Rahul Chavan IPS solapur
Rahul Chavan IPS solapursakal

MBBSला प्रवेश मिळत असताना शेतकरी पुत्राने निवडली वेगळी वाट आज IPS

एमबीबीएस सोडून कला शाखेतून शिक्षण घेऊन आयपीएस झालेले राहुल चव्हाण

उपळाई बुद्रूक : बारावीनंतर करियर घडवण्यासाठी 'एमबीबीएस' ची इट्रान्स उत्तीर्ण झाल्यानंतर. आई-वडिलांना मुलगा डॉक्टर होईल असे वाटत असताना. यूपीएससी करण्यासाठी विज्ञान शाखेतून थेट कला शाखेत प्रवेश घेत. सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत. तिसऱ्या प्रयत्नात यूपीएससीतुन 'आयपीएस' म्हणून उत्तीर्ण झालेले व महाराष्ट्रातच नियुक्ती मिळालेले खर्डी (ता.पंढरपुर) येथील राहुल चव्हाण. त्यांची ही प्रेरणादायी यशोगाथा.

पंढरपूर तालुक्यातील खर्डी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण झाले. कौटुंबिक परिस्थिती सांगायची झाल्यास काम करून कौटुंबिक गाडा हाकणारे शेतकरी कुटुंब. लहानपणापासून मैदानी खेळाचे भरपूर आकर्षण. त्यामुळे शालेय क्रीडा स्पर्धेत आवर्जून सहभाग नोंदवत असायचो. परंतु अभ्यासाकडे कधीही दुर्लक्ष होत नसायचे. त्यामुळे गुणवत्तेच्या बाबतीतही चांगली प्रगती होती. माध्यमिक शिक्षण सिताराम महाराज विद्यालयातुन पूर्ण केल्यानंतर, घरच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव असल्याने, पुढील शिक्षणासाठी पंढरपूर मधील द. ह. कवठेकर येथे प्रवेश घेतला. शाळा, अभ्यास व मैदान या व्यतिरिक्त अन्य कशातही लक्ष न देता या विद्यालयात दहावीत 95 टक्के मार्क घेतले. या काळात स्पर्धा परीक्षेत ग्रामीण भागातील युवक-युवती मोठ्या प्रमाणावर उत्तीर्ण होत असल्याच्या बातम्या वाचायला मिळायाच्या. तशी लहानपणापासूनच प्रशासनाचे अधिकच आकर्षण होते.

दहावीनंतर पंढरपुरातील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात विज्ञान शाखेत अकरावीसाठी प्रवेश घेतला. शैक्षणिक प्रगती उंचावत चालली असल्याने, आईवडिलांची प्रबळ इच्छा होती की, मेडिकलकरून डॉक्टर व्हावे. दहावीप्रमाणे बारावीतही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो. त्याचबरोबर एमबीबीएसची इन्ट्रान्स देखील उत्तीर्ण झाल्याने, आई-वडिलांना तर आपला मुलगा डॉक्टर होण्याची स्वप्ने पडू लागली. सर्वांना असे वाटत असताना. मात्र मनात वेगळाच विचार घोंघावत होता. एमबीबीएस करण्यासाठी मन तयार होत नव्हते. यूपीएससी खुणावत असल्याने, एमबीबीएसला न जाता स्पर्धा परीक्षा करण्यासाठी सोयीस्कर होईल यादृष्टीने पुण्यातील नोरोसजी वाडिया कॉलेजला विज्ञान शाखेचा विद्यार्थी असलो तरी, थेट कला शाखेतच प्रवेश घेतल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला. सर्व कुटुंबीयांच्या विचारांच्या विरोधात जाऊन हि रिस्क घेतली. त्यामुळे एक आव्हानात्मक प्रवास सुरु होता. यातून लवकर काही साध्य नाही झाले तर, घरच्या परिस्थितीचे चित्र डोळ्यासमोर होतेच.

स्पर्धा परीक्षा अन् त्यात यूपीएससीबाबत ठोस असे मार्गदर्शन कुणाचेही मिळालेले नव्हते. त्यामुळे या परीक्षाबाबत अत्यंत मर्यादित अशी माहिती होते. त्यामुळे इथून तयारी होणार होती. परंतु स्वतःच्या क्षमतेवर विश्वास असल्याने हे मी करू शकतो असा आत्मविश्वास होता. कारण पदवीच्या शिक्षणाच्या सुरुवातीपासूनच पुण्यात यूपीएससीची तयारी सुरू झाली. याकाळात अभ्यास करणाऱ्या मित्रांचा मोठा परिवार मिळाला. एकमेकांच्या अडिअडचणी समजून घेत. जिद्द, चिकाटी व अभ्यासाच्या जोरावर पदवीचे शिक्षण पूर्ण होताच. युपीएससीच्या दिलेल्या पहिल्या प्रयत्नातच पूर्व व मुख्य परीक्षेत यश मिळाले. परंतु मुलाखतीतपर्यंत पोहचता आले नाही. एकीकडे पहिल्या प्रयत्नात मुख्य परीक्षेपर्यंत यश संपादन करता आल्याने, आत्मविश्वास अधिक निर्माण झाला. तर दुसरीकडे अपयश आले त्याचेही दुःख. त्यामुळे पुन्हा नव्या उमेदीने परिक्षेला सामोरे जाण्यासाठी अभ्यासाचे नियोजन केले. अभ्यासाला आणखी वेळ देता येईल. व तेथील स्पर्धेशी जुळवून घेता येईल. यासाठी पुणे सोडुन दिल्ली गाठली.

परंतु दुसऱ्या प्रयत्नात ही तशीच अवस्था झाली. सलग दुसऱ्यांदा अपयश आल्यानंतर अनेकांनी करियर दुसरीकडे करण्याचा सल्ला दिला. तर काहीजणांनी एमपीएससी करण्याचे सुचविले. मात्र काहीही झाले तरी यातच नशीब आजमावयाचे हा ध्यास पक्का होता. कारण यासाठीच एमबीबीएस सोडले. परत हे सोडुन जायचे म्हणजे शर्यतीत माघार घेतल्यासारखे होते. त्यामुळे सर्व नकारात्मक विचार झुगारून. अभ्यासाच्या पूर्ण ताकतीने तिसऱ्या प्रयत्नासाठी परिक्षेस सामोरे गेलो. अन् 'प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे'. याचा अनुभव आला. यूपीएससीच्या परीक्षेत संपूर्ण भारतातून 109 व्या क्रमांकाने उत्तीर्ण होत आयपीएस झालो. हे यश म्हणजे शेतात कबाडकष्ट करून मला शिक्षण दिलेल्या आई वडिलांच्या कष्टाची पोचपावती होती. आयपीएस म्हणून महाराष्ट्रातच नियुक्ती मिळाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com