक बाजारपेठेत व बारामती, बार्शी येथील व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडून जागेवर स्ट्रॉबेरीची खरेदी केली आहे. सरासरी तीनशे रुपयाचा दर मिळवून सव्वा दोन लाख रुपयांचे उत्पन्न त्यांना मिळाले आहे. त्यांना आणखी दोन लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. सध्या स्ट्रॉबेरी शेतीचा प्रयोग या परिसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरत असून पुढील वर्षी या परिसरातील अनेक शेतकरी हे पीक घेण्याच्या तयारीत आहेत.

स्ट्रॉबेरी पिकासाठी आवश्‍यक गोष्टी

स्ट्रॉबेरी पिकासाठी थंड हवामानाची आवश्‍यकता आहे. मात्र, सोलापूर जिल्ह्यातील तापमान जास्त आहे. त्यामुळे हे पीक येऊ शकत नाही, असा अंदाज होता. मात्र, उजनी बॉकवॉटर परिसरात जिल्ह्यातील इतर भागापेक्षा उष्णतेचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे येथे स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयोग यशस्वी झाला आहे. या पिकासाठी जादा पाण्याची आवश्‍यकता नाही. मात्र, पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीची आवश्‍यकता आहे. रासायनिक खतांचा वापर न करता हे पीक घेणे शक्य आहे.

करमाळा तालुक्यात स्ट्रॉबेरीचे उत्पादन होऊ शकत नाही, असे अनेक शेतकरी मला सांगत होते. परंतु आपण प्रयोग तरी करून बघू म्हणून मी थोड्या क्षेत्रावर लागवड केली होती. माझ्या शेतातातील तयार झालेली स्ट्रॉबेरी मी महाबळेश्वर येथील मित्राला पाठवली. त्यांनी पिकांची गुणवत्ता व चव येथील स्ट्रॉबेरीपेक्षा उत्तम असल्याचे सांगितले. हा प्रयोग यशस्वी झाल्याने आत्मविश्वास निर्माण झाला असून पुढील वर्षी आणखी जादा क्षेत्रात लागवड करणार आहे.

- विकास वाघमोडे, स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी, वांगी नंबर ३, ता. करमाळा

विकास वाघमोडे यांचा स्ट्रॉबेरी शेतीचा प्रयोग यशस्वी झाला असून गावातील आम्ही इतर शेतकऱ्यांचीही हे पीक घेण्याची तयारी करत आहे. या पिकासाठी होणारा खर्च जादा असल्याने कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना रेफर व्हॅनसारख्या विविध सुविधा व अनुदान उपलब्ध करून देण्याची गरज आहे.

- गणपत कापसे, शेतकरी, वांगी नंबर ३, ता. करमाळा